शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (17:24 IST)

Dattatreya Jayanti 2022 दत्त जयंती संपूर्ण माहिती

dattatreya ashtakam
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. 
 
दत्त म्हणजे
दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे.
 
दत्त जन्माचा इतिहास
अत्री ऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पतिव्रत्या असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की इंद्रादी देव घाबरले. ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून यावर आपण काही उपाय करावा. हे ऐकून त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले.
 
एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असताना अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे भिक्षा मागू लागले. त्यावर अनसूयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा. 
 
तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले, तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ. तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता असेही आम्ही ऐकले होते म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.
 
यावर अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. अनसूया जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.
त्यावर अनसूया यांच्या मनात आले की अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. आणि माझे मन निर्मळ असल्यावर कामदेवाची काय बिशाद ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील. या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन. आपण आनंदाने भोजन करा.
 
मग त्यांनी पतीचे चिंतन करून विचार केला की, अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. तेवढ्यात पाहायला तर कार्य चमत्कार घडला... अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे दिसून आली. अनसूया यांनी त्यांना कडेवर घेऊन स्तनपान करवले तेव्हा बाळांचे रडणे थांबले. 
 
इतक्यात अत्रीऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तान्त सांगितला. त्या म्हणाल्या स्वामिन् देवेन दत्तं । याचा अर्थ हे स्वामी, देवाने दिलेली मुले. यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. 
 
बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा अत्री आणि अनसूयेने बालके आमच्या घरी रहावी असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.
 
दत्त जयंती पूजा पद्धत किंवा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत
या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो. ज्यात पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. 
 
असे मानले जाते की दत्तात्रेय देव गंगा स्नानासाठी येतात, म्हणून गंगेच्या काठावर दत्ता पादुकाची पूजा केली जाते.
दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे.
दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंध हे फुलं वाहावे. फुलांचे देठ देवाकडे करून ती वहावीत.
चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर या उदबत्तीने दत्ताला ओवाळावे.
 
दत्ताच्या चोवीस गुरूंची नावे
पृथ्वी
पाणी
वायू
अग्नी
आकाश
सूर्य
चंद्र
समुद्र
अजगर
कपोत
पतंग
मधमाशी
हत्ती
भ्रमर
मृग
मत्स्य
पिंगळा वैश्य
टिटवी
बालक
कंकण
शरकर्ता
सर्प
कोळी
पेशकार
 
दत्तात्रेयांचे आठ प्रमुख शिष्य
सहस्रार्जुन, कार्तवीर्य, भार्गव, परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद, हे दत्तात्रेयांचे आठ प्रमुख शिष्य होते.
 
दत्ताच्या परिवाराचा भावार्थ
दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. गाय आणि कुत्रे ही एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात.
 
झोळी: दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. याचा भावार्थ असा आहे – दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.
 
कमंडलू : कमंडलू हे संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो अशात कमंडलू हे एकाप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे.
 
त्रिशूळ : त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही.
 
दत्ताचे प्रमुख अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ
श्री नृसिंह सरस्वती
श्री माणिकप्रभु
श्री स्वामी समर्थ
श्री साईबाबा
श्री भालचंद्र महाराज
 
दत्तात्रेयांचे अंशअंशात्मक अवतार
योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीलाविश्‍वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्‍वंभर, मायामुक्त, श्रीमायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्यामकमलनयन.
 
दत्ताचा श्‍लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्‍वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम : ॥
 
दत्ताचा जयघोष
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
अलख निरंजन
 
दत्तगायत्री मंत्र
ॐ दत्तात्रेयाय विद्महे । अवधूताय धीमहि ।
तन्नो दत्त: प्रचोदयात् ॥
 
दत्त बीजमंत्र
दं
 
दत्ताचा जप
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।
 
दत्त तारक नामजप
श्री गुरुदेव दत्त
 
दत्त आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
 
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
 
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
 
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
 
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
 
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
 
– संत एकनाथ