शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय २२

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
आजि कल्पतरूच्या वृक्षाभोंवते ॥ येऊनि बैसले सभाग्य श्रोते ॥ म्हणोनि मनोरथ अपुरते ॥ कोनाचेही न राहती ॥१॥
कीं लोह लागतां परिसास काळिमा कांहींच न राहे तयासी ॥ तेवीं भक्तकथा ऐकतां सुरसी ॥ आशंका मनीं न राहे ॥२॥
नातरी पयोब्धीचें करितां स्नान ॥ सकळही तीर्थें घडती जाण ॥ कीं वासरमणीचे प्रकाशेंकरून ॥ सकळ पदार्थ दिसती ॥३॥
कीं सुधारस लाधतांचि हातीं ॥ सकळ रोगव्याधि पळती ॥ तेवीं भक्तकथा जे ऐकती ॥ त्यांसी भवदुःख चित्तीं बाधेना ॥४॥
नातरी प्रसन्न जाहलिया निशाकरा ॥ त्यासी न लागे जेवीं उबारा ॥ तेवीं भक्तकथा ऐकतां चतुरा ॥ कामक्रोध अंतरा न येती ॥५॥
मागिले अध्यायीं निरूपण ॥ देवें केलें जनीचें स्तवन ॥ आश्चर्य करूनि संतजन ॥ जयजयकारें गर्जिन्नले ॥६॥
हें निरूपण ऐकूनि कानीं ॥ प्रश्न केला श्रोतयांनीं ॥ म्हणती जनीसवें जोडला चक्रपाणी ॥ संगतीकरूनि नामयाच्या ॥७॥
तरी याचा संप्रदाय असे कोण ॥ कळला नाहीं आम्हांकारण ॥ ऐसा संतजनीं केला प्रश्न ॥ तरी तेंचि निरूपण अवधारा ॥८॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ शंकर बैसले क्षीरसागरीं ॥ श्रीरामस्वरूप आठवूनि अंतरीं ॥ नामस्मरण करिताती ॥९॥
मग पार्वती पुसे कैलासनाथा ॥ तुझी कोणाचें नाम जपतां ॥ तुम्हां वरिष्ठ देव कोणता ॥ संशय हाचि मज वाटे ॥१०॥
ऐसें ऐकूनियां उत्तर ॥ पार्वतीस म्हणे सर्वेंश्वर ॥ मज वरिष्ठ दैवत थोर ॥ जानकीवर श्रीराम ॥११॥
विरिंचि विष्णु भवानी ॥ मजसहित जाहले त्यापासोनी ॥ तेंचि स्वरूप आठवूनि मनीं ॥ जपतों निशिदिनीं नाम त्याचें ॥१२॥
ऐसें बोलतां त्रिपुरांतका ॥ मनांत आश्चर्य करी अंबिका ॥ म्हणे मी अर्धांगीं असतां देखा ॥ नाहीं विवेका आठविलें ॥१३॥
कमळिणीच्या पुष्पाजवळ ॥ दर्दुरी असतां सर्वकाळ ॥ परी त्यांतेल मकरंत अति निर्मळ ॥ तीस न कळे सर्वथा ॥१४॥
कीं मृगनाभींत कस्तूरी असोनी ॥ तो वायांचि फिरे रानोरानीं ॥ तेवीं शंकरांगीं ज्ञान असोनी ॥ तें मजलागोनि कळेना ॥१५॥
मग जोडोनि दोनी कर ॥ नीलकंठासी केला नमस्कार ॥ म्हणे तुम्ही शुद्ध करून अंतर ॥ जपतां रघुवीर अहर्निशीं ॥१६॥
तें आपुलें जीवींचें निजगुज ॥ कृपा करूनि सांगावें मज ॥ वचन ऐकूनि कैलासराज ॥ बोलती सहज निजप्रीतीं ॥१७॥
एकांत देखोनि ते अवसरीं ॥ पार्वतीस म्हणे त्रिपुरारी ॥ मी जपतों जयासी अंतरीं ॥ तें तुज निर्धारीं सांगतों ॥१८॥
मग मस्तकीं ठेवूनि अभयकर ॥ उपदेश करी श्रीशंकर ॥ तों पार्वतीस निद्रा लागली फार ॥ विवेक साचार आठवेना ॥१९॥
उपदेश करितां धूर्जटी ॥ तेव्हां असावध होती गोरटी ॥ गर्भ होता मत्स्यीचें पोटीं ॥ त्याणें हुंकार दिधला ॥२०॥
क्षीरकल्लोळाच्या आंत ॥ मकरीचें उदरीं होता गुप्त ॥ त्याणें ऐकूनि अकस्मात ॥ आठव चित्तीं धरियेला ॥२१॥
जेवीं कयाधु होती बंदिखानीं ॥ तेथें अकस्मात आले नारदमुनी ॥ उपदेश देतां कृपेंकरूनी ॥ तो प्रल्हादानें गर्भांत ऐकिला ॥२२॥
तेवीं पार्वतीसी सांगतां मदनारी ॥ तो शब्द पातला मकरोदरीं ॥ तों मत्स्येंद्रनाथ ते अवसरीं ॥ विश्वोद्धारी जन्मला ॥२३॥
तो साक्षात् शंकर अवतारू ॥ कीं वैराग्याचा महामेरू ॥ कीं निजबोधाचा सागरू ॥ तो जगद्गुरु अवतरला ॥२४॥
जो ब्रह्मज्ञानीं अति दक्ष ॥ जो सायुज्यदानीं कल्पवृक्ष ॥ कीं सर्व जीवांचा अंतरसाक्ष ॥ कमलदलाक्ष दूसरा ॥२५॥
