रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (14:54 IST)

देवांचे आर्किटेक्ट आणि जग निर्माण करणारे पहिले इंजीनियर विश्वकर्मा

भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत. प्रभू विश्वकर्मा यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती. 
 
विश्वकर्मा यांनी महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले, अशी मान्यता आहे. या व्रजाच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे.
 
भगवान विश्वकर्माच्या पाच मुखांपासूनच चौदा भुवने, पंचमहाभुते, पंच तन्मात्रा, पंचदेव व पंचपुत्र निर्माण झालेत. विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या पाच समाजांची ओळख आहे, ते सुतार, लोहार, सोनार, ताक्रकार व शिल्पकार असे आहे. भगवान विश्वकर्माची पाच मुले असून त्यांची नावे मनु, मय, त्वष्टा, तक्ष आणि शिल्पी अशी असून ते ब्रहार्षी होते. मनु ब्रम्हर्षीपासून सुतारांची वंशावळ सुरू झाली. मय ब्रह्मर्षीपासून तांबे, पितळ यावर कलाकारी करणाऱ्या ताम्रकारांची वंशावळ सुरू झाली. तक्ष/ दैवेज्ञ/विश्वज्ञ ब्रह्मर्षीपासून सोन्या चांदीवर कलाकारी करणाऱ्या सोनारांची वंशावळ सुरू झाली आणि शिल्पी ब्रह्मर्षीपासून दगडावर कलाकारी करणाऱ्या शिल्पकारांची वंशावळ सुरू झाली. आजही सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात.
 
शिवपुराणानुसार भगवान शंकराने पार्वतीला सांगितले की, पंचवदन भगवान विश्वकर्मा हाच परमात्मा आदिपुरूष आहे. ते सृष्टीनिर्माता आहे. त्यानेच सकंल्यानुसार सुरूवातीलचा सृष्टी निर्माण करण्यासाठी जे जे उत्पन्न करावेसे वाटत होते ते ते निर्माण करून ठेवले. 
 
भगवान विश्वकर्मा हंसावर आरूढ व शुभमुकूट धारण केलेले आहे. त्याच्या हातात कम्बासूत्र, जलपात्र, पुस्तक व ज्ञानसुत्र आहे. भगवान विश्वकर्माचे विविध अवताराचे उल्लेख श्रीमद्भागवत महापुराण, वायुपुराण, ब्रम्हांड पुराण, भविष्य पुराण, हरिवंश पुराण, स्कंद, पुराण, महाभारत आदि ग्रंथात आहेत.