सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (08:45 IST)

NZ vs SL : न्यूझीलंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, श्रीलंकेवर 5 विकेट्सनी मात

वन डे विश्वचषकात न्यूझीलंडनं श्रीलंकेला 5 विकेट्सनी हरवून गुणतालिकेत टॉप फोरमधलं स्थान जवळपास निश्चित केलंय.
 
बंगळुरूत 9 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात किवी टीमनं श्रीलंकेला आधी 171 रन्समध्ये रोखलं. मग डेवॉन कॉनवे, रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचलच्या खेळींच्या जोरावर विजयासाठीचं लक्ष्य 5 विकेट्सच्या मोबदल्यात 23.2 ओव्हर्समध्येच गाठलं.
 
न्यूझीलंडचा या स्पर्धेतला हा पाचवा विजय असून त्यांच्या खात्यात 10 पॉईंट्स जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशाही वाढल्या आहेत.
 
भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांचं उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित झालं आहे तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या टीम्समध्ये चुरस होती.
 
न्यूझीलंडनं श्रीलंकेला हरवल्यामुळे त्यांच्या खात्यात 10 गुण जमा झाले असून 0.743 अशा नेट रनरेटसह किवी टीम चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
 
वानखेडेवर भारत-न्यूझीलंड सेमी फायनल?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा स्पर्धेतला प्रत्येकी एक सामना बाकी असल्यानं, त्यांनाही तांत्रिकदृष्ट्या चौथं स्थान गाठण्याची संधी आहे.
 
पण अफगाणिस्तानचा नेट रनरेट -0.338 एवढा म्हणजे न्यूझीलंडपेक्षा बराच कमी आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेटही 0.036 एवढाच आहे.
 
त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत अफगाणिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे तर पाकिस्तानचा मार्गही अतिशय खडतर बनला आहे.
 
आता पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी इंग्लंडवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल.
 
11 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंडमधला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार असून, सेमी फायनल गाठायची, तर पाकिस्तानला इंग्लंडवर एकतर 287 धावांनी किंवा 284 बॉल्स (47.2 ओव्हर्स) राखून विजय मिळवावा लागेल.
 
हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य दिसत असल्यानं न्यूझीलंडचा सेमी फायनलमधला प्रवेश पक्का मानला जातो आहे.
 
सेमी फायनलचा पहिला सामना गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये म्हणजे भारत आणि न्यूझीलंडच्या टीम्समध्ये होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे.
 
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 15 नोव्हेंबरला वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल खेळवली जाणार आहे.
 
श्रीलंका चॅम्पियन्स ट्रॉफीतूनही बाहेर?
इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स या चार संघांचं स्पर्धेतील आव्हान खरंतर यापूर्वीच संपुष्टात आलंय.
 
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीनं श्रीलंकेला पहिल्या आठ संघांमध्ये स्थान मिळवणं गरजेचं होतं. त्यासाठी न्यूझीलंडवर मात करण्याची गरज होती.
 
पण बंगळुरूतला सामना गमावल्यामुळे श्रीलंकेला आता चॅम्पियन्स ट्रॉफी गाठण्यासाठी इतर टीम्सच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.
 
श्रीलंकन टीमला सध्या अनेक पातळ्यांवर संकटांचा सामना करावा लागतो आहे. वर्ल्ड कपमधला अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याची संधीही त्यांनी गमावली.
 
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेचा संघ 46.4 षटकांत 171 रन्समध्येच गारद झाला.
 
श्रीलंकेचा सलामीवीर कुशल परेरानं शून्यावर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत फक्त 22 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. या विश्वचषक स्पर्धेतील हे सर्वात जलद अर्धशतक ठरलं.
 
परेराची 51 रन्सची खेळी आणि महीश तीक्षणाची 91 चेंडूंमध्ये 38 रन्सची संघर्षमय खेळी वगळता इतर फलंदाजांना वीस रन्सची वेसही ओलांडता आली नाही.
 
पथुम निशांकासह कर्णधार कुशल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरिथ अशलांका, चमिका करुणारत्ने आणि दुष्मंत चमीरा यांना तर दोन अंकी धावाही करता आल्या नाहीत.
 
न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिच सँटनर, राचिन रविंद्र आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 2 तर टीम साऊदीनं 1 विकेट घेतली.
 
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागिदारी केली.
 
कॉनवे 45 तर रविंद्र 42 धावा काढून बाद झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 14 धावांवर, मार्क चॅपमन 7 तर डॅरिल मिचेल 43 धावा काढून बाद झाले. ग्लेन फिलिमप्सनं नाबाद 17 रन्सची खेळी केली आणि टॉम लॅथमच्या साथीनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली.