रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जून 2022 (15:00 IST)

श्रीदत्त विजय अध्याय चवथा

shri datta vijay Adhyay 4
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । श्रीदत्त म्हणती भक्तांप्रत । राहे औदुंबर वृक्षांत । मान राखा म्हणोनी सांगत । सदा औदुंबर वृक्षाचा ॥१॥
 
वड आणि पिंपळ । हेही असती देववृक्ष । यांसीही रक्षावे उचित । मान पानाते देवोनिया ॥२॥
 
सदैव करावे नामस्मरण । आवडत्या मंत्रे करोन । तीन तासांचे आसन । लावोनी जप करावा ॥३॥
 
सोऽहम्‍ हंसाचे साधन । करावे आसनी बैसोन । श्वासावरी लक्ष ठेवोन । मनी म्हणावे मंत्राते ॥४॥
 
ऐसे करिता साधन । हाती येई पवन । लागे समाधी संजीवन । कोटी जप होताची ॥५॥
 
चिदाकाशाचे दर्शन होत । परमानंद पद होई प्राप्त । चैतन्य चित्ती प्रकटत । परब्रह्माचे साधन हे ॥६॥
 
होई कुंडलिनी जागृत । सर्व चक्रे होती जागृत । देवता सिद्धांची दर्शने होत । ऐसा साधन मार्ग हा ॥७॥
 
होई त्रिकालज्ञान प्राप्त । अष्टमहासिद्धी प्राप्त होत । देहधारी देव होत । ऐसा साधन मार्ग हा ॥८॥
 
नयन बैसावे मिटोन । करावे सोऽहम्‍ हंसाचे स्मरण । ऐसे करिता काही दिन । प्रथम शून्य दिसतसे ॥९॥
 
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचे नांव अधःशून्य । त्रिकूट म्हणती या लागोन । त्रिकोणासम दिसतसे ॥१०॥
 
मध्य शून्य श्याम वर्ण । गोल्हाट त्यासी म्हणती जाण । चित्ताकाशाचे दर्शन । येथेचि पाहा होतसे ॥११॥
 
उर्ध्व शून्य श्वेत वर्ण । श्रीहाट ऐसे तया नाम । चिदाकाशाचे दर्शन । येथेचि जाणा होतसे ॥१२॥
 
औटपीठ नील वर्ण । यासीच म्हणती महाशून्य । येथे प्रवेश होता जाण । स्वरुप जाणा दिसतसे ॥१३॥
 
असो स्वामी श्रीदत्त । राहाती रत्नागिरीत । रामचंद्र टकले असत । स्नेही पाहा तयांचे ॥१४॥
 
तयांची मुलगी मृणाल । तापाने होई बेहाल । स्वामी ठेविती करकमळ । शिरावरी मुलीच्या त्या ॥१५॥
 
तात्काळ ताप उतरत । मुलगी खेळू लागत । ऐशा लीला अनेक । झाल्या पाहा तेथवरी ॥१६॥
 
रामचंद्र टकले म्हणत । एकदा श्रीस्वामीप्रत । गणपतीपुळयासी जाऊ म्हणत । श्रीदर्शना कारणे ॥१७॥
 
उभयता पुळयासी जात । गणपतीचे दर्शन घेत । तव तेथे एक विप्र येत । येवोनिया नमितसे ॥१८॥
 
नमोनिया स्वामीसी । म्हणे यावे गृहासी । ऐसे म्हणोनी उभयतासी । घेवोनिया जातसे ॥१९॥
 
नेवोनिया गृहासी । तो म्हणे स्वामींसी । गणपती सांगे मजसी । स्वागत करावे दत्ताचे ॥२०॥
 
आणी गृहासी श्रीदत्त । भोजन देवोनी करी तृप्त । सर्व तीर्थांचे पुण्य प्राप्त । होईल जाणा तुजलागी ॥२१॥
 
म्हणोनिया धावत । गेलो गणपती मंदिरात । जैसे पाहिले स्वप्नात । तैसे देखिले तुम्हासी ॥२२॥
 
असो कृपा करावी मजवरती । म्हणोनी शिर ठेवी चरणावरती । पक्कान्न भोजन दत्ताप्रती । वाढिले पाहा प्रेमाने ॥२३॥
 
