गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (11:34 IST)

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय तेविसावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे दयानिधी ॥ ऐका सेवकांची विनंती ॥ कथा दावी शीघ्रगती ॥ पुण्यपावन जी असें ॥१॥
धर्माचे वाक्य ऐकोन ॥ कृष्ण म्हणे तयालागुन ॥ स्त्रिया करिती व्रत हे पूर्ण ॥ तयासी सौभाग्य प्राप्त असे ॥२॥
कलावती नामे स्त्री जाण ॥ तिनें व्रत केलें पावन ॥ सौभाग्यप्राप्ती तियेलागुन ॥ पुत्रपौत्र धनधान्य ॥ झालें प्राप्त निर्धारें ॥३॥
धर्म म्हणे कृष्णासी ॥ कलावती कोण वंशी ॥ सौभाग्यप्राप्त तियेसी ॥ कशी झाली तें सांगा ॥४॥
श्रीकृष्ण म्हणे धर्मा ऐक ॥ हे कथा दोष दाहक ॥ चंद्रकेतु नाम विख्यात ॥ कर्नाटक देशीं रहात ॥५॥
राज्य करी नीति करुन ॥ गौ ब्राह्मणाचें प्रतिपालन ॥ चंद्रलेखा नामेंकरुन ॥ स्त्री त्याची पतिव्रता ॥६॥
ऐसा राजा पुण्यपवित्र ॥ न होय तयासी पुत्र प्राप्त ॥ कालेंकरुन कन्यारत्न ॥ एक तयासी झालें पैं ॥७॥
ती कन्या परम सुलक्षण ॥ गुणें परम संपन्न ॥ शरीर तिचें सुकुमार पूर्ण ॥ कमळा सारिखे नेत्र तिचे ॥८॥
शुध्द बिजेपासून ॥ जैसा चंद्र वाढे पूर्ण ॥ तैसी ती कन्या सगुण ॥ दिनेदिन वाढत ॥९॥
नाम तियेचे कलावती ॥ स्वरुपे जैसी दमयंती ॥ ऐसी कन्या देखोन भूपती ॥ परम संतोष वाटत ॥१०॥
कलावती उपवर देखोनी ॥ चिताग्रस्त राजा मनीं ॥ हे कन्या सुलक्षणी ॥ कोणालागीं द्यावी आतां ॥११॥
ऐसी चिंता करितां जाण ॥ कोणी एक ब्राह्मण आला जाण ॥ राजे तयासी सन्मानून ॥ आसनावरी बैलविला ॥१२॥
दोन्ही हस्त पुढें जोडून ॥ ब्रह्माणासी करी नमन ॥ काय इच्छा तुम्हांलागुन ॥ ती आम्हालागीं सांगावी ॥१३॥
ऐसें राजाचे वचन ॥ ब्राह्मणें केलें श्रवण ॥ ब्राह्मण बोले तयांलागुन ॥ सावधा चित्तें ऐक भूपा ॥१४॥
मी केवळ अनाथदिन ॥ माय बाप गेले मरून ॥ यालागीं राया मी जाण ॥ वास्तव्य करीन तुझे घरीं ॥१५॥
तेव्हां राजे तयासी ॥ ठेविले आपुल्या घरासी ॥ ब्राह्मण बहु तेजोरासी ॥ राजा बहुत संतोषला ॥१६॥
कलावती कन्या जाण ॥ अर्पिली ब्राह्मणालागून ॥ विधियुक्त झाले लग्न ॥ तेणें सुख रायासी ॥१७॥
ते वधुवरें दोघेंजण ॥ रायें ठेविलीं गृहालागून ॥ तो गौतमऋषी येऊन ॥ राजया सन्मुख बैसला ॥१८॥
गौतम ऋषी येतां जाण ॥ रायें त्यासी सन्मानून ॥ शोडशोपचारें पूजा करुन ॥ राजा ऋषीस पुसत ॥१९॥
राजा म्हणी गौरमासी ॥ कन्या माझी लावण्यराशी ॥ इचा स्वामी निश्चयेसी ॥ पहा तुम्ही सादरें ॥२०॥
चंद्रकेतुचें वचन ॥ ऋषीचें ऐकिलें सावधान ॥ मग आपुलें मस्तक जाण ॥ कंपविता पै झाला ॥२१॥
ऋषीचे सर्व चरित्र ॥ चंद्रकेतू स्वयें पहात ॥ मग ऋषीलागं पुसत ॥ कां मान तुम्ही हालविली ॥२२॥
कन्या आणि जामातासी ॥ काय भविष्य उभयतांसी ॥ पुढें होणार ते निश्चयेसीं ॥ सांगावें हो गुरुवर्या ॥२३॥
ऐसें राजाचें वचन ॥ गौतमें करुन श्रवण ॥ जामात आणि कन्या सगुण ॥ जोडा सुंदर बहु असे ॥२४॥
स्त्रीपुरुष जेथें उत्तम ॥ तेथें विघ्न येतसे परम ॥ यालागी संकष्ट जाण ॥ मजलागीं प्राप्त झालें ॥२५॥
इतिश्रीभविष्योत्तर पुराणें ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ त्रयोविंशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय २३ वा समाप्त: ॥