लातूरमधील युवतींचे गणेश मंडळ
- श्रीकृष्ण कुळकर्णी
भव्यदिव्य देखावे, भल्या मोठ्या गणेशमूर्ती, आतषबाजी, झगमगाट अशा रीतीने गणेशोत्सवाचे स्वरुप झाले असले तरी लातूरमध्ये मात्र पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे ही परंपरा जपण्याची धुरा युवतींनी आपल्या खांद्यावर पेलली आहे. काही महाविद्यालयीन युवतींनी एकत्र येऊन विजय गणेश मंडळ सुरु केले आणि यंदा या मंडळाने 12 व्या वर्षात पदार्पण केले आहे.कॉलनीतील सर्व मुले शिक्षण घेण्यासाठी तर काही नोकरीनिमित्त बाहेरगावी गेली. मग कॉलनीत गणपती कोण बसवणार ? हा प्रश्न तेथील ज्येष्ठ नागरिकांना पडला. यावेळी या युवती पुढे आल्या आणि 1997 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. गणेशाची स्थापना केवळ आरती पूजेपुरतीच न राहता त्याला सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमाचे अधिष्ठान लाभावे असा या युवतींचा प्रयत्न होता.
गणेशोत्सवासाठी वर्गणी मागताना मुली काय करणार ? असा प्रश्न सर्व लोकांच्या चेहर्यावर दिसत असताना मात्र या युवतींनी स्थापनेमागची नेमकी भूमिका स्पष्ट केली. मग लोकांनीही त्यांना शक्य तेवढी मदत केली. त्यानंतर लेझीम, झांज पथकासह गणेशाची स्थापना झाली. तेव्हापासून बारा वर्षे सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन या मंडळाने केले आहे.महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, वादविवाद अंताक्षरी यासारख्या विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. याशिवाय रक्तदान शिबीर, वृक्षदिंडी, वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम हाती घेऊन वृक्षसंवर्धन करणार्या नागरिकांचा मंडळातर्फे दरवर्षी सत्कारही केला जातो. समाजातील काही ज्वलंत प्रश्नांवर आधारीत परिसंवादाचे आयोजनही मंडळाकडून होते. प्रसारमाध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम, आपण खराखरच बदलतो आहोत का?, मुकी होत चालेली घरे अशा अनेक प्रश्नांवर मान्यवरांचे विचार मांडणारे वैचारिक व्यासपीठ म्हणूनही या मंडळाकडे पाहिले जाते 200 महिलांना एकत्र करुन मिरवणुकीत मी मराठी, स्त्री भृण हत्या सारख्या गंभीर विषयांचे पथनाटयाद्बारे सादरीकरण असते. मिरवणुकीतील झगमगाटापेक्षा अशा समाजप्रबोधनात्मक विषयांचे प्रात्यक्षिक समाजासमोर मांडण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.लोकांची आवड लक्षात घेऊन नामांकित गायकांची संगीत रजनी महाराष्ट्राची लोकधारासारखा सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच महिलांकडून अभंग, भारुडासारख्या लोककला प्रकारांचे सादरीकरण यासारख्या उपक्रमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. मंडळाच्या पदाधिकार्याकडूनही प्रत्येक कार्यक्रमाचे अत्यंत नेटकेपणाने, सुत्रबद्घरीतीने आयोजन केले जाते. सर्व मुलींच्या एकत्र विचारातून उत्तम उपक्रमांचे सादरीकरण हे या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल.आतापर्यंत अनेक प्रसारमाध्यामानी या मंडळाचे कौतुक केले आहे. मिरवणुकीतल्या शिस्तबध्द व उत्तम ससादरीकरणासाठी लायन्स क्लब व जिल्हा पोलिस कार्यालयाकडून सन्मानचिन्ह, रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मंडळाचा गौरवही करण्यात आला आहे.विजय गणेश मंडळाच्या लहानशा व्यासपीठाकडून लो. टिळकांना अपेक्षित समाजप्रबोधनाचा हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असून याचा आदर्श इतर गणेशमंडळानीही घेतला तर टिळकांच्या संकल्पाची पूर्ती होईल व उत्सवाचे खरे अंतरंग समाजा समोर येऊन तो साजरा केल्याचे आत्मिक समाधानही प्रत्येक गणेशभक्ताला मिळेल.