कीं निर्गुणाचें निजमंदिर ॥ कीं तो चैतन्याचाचि आकार ॥ कीं पौर्णिमेचा निशाकर ॥ वाढे साचार या रीती ॥२६॥
तो देहीं असोनि वेगळा ॥ कीं परब्रह्मचि निजपुतळा ॥ कीं तो उन्मनीचा जिव्हाळा ॥ प्रकटलासे भूमंडळीं ॥२७॥
तो उपजतांचि मातेच्या उदरांतून ॥ नाहीं विसरला सोहंध्यान ॥ न लागतां अविद्याप्रभंजन ॥ सत्वर येथून निघाला ॥२८॥
विचार करितां निजमनीं ॥ म्हणे सकळ तीर्थें पाहावीं नयनीं ॥ मग मत्स्येंद्रनाथ तेथोनी ॥ गमन करी स्वइच्छा ॥२९॥
ग्रामांत करूनि भिक्षाटन ॥ मिळेल तैसें भक्षावें अन्न ॥ मागुती अरण्यांत जाऊन ॥ एकांतस्थानीं बैसावें ॥३०॥
ऐसी असतां उदासवृत्ती ॥ द्वादश वर्षें क्रमिलीं निरुतीं ॥ तो अकस्मात एके नगराप्रती ॥ सहज स्थितीं पातले ॥३१॥
भिक्षा मागतां घरोघरीं ॥ कोठें न टिके निमेषभरी ॥ तंव एका सावकाराचें मंदिरीं ॥ अकस्मात पातला ॥३२॥
अलख म्हणोनि द्वारापासीं ॥ साद घाली अति वेगेंसीं ॥ म्हणे भिक्षा असली तरी त्वरेंसीं ॥ आणीं माते झडकरी ॥३३॥
मंजुळ स्वर ऐकतां कानीं ॥ सावकारकांता विस्मित मनीं ॥ म्हणे धन्य अतीताची जननी ॥ ऐसें निधान प्रसवली ॥३४॥
बाहेर येतां भिक्षा घेऊनी ॥ तों दिव्य स्वरूप देखिलें नयनीं ॥ दोन मुद्रिका घातल्या कर्णीं ॥ नक्षत्राऐशा तळपती ॥३५॥
सुवर्णाऐसी सुंदर कांती ॥ त्यावरी चर्चिली शुभ्र विभूती ॥ कटीं मेखळा विराजती ॥ नयन शोभती आकर्ण ॥३६॥
ऐसें स्वरूप दृष्टीं देखोन ॥ नमन केलें प्रीतीकरून ॥ म्हणे स्वामी कोणीकडून ॥ केलें आगमन मज सांगा ॥३७॥
ऐकोनि मत्स्येंद्र बोले वाचा ॥ शून्य निरंजन देश आमुचा ॥ जाणता असेल तो दैवाचा ॥ योगसुखाचा अधिकारी ॥३८॥
सावकरकांता बोले वचन ॥ मजला नाहीं पुत्रसंतान ॥ घरीं सर्व संपत्ति असोन ॥ मंदिर शून्य दिसताहे ॥३९॥
चंद्रावांचूनि जैसी यामिनी ॥ कीं वृक्षावांचूनि बुभुक्षित मेदिनी ॥ कीं जीवन नसतां सरिता नयनीं ॥ भयासुर दिसताहे ॥४०॥
मेघावांचूनि पर्जन्यकाळ ॥ वायां जाय जैसा निष्फळ ॥ कीं शक्ति नसतां शरीर स्थूळ ॥ व्यर्थचि काय वाढोनि ॥४१॥
पराक्रमेंविण जैसा नृपती ॥ कीं करणीं नसतां शास्त्रव्युत्पत्ती ॥ स्नेहसूत्राविण दीपक ज्योती ॥ सोज्ज्वळ न दिसे सर्वथा ॥४२॥
प्रारब्धाविण चातुर्यकळा ॥ कीं जीवनाविण लाविला मळा ॥ तेवीं संतानाविण संपत्तिसोहळा ॥ व्यर्थचि दिसोन येतसे ॥४३॥
तरी जेणें वाढेल संतानवृद्धी ॥ ऐसी मजला सांगावी बुद्धी ॥ वचन ऐकूनि एकांतसंधी ॥ मत्स्येंद्रनाथ संतोषले ॥४४॥
मग निजमुखें मंत्रूनि विभूती ॥ तत्काळ दिधली तिचे हातीं ॥ म्हणे ही भक्षितांचि तुजप्रती ॥ पुत्र होईल निर्धारें ॥४५॥
जो विष्णुअवतार साक्षात ॥ दृष्टीं देखसी मूर्तिमंट ॥ कोणासी न सांगता हे मात ॥ साधीं कार्यार्थ आपुला ॥४६॥
ऐसें सांगून मत्स्येंद्र जती ॥ निधोन गेला सत्वरगती ॥ सावकारकांतेनें विभूती ॥ नेऊनि ठेविली देव्हारां ॥४७॥
मग बोलावूनि आपुल्या मैत्रिणी ॥ म्हणे माझें निजगुण ऐका साजणी ॥ एक अतीत येतां आमुचें अंगणीं ॥ भिक्षा घेऊनि मी गेलें ॥४८॥
परम तेजस्वी देदीप्यमान ॥ उदास विरक्त पवित्र पूर्ण ॥ ऐसें स्वरूप दृष्टीं देखोन ॥ संतोष मनीं वाटला ॥४९॥
संतान नाहीं माझें पोटीं ॥ ही त्यासी निवेदन केली गोष्टी ॥ मग तेणें पाहून कृपादृष्टीं ॥ मंत्रोनि विभूति दिधली ॥५०॥
म्हणे हें भक्षितांच जाण ॥ तुजला होईल पुत्रