शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (08:52 IST)

श्री शंकर महाराज माहिती

श्री शंकर महाराज आधुनिक काळाचे सत्पुरुष ज्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. 
 
महाराजांनीच एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो! नावही ‘शंकर’. महाराज खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावे. 
 
नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाच्या गावात चिमणाजी नावाचे निसंतान गृहस्थ राहात होते. शिवाचे भक्त चिमणाजींना एकदा स्वप्नात दृष्टान्त झाला की रानात जा तर तुला बाळ मिळेल त्याला घेऊन ये. ते दृष्टान्ताप्रमाणे इ.स. 1785 च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात गेले आणि त्यांना तिथे दोन वर्षांचा बाळ मिळाला. शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर असे ठेवले. शंकर हे माता-पिता यांच्याजवळ काही वर्षे राहून त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देऊन बाहेर पडले. 
 
श्री शंकर महाराजांना एक नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही.  ते अनेक नावांनी वावरत. सुपड्या, कुंवरस्वामी, गौरीशंकर, देवियाबाबा, रहिमबाबा, टोबो, नूर महंमदखान, लहरीबाबा, गुरुदेव अशा नावानीही त्यांना ओळखले जातं. नावाप्रमाणेच त्यांचे रूपही अनेक, काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. महाराजांचे डोळे मोठे होते आणि ते अजानुबाहू होते. त्यांची गुडघे वर करुन बसण्याची विशेष पद्धत होती.
 
खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते अशात ते कधी एका स्थानी थांबत नसत. त्रिवेणी संगम, अक्कलकोट, नाशिक, त्र्यंबकेश्र्वर, नगर, पुणे, औदुंबर, तुळजापूर, सोलापूर, हैद्राबाद, श्रीशैल अशा स्थानी त्यांची भटकंती असायची.
 
श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत- सिद्धीच्या मागे लागू नका... त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी उपाधी लावल्या नाहीत. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते, ते चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. ते म्हणत की मला जाती, धर्म काही नाही. ते सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. त्यांच्या शिक्षणाबद्दल कुणास ठाऊक पण काही देखावा करणार्‍या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली. 
 
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत.
 
भक्तांना ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. पुण्याच्या धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.