बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कोणत्या देवाचा कसा करावा नामजप!

संपुर्ण विश्व स्पंदनशील आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे, मनुष्य हा सुध्दा स्पंदनाचा समूह आहे. पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुध्द आहेत तर बर्‍याच अंशी अशुध्द आहेत, तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल, तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन कृषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. 
या गोष्टींनी आपली स्पंदने शुध्द होत असतात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. 

श्रीगुरु भक्ताची अशुध्द स्पंदने (पाप व दु:खे) खेचून घेत असतात म्हणून श्रीगुरुंच्या सहवासाची आस घरावी. 
नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.
 
एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.
 
एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय.
 
शिवाचा नामजप-
‘ॐ नम: शिवाय।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.
 
 
श्रीरामाचा नामजप-
‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ‘जय राम’ व त्यानंतरचा ‘जय जय’ मधील दुसरा ‘जय’ हे शब्द म्हणतांना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ‘श्रीरामा, मी तुला पूर्णत: शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.
 
 
मारुतीचा नामजप-
' हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट' हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.
 
 
गणपतीचा नामजप-
‘ॐ गं गणपतये नम:।’ (श्री गणेशाय नम:) हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नम:’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.
 
 
दत्ताचा नामजप-
‘श्री गुरुदेव दत्त।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा.

 
श्रीकृष्णाचा नामजप-
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ या नामजपातील ‘नमो’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. ‘भगवते’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘वासुदेवाय’ हा शब्द म्हणावा.
 
नामस्मरणाचे फायदे-
* एकाग्रता वाढते
* चित्तशुद्ध होते
* वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते
* दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.
* मन कायम आनंदी राहते.
* सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात.