शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

श्री इच्छामणी गणेश

- अंजली राऊत

PRPR
मनातली इच्छा पूर्ण करतो, नवसाला पावतो, असा इच्छापूर्ती करणारा गणेश नाशिकमध्ये आहे. इच्छामणी गणेश असेच त्याचे नाव आहे. या मंदिराची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मार्च १९८६ साली करण्यात आली. श्री. चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांच्या हस्ते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. चंद्रकांत जोशी ऊर्फ दादा महाराज हे पूर्वाश्रमीचे शिक्षक होते. त्यांना अध्यात्मिक अनुभूती झाल्याने ते सत्संगाच्या मार्गावर गेले आणि त्यांनी महाराष्ट्रात २१ गणेश मंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, नाशिक, भोपाळ या ठिकाणी मंदिरे बांधण्यात आली. यातीलच एक मंदिर म्हणजे इच्छामणी गणेश मंदिर. मे २००७ मध्ये मंदिराचे नूतनीकरणाचे काम करण्यात आले. परिसरातील सेवेकरी मंडळाने विनामूल्य सेवा केली.

इच्छामणी गणेश मंदिराची स्थापना गुढीपाडवा या दिवशी झाल्याने या नवीन वर्षापासून १२ दिवस नामसप्ताह आयोजित करण्यात येतो. या काळात कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम केले जातात. तसेच इतर सणासुदीच्या दिवसात भागवत कथा, रामायण, महाभारत यावर देखील प्रवचन, कथा घेतले जाते. याप्रसंगी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. माघ शुध्द चतुर्थी या गणेश जयंती दिवशी गणेशयागाचे आयोजन करण्यात येते. या मंदिरात गणेशमूर्तीही संगमरवराची असून, गणेशाच्या आजूबाजूला रिध्दी व सिध्दीच्याही मूर्ती आहेत आणि या तीनही मूर्तींवर चांदीचे छत्र असून, मागील बाजूही चांदीची बनविण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा प्रशस्त आहे. या गाभार्‍यात विनायकी चतुर्थी व संकष्टी चतुर्थीला ५१ वेळा अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.

इच्छामणी गणेश मंदिर प्रसिध्द असून, नाशिकवासीय तर येथे दर्शनासाठी येतात. शिवाय परप्रांतीयांमधील भाविकही गणरायाचे दर्शन घेण्यात येथे येत असतात. गणेशोत्सवातील दहा दिवसही कार्यक्रम होत असतात. अशा वेळेस मंदिरात विद्युत रोषणाई, रांगोळी असे सुशोभिकरण करण्यात येते. मूर्तीला २१ दुर्वांची माळ, २१ नारळांचा हार घालण्यात येतो. यावेळेस मूर्ती अतिशय सुंदर दिसते. सकाळ व रात्री आरती करण्यात येते.