रामचंद्र टकल्यांसी म्हणे विप्र । हे दत्त साक्षात । येता यांचे मनांत । गुप्त औदुंबरात होतील हे ॥२४॥
 
गणपती म्हणे मजप्रत । हे अवतरले लोकोद्धारार्थ । प्रती तीन शतकात । घेती अवतार दत्त हे ॥२५॥
 
गणपतीचा पुजारी । रामचंद्रासी म्हणे दत्त अवतारी । सिद्ध तुमच्या स्नेह्यापरी । तुम्हासवे वागतसे ॥२६॥
 
धन्य असा आपण । स्नेही केला नारायण । सदगदित कंठे म्हणोन । निरोप त्यांसी देतसे ॥२७॥
 
एकदा एक भक्त । मध्यरात्री होई जागृत । बाहेर जावोनी पाहात । अदभुत प्रकार तेथवरी ॥२८॥
 
सर्पाकृती प्रवाह जात । आकाशी रांग दिसत । भक्त राही पाहात । अदभुत प्रकार म्हणोनिया ॥२९॥
 
रेल्वे लाईन प्रमाणे दिसत । सर्प लाईन आकाशात । भैरवांच्या पालख्या जात । सर्प रांगेवरोनी त्या ॥३०॥
 
पाहोनी अदभुत प्रकार । भक्त करी नमस्कार । भैरव रवळनाथ सत्त्वर । म्हणती पाहा काय त्याते ॥३१॥
 
श्रीदत्तात्रेय अवतार । असे तुझा श्रीगुरुवर । म्हणोनी हे दृश्य सुंदर । दिसले आज तुजलागी ॥३२॥
 
कोडोलीतील काही भक्त । येवोनी स्वामीसी सांगत । यावे आमुच्या ग्रामाप्रत । गाव पावन होईल की ॥३३॥
 
त्याच वेळी मठ ग्रामातील । भक्त येवोनी विनवीत । यावे आमुच्या गावात । कृपा करोनी श्रीस्वामी ॥३४॥
 
स्वामी दोघा आश्वासिती । येऊ म्हणती ग्रामाप्रती । परी कोठेही न जाती । राहाती गृहीच श्रीस्वामी ॥३५॥
 
काही दिवसानंतर । भक्ता कळे समाचार । दोन्ही ग्रामी दत्तदिगंबर । गेले होते म्हणोनिया ॥३६॥
 
दोन्ही ग्रामी गेले । बंधू गृहीही राहिले । ऐसे अदभुत केले । दत्त दिगंबर श्रीस्वामी ॥३७॥
 
एकाच वेळी अनेक ठिकाणी । दिसोन येती श्रीस्वामी । कधी औदुंबर वृक्षातुनी । प्रकटोनी देती दर्शन ते ॥३८॥
 
एकदा एका अरण्यात । होते स्वामी तप करीत । औदुंबर वृक्षातळी राहात । नदी समोर वाहतसे ॥३९॥
 
तप करोनी तेथ । तीर्थयात्रेसी स्वामी जात । इकडे प्रकार अदभुत । वर्तला कैसा तो पाहा ॥४०॥
 
एक शिकारी येत । औदुंबर वृक्षातळी बैसत । जलपानासी जव प्राणी येत । शिकार करु म्हणतसे ॥४१॥
 
बंदूक घेवोनी हातात । नेम लावोनी बैसत । तव तेथे अकस्मात । स्वामी पाहा प्रकटले ॥४२॥
 
प्रकाश पडे औदुंबरातून । प्रकटले दत्त दयाघन । म्हणती शिकार्‍या लागोन । शिकार आजी करु नको ॥४३॥
 
घात होईल तुजला । म्हणोनी सांगतो ऐक जरा । तू माझ्या जागेत बसला । म्हणोनी आलो सांगावया ॥४४॥
 
ऐसे सांगोनी तयाप्रत । जाऊ तेथोनी लागत । तव शिकारी पाठोनी जात । म्हणे स्वामी ऐकावे ॥४५॥
 
शिकारी स्वामीसी म्हणत । एक सांगावे मजप्रत । माझा बंधू हरवला असत । सोळा वर्षे झाली हो ॥४६॥
 
स्वामी तयासी म्हणत । भेटेल चार दिवसात । ऐसे सांगोनी गुप्त । झाले पाहा तेथवरी ॥४७॥
 
