बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:48 IST)

कार्तिक माहात्म्य - अध्याय १

॥ श्रीगणेशायनमः ॥
एकदां नारद देवाधिदेव भगवंताच्या दर्शनाकरितां स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले ॥१॥
नंतर भक्तीनें कृष्णाची पूजा करुन कृष्णाला एक पारिजातकाचें फूल देते झाले ॥२॥
कृष्णांनी तें फूल घेऊन रुक्मिणीला दिलें; इतक्यांत नारदांनीं त्वरेनें जाऊन ती सर्व हकीगत सत्यभामेला सांगितली. मग भगवान् कृष्ण सत्यभामेच्या गृहीं गेले तों आपली प्रिया दुःखित होऊन एकीकडे बसली आहे असें त्यांनीं पाहिलें ॥३॥४॥५॥
तेव्हां भगवान् हसून म्हणाले हे प्रिये ! तुला कशापासून दुःख झालें तें मला सांग ॥६॥
तेव्हां रागानें जिचे ओंठ थरथर कांपत आहेत अशी सत्यभामा म्हणाली कीं, पारिजाताचें फूल मला न देतां तुम्हीं रुक्मिणीला कां दिलें ॥७॥
तेव्हां वासुदेव बोलले कीं, तूंही माझी आवडती आहेस. तुलाही मी पारिजाताचें पुष्प देईन; नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरितां सत्यभामेसहवर्तमान गरुडावर आरोहण करुन स्वर्ग लोकास जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला म्हणाले, हा पारिजात वृक्ष तुल घे; तूंच मला फार प्रिय आहेस ॥८॥९॥१०॥
पुढें एकदां सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली कीं, हे नारदा, ॥११॥
जेणेंकरुन श्रीकृष्णाचा व माझा केव्हांही वियोग होणार नाहीं असा उपाय मला सांग. तेव्हां नारद सत्यभामेला म्हणाले ॥१२॥
जें दान करावें त्याचाच उपभोग मिळतो; याकरितां कृष्णच दान दे म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधींच होणार नाहीं ॥१३॥
बरें आहे, असें म्हणून सत्यभामेनें नारदाला कृष्ण दान दिला. नंतर कृष्णास घेऊन निघाले ॥१४॥
तेव्हां सत्यभामा नारदास म्हणाली कीं, तूं याच लोकीं मला कृष्णांचा वियोग केलास ॥१५॥
मग परलोकीं त्यांची प्राप्ति कशी होईल ? तेव्हां नारद हसून म्हणाले ॥१६॥
जर तराजूमध्यें श्रीकृष्णास तोलून त्यांचे भारंभार द्रव्य ( सोनें ) मला देशील तर मी ह्याला परत देतों ॥१७॥
तेव्हां सत्यभामेनें घरांतील सर्व जिन्नस डागिने वगैरे वजनांत घातले तरी वजन पुरें होईना ॥१८॥
तेव्हां सत्यभामेनें श्रीकृष्णाच्या आज्ञेनें एक तुलसीपत्र आणून तराजूंत टाकिलें ॥१९॥
व त्या तुलसीपत्राचे बरोबर भक्तवत्सल कृष्णाचें वजन झालें व तेवढें तुलसीपत्रच नारदांनीं घेतलें ॥२०॥
व भगवंताची स्तुति करुन नारद स्वर्गलोकास गेले ॥२१॥
नारद कृष्णास विचारुन गेल्यानंतर आनंदानें जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, ॥२२॥
मी धन्य आहें, कृतकृत्य आहें, माझें जन्म सफल आहे, व माझे जन्मदाते आईबापही धन्य आहेत ॥२३॥
ज्यांनीं मला त्रैलोक्यांत दैववती अशी उत्पन्न केली; कारण तुम्हांला तुमच्या सोळा हजार स्त्रियांमध्यें मीच प्रिय आहे ॥२४॥
म्हणूनच मी भगवान् कल्पवृक्षासह यथाविधि नारदास दान दिला ॥२५॥
पृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाहींत तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझे आंगणात आहे ॥२६॥
त्रैलोक्यपति देवाची मी अति प्रिया आहें. म्हणून तुम्हांला थोडें विचारावें अशी इच्छा आहे ॥२७॥
जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्तारानें सांगा म्हणजे तें मी ऐकून पुन्हां आपलें हित करीन. म्हणजे त्यायोगानें कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाहीं ॥२८॥
सूत म्हणाले - असें प्रियेचें वाक्य ऐकून कृष्ण हांसले ॥२९॥
व तिचा हात धरुन कल्पवृक्षाखालीं आले व सेवक लोकांना दूर केलें ॥३०॥
प्रियेच्या अतिप्रीतीनें संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान कृष्ण हंसत सत्यभामेस हांक मारुन म्हणाले, ॥३१॥
हे प्रिये, सोळा हजार स्त्रियांमध्यें तूंच एक मला प्राणाप्रमाणें अति प्रिय आहेस ॥३२॥
