शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा आरंभ दिन

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला (वर्षाला) नाव दिलेले असते. नवीन शके 1940 या संवत्सराचे नाव विलंबी संवत्सर असे आहे.
 
शालिवाहनाने हुणांवर विजय मिळविलेला हा दिवस. सर्वसामान्य जनतेला हाताशी धरून केलेल्या या युद्धामध्ये मिळवलेल्या विजयानंतरलोकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली असल्याने एक ऐतिहासिक महत्त्व या गुढीपाडव्याला आहे.
 
रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येमध्ये दाखल झाले. त्यांचे स्वागत गुढ्या, तोरणे उभे करुन केले गेले. गुढी उभी करणे हे विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
 
पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करू या. संकल्पाची नवी गुढी उभारू या. आपला परिसर स्वच्छ ठेवू या, असेही सामाजिक आशयाचे संकल्प करावेत.
 
ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
 
ब्रह्मध्वज नस्तेऽस्तु सर्वाभिष्ट फलप्रद ।
 
प्राप्तेऽस्न्वित्सरे नित्यं मद्‌गृहे मंगलं कुरू ॥
 
ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करुन नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. 
 
गुढी उभी करण्यासाठी किंवा उतरवून ठेवण्यासाठी स्वतंत्र मुहूर्ताची वेळ नसते तसेच राहुकाल आदींचा याच्याशी संबंध नसतो.
 
शके 1940, विलंबी संवत्सराविषयी काही-
 
* 18 मार्च 2018 ते 5 एप्रिल 2019 असा ह्या शकाचा कालावधी आहे.
 
* 16 मे ते 13 जून 2018 या दरम्यान अधिक ज्येष्ठ महिना आहे. त्यामुळे शके 1940 हे वर्ष 13 महिन्यांचे आहे.
 
* या शकामध्ये केवळ 3 गुरुपुष्यामृत योग आहेत व 3 अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे.
 
* गेल्यावर्षी गणपतीस निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या असा जरी निरोप दिला असला तरी या वर्षी गणपती बाप्पा थोडे उशिरा म्हणजे 13 सप्टेंबर रोजी येणार आहेत आणि 23 सप्टेंबरला अनंतचतुर्दशी आहे.
 
* नोव्हेंबर 6, 7, 8 व 9 असे 4 दिवस दिवाळी आलेली आहे.
 
* या वर्षामध्ये 2 चंद्रग्रहणे आणि 3 सूर्य ग्रहणे अशी एकूण 5 ग्रहणे आहेत. 
 
मोहन दाते
 
पंचांगकर्ते