विचार शिकारी करीत । म्हणे दत्त साक्षात । दर्शन देत प्राण वाचवीत । चिंता मुक्त करीतसे ॥४८॥
 
भाग्य आपुले म्हणत । निद्रिस्थ होई तेथ । सकाळी उठोनी जात । आपुल्या ग्रामा परियेसा ॥४९॥
 
चौथे दिवशी अकस्मात । सोळा वर्षांनी बंधू येत । सर्वा आश्चर्य वाटत । सत्य म्हणती श्रीस्वामी ॥५०॥
 
आलेला बंधू म्हणत । स्वप्नी येती श्रीदत्त । म्हणती जा ग्रामाप्रत । अन्यथा शिक्षा करीन मी ॥५१॥
 
ऐसा दत्त दिगंबर । करी भक्तांचा उद्धार । त्याचे चरित्र अपार । किती म्हणोनी वर्णावे ॥५२॥
 
ऐशा लीला करीत । स्वामी राहती महाराष्ट्रात । प्रभाकर कदम भेटत । भाई म्हणती तयाना ॥५३॥
 
विजया नामे पत्नी असत । स्वामीवरी प्रेम बहुत । दोन मुली दोन सुत असत । प्रेमे भजती स्वामींना ॥५४॥
 
विष्णू रुपात दर्शन । देती स्वामी भाई लागोन । वैकुंठ लोकाचे दर्शन । करविले पाहा स्वामींनी ॥५५॥
 
स्मिता प्रथम कन्या असत । समाधी तिसी लावोन देत । असंख्य देव - देवता नित्य । ध्यानी दिसती तिजलागी ॥५६॥
 
सुजाता द्वितीय कन्या । ध्यानी पाहे देवतांना । ऐसे घराणे आध्यात्मिक जाणा। मुंबापुरी राहातसे ॥५७॥
 
एकदा सुजाता व्याधिग्रस्त । अनेक दिवस पडोन राहात । अनेक औषधे घेत । परी बरे वाटेना ॥५८॥
 
शेवटी कंटाळून । म्हणे दत्त दयाघन । या आजारा लागोन । तूचि आता बरे करी ॥५९॥
 
स्मरणगामी श्रीदत्त । स्मरताची येती धावत । प्रकटले पाहा तेथ । म्हणती ‘ सुजु काय झाले ’ ॥६०॥
 
ऐसे म्हणोनी वरदहस्त । सुजाता मस्तकी ठेवीत । तात्काळ व्याधी पळोनी जात । पूर्ण बरी ती होतसे ॥६१॥
 
तये वेळी स्वामी श्रीदत्त । हजार मैल दूर असत । परी प्रकटती मुंबईत । देती दर्शन सुजाताला ॥६२॥
 
ऐसा स्वामी श्रीदत्त । राही लोककल्याण करीत । म्हणती अवतार अदभुत । अवधूत निरंजन दत्ताचा ॥६३॥
 
प्रभाकर प्रतिभा मुळे असत । उभयता स्वामींचे भक्त । स्वामींसी पुत्रवत मानीत । सेवा करिती मनोभावे ॥६४॥
 
दिव्य अनुभव त्यांसी येत । प्रकृती राही ठणठणीत । आर्थिक स्थिती उत्तम होत । स्वामीकृपे करोनिया ॥६५॥
 
सदैव राहाती आनंदात । व्याधी सर्व पळोनी जात । गुरुकृपेचे सामर्थ्य । सुखी ठेवी भक्तांसी ॥६६॥
 
लोककल्याण कारणार्थ । श्रीस्वामी प्रवास करीत । जागोजागी शक्ती ठेवीत । कल्याण व्हावया जगताचे ॥६७॥
 
अनेकांसी शक्ती देत । लोककल्याण करा म्हणत । ऐसे माध्यम असंख्य । निर्माण केले स्वामींनी ॥६८॥
 
अनेक आध्यात्मिक ग्रंथ । लोककल्याणार्थ स्वामी लिहीत । सुखी व्हावे जन समस्त । म्हणोनी संत कळवळती ॥६९॥
 
अनेक देवता आणि सिद्ध । स्वामी जवळी येती नित्य । त्यासवे विश्वकल्याणार्थ । विचार करिती श्रीस्वामी ॥७०॥
 
भक्तांसी स्वामी घडवीत । देवत्व तयांना देत । महात्मे जन्मासी घालीत । ऐसा अधिकार स्वामींचा ॥७१॥
 