तुझ्याकरितां इंद्राशीं व सर्व देवांशीं मी विरोध केला ॥ तूं पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक ॥३३॥
सूत म्हणतात - श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरितां गरुडावर बसून जेव्हां इंद्र लोकास गेले ॥३४॥
व इंद्रापाशीं कल्पवृक्ष मागितला; तो इंद्र देत नाहीं म्हणाला. तेव्हां गरुड रागावून त्याकरितां युद्ध करुं लागला ॥३५॥
गरुडानें गोलोकीं गाईबरोबरही युद्ध केलें; त्यावेळीं त्याच्या चोंचीनें तुटून गाईचे कान व शेंपूट व रक्त भूमीवर पडलें ॥३६॥
त्या तिहींपासून तीन वस्तु झाल्या; कानापासून तमाखू, शेंपटापासून गोमी ॥३७॥
व रक्तापासून मेंदी झाली; मोक्ष इच्छिणारानें या तिन्ही वस्तु दूर कराव्या सेवन करुं नयेत ॥३८॥
गाईनीं रागानें गरुडास शिंगांनीं प्रहार केला तेव्हां गरुडाची तीन पिसे पृथ्वीवर पडली. एकपासून नीलकंठ भारद्वाज, दुसर्‍यापासून मोर व तिसर्‍यापासून चक्रवाक उत्पन्न झाले ॥३९॥४०॥
या तिहींच्या दर्शनानें शुभ फळ मिळतें; याकरितां ही गोष्ट तुला सांगितली ॥४१॥
गरुडाच्या दर्शनाचें जें फळ तें यांच्या दर्शनानें मनुष्यास मिळतें व वैकुंठ प्राप्त होतो ॥४२॥
हे प्रिये, जें देतां येत नाहीं, करितां येत नाहीं किंवा सांगतां येत नाहीं तें सर्व तुजकरितां मी करितों; तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाहीं ? ॥४३॥
तुझ्या मनांत असेल तें विचार. सत्य भामा म्हणाली ॥ मीं पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केलें होतें ॥४४॥
कीं ज्याच्या योगानें मी मनुष्य असून मनुष्यापेक्षां श्रेष्ठ झालें व तुमची अधोगी पत्नी होऊन गरुडावर बसून ॥४५॥
तुमच्या बरोबर इंद्रादिक देवतांच्या स्थानाला जातें ॥ म्हणून विचारतें कीं, पूर्वीं मीं काय पुण्य केलें ? ॥४६॥
पूर्वजन्मीं मी कोण होतें, कोणाची कन्या होतें तें सांगा ॥ कृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मीं तूं काय व्रत केलेंस तें सांगतों. कृतयुगाचे शेवटीं मायापुरीमध्यें ॥४७॥४८॥ अत्रिगोत्री देवशर्मा या नांवाचा ब्राह्मण रहात होता. तो वेदवेदांगें पढलेला असून सूर्याचें व्रत करणारा, अग्नि व अतिथि यांची सेवा करणारा असा होता ॥४९॥
तो नित्य सूर्याची आराधना करणारा असल्याकारणानें प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता; त्याला वृद्धपणीं गुणवती नावाची मुलगी झाली ॥५०॥
त्याला पुत्र नसल्यामुळें आपले चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणें मानीत होता व तो शिष्यही त्याला बापाप्रमाणें मानी ॥५१॥
ते दोघे कोणे एके दिवशी दर्भ समिधा आणण्याकरितां अरण्यांत गेले व हिमालयाचे पायथ्याचे वनांत इकडे तिकडे फिरुं लागले ॥५२॥
इतक्यांत त्यांनीं भयंकर राक्षस येत आहे असें पाहिलें व भयानें घाबरुन पळण्यास असमर्थ झाले असतां ॥५३॥
त्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसानें त्या दोघांस ठार मारलें त्या क्षेत्राच्या पुण्यानें व त्यांच्या धर्मशीलपणानें त्यांना माझ्या पार्षदगणांनीं वैकुंठास नेले. त्यांनी आमरण सूर्याची पूजा वगैरे करुन जें पुण्य केलें ॥५४॥५५॥
तेणेंकरुन मी प्रसन्न झालों शंकर, सूर्य, गणपती, विष्णु व देवी यांचे उपासक ॥५६॥
जसें मेघांचें पाणी अखेर समुद्रासच मिळतें त्याप्रमाणें मलाच येऊन मिळतात. मी एकच असून नांवांनीं व कृतीनें पांच प्रकारचा झालों आहें. ॥५७॥
जसें एकाद्या व्यक्तीला [ देवदत्ताला ] त्याचे पुतण्ये, भाचे, नातू, मुलगे वगैरे निरनिराळ्या काका, मामा इत्यादि नांवांनी हाक मारतात तद्वत् ॥५८॥
पुढें ते दोघे वैकुंठात राहाणारे, विमानांत बसून फिरणारे, माझ्याप्रमाणें रुप धारण करणारे, माझ्याजवळ रहाणारे, दिव्य स्त्रिया व चंदनादि भोग भोगणारे असे झाले ॥५९॥
॥ इति श्रीपद्मपुराणे कार्तिकम० प्रथमोध्यायः ॥१॥