स्वामी बंधू अशोक । त्यासी दोन पुत्र होत । प्रथम ॐ कार नामे असत । द्वितीय नामे मंदार तो ॥७२॥
 
जव प्रथम पुत्र जन्मत । स्वामी बंधूते म्हणत । हा तव सुत जन्मसिद्ध । कार्यालागी अवतरला ॥७३॥
 
द्वितीय पुत्र जव होत । स्वामी म्हणती बंधूप्रत । हा पूर्वजन्मीचा साधक । पूर्णत्वास जाईल हा ॥७४॥
 
तीन भगिनी स्वामींसी असत । पुष्पा आशा मंगल नामे असत । आशा बहिणीसी चार सुत । होती स्वामीकृपेने ॥७५॥
 
स्वामी म्हणती भगिनीसी । एक पुत्र ठेवी प्रपंचासी । तीन पुत्र देई मजसी । ईश्वर सेवा करावया ॥७६॥
 
प्रथम पुत्र ठेवोनी । आशा देई पुत्र तीनही । विजय उमेश दिगंबर म्हणोनी । नांवे असती त्यांची हो ॥७७॥
 
विश्वकल्याण कारणार्थ । दिव्यात्म्यांना जन्म देत । तैसेचि दिव्य लहरी सोडीत । सन्मार्ग जना मिळावया ॥७८॥
 
सुखी व्हावे अवघे जन । पृथ्वीवरी यावे युग सुवर्ण । दत्त दिगंबर म्हणोन । स्वये पाहा कष्टतसे ॥७९॥
 
विविध मंत्र निर्माण करीत । त्यात स्वसामर्थ्य ठेवीत । लोककल्याण कारणार्थ । अनेक मंत्र देती ते ॥८०॥
 
दत्तात्रेयो हरि कृष्णो । मुकुंदो आनंद दायका । मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरा ॥८१॥
 
दिगंबर मुने बाला । समर्था विश्व स्वामीने । परमहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥८२॥
 
ॐ हंस हंसाय विदमहे । परमहंसाय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात्‍ ॥८३॥
 
ॐ शून्य शून्याय विदमहे । परमशून्याय धिमही । तन्नो परब्रह्म प्रचोदयात ॥८४॥
 
ॐ दत्तात्रेयाय विदमहे । योगीश्वराय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात्‍ ॥८५॥
 
ॐ स्वामी समर्थाय विदमहे । परम अवधूताय धिमही । तन्नो महादत्त प्रचोदयात्‍ ॥८६॥
 
राहोनिया चराचरात । सदभक्ता दत्त रक्षित । महाशून्यी राहोनी ठेवीत । लक्ष जाणा विश्वावरी ॥८७॥
 
मेघल नामे भक्त । बालपणापासोनी भक्ती करीत । विविध अनुभव घेत । ध्यानामध्ये स्वामींचे ॥८८॥
 
सोऽहम्‍ ध्यान करी नित्य । ध्यानी दिसे दिव्य ज्योत । ज्योतीमध्ये दुर्गा दत्त । नित्य पाहा ती पाहतसे ॥८९॥
 
सदैव राही आनंदात । कालांतरे विवाह होत । कॅनडामध्ये जावोनी राहात । पती पत्नी दोघेही ॥९०॥
 
पुत्र नाम निखिल । तो जव वर्षाचा होत । घेवोनी दर्शनासी येत । आश्रमी जाणा स्वामींच्या ॥९१॥
 
वर्षाचा निखिल असत । त्यासीही स्वामी लळा लागत । सदैव पाहा राहात । स्वामी जवळी बैसोनिया ॥९२॥
 
काही दिवस राहोनी भारतात । कॅनडासी परत जात । परी निखिल स्मृतीत । दत्त राहे भरोनिया ॥९३॥
 
ऐसे असता अकस्मात । निखिल होई व्याधिग्रस्त । मेघल होई चिंताग्रस्त । काही तिसी सुचेना ॥९४॥
 
ती स्वतः डॉक्टर । वरी तज्ञसी दाखवीत । परी उतार न पडत । म्हणोनी चिंता करीतसे ॥९५॥
 
अंति स्वामींसी आठवीत । म्हणे दत्त अवधूत । तव लाडका निखिल येथ । पाहा कैसा पडलेला ॥९६॥
 
एक मास झाला । परी औषधा न गुण आला । देवा याच्या आजाराला । बरे करावे आपण हो ॥९७॥
 
स्मरणगामी श्रीदत्त । तात्काळ तेथे प्रकटत । डोक्यावरी ठेवीत । वरदहस्त निखिलच्या ॥९८॥
 
तात्काळ निखिल बरा होत । तो मातेसी सांगत । आले होते श्रीदत्त । मला बरे करण्याला ॥९९॥
 
दिव्य निळया आकाशात । प्रकटले स्वामी श्रीदत्त । माझ्या जवळी येत । आशीर्वाद देती मजला ते ॥१००॥
 
म्हणती होशील ठणठणीत । आणि मस्तकी ठेविती हात । तात्काळ मी ठीक होत । व्याधी गेली पळोनिया ॥१०१॥
 
पुत्र मुखीची ऐकोनी मात । मेघल दोन्ही जोडी हात । म्हणे स्वामी श्रीदत्त । राही विश्वी भरोनिया ॥१०२॥
 
भक्त वत्सल तुझी कीर्ती । मज दाविली प्रचिती । वर्णावया नाही मती । दत्त हाची परब्रह्म ॥१०३॥
 
अल्पा मेघलची बहीण । येई स्वामी दर्शना कारण । स्वामी म्हणती तिज लागोन । गायत्री जप तू करी ॥१०४॥
 
आज्ञा मानोनी प्रमाण । करी गायत्री मंत्र साधन । गायत्रीदेवी दर्शन । तिसी पाहा देतसे ॥१०५॥
 
अल्पासी देवोनी दर्शन । देवी म्हणे तीज लागोन । स्वामींनी पाठविले म्हणोन । दर्शन देण्या मी आले ॥१०६॥
 
कालांतरे विवाह होत । सासरी निघोनी जात । एक पुत्र तिसी होत । पार्थ नांव ठेवितसे ॥१०७॥
 
दोन वर्षांचा असता पार्थ । ताई भेटावयासी जात । एक टक न्याहाळीत । पार्थ दीक्षितताईंना ॥१०८॥
 
जव ताई निघोन जात । अल्पा पार्थासी पुसत । तू एक टक न्याहाळीत । ‘ का ’ होतासी ताईंना ॥१०९॥
 
दोन वर्षांचा पार्थ म्हणत । कोण ताई मी न जाणत । महालक्ष्मी येवोनी जात । असंख्य देवतांसवे ॥११०॥
 
दिव्य दर्शने पार्थासी होत । जेव्हा वय तीन असत । माता जरी जप करीत । पुत्र होती भक्त ते ॥१११॥
 
असो पार्थ मोठा झाल । शाळेत जाऊ लागला । एक शिक्षिका त्याला । सांगे पाहा काय ते ॥११२॥
 
पार्थ जप करी मनात । ते ती शिक्षिका पाहत । ती पार्थासी विचारीत । काय मनात म्हणतो तू ॥११३॥
 
तो म्हणे श्रीदत्त जय दत्त । मी जप करतो मनात । तव ती त्यासी सांगत । जप करु नको म्हणोनिया ॥११४॥
 
ऐसे म्हणोनी त्यास । विचित्र मंत्र सांगत । तेणे भयंकर दृश्ये पार्थास । दिसो पाहा लागली ॥११५॥
 
हे कळता स्वामींसी । ते येती मुंबईस । जवळ घेवोनी पार्थास । दुष्टशक्ती घालविल्या ॥११६॥
 
पुन्हा दत्त मंत्र देत । दिव्य दर्शने त्यासी होत । पाच वर्षांचे वय असत । तेव्हा पाहा पार्थाचे ॥११७॥
 
तदनंतर त्यासी अनंत । देव - देवता दर्शन देत । ऐसे महात्म्य अदभुत । असे पाहा श्रीदत्ताचे ॥११८॥
 
या अध्यायाचे करिता पठण । समाधिनामे संजीवन । लागे भक्ता लागोन । मोक्षमार्गाचे साधन जे ॥११९॥
 
अमृताची आरवंटी । घातली असे गोमटी । ज्ञानीजन भरती घोटी । श्रीदत्त विजय ऐसा हा ॥१२०॥
 
॥ अध्याय चौथा ॥ ओवी संख्या १२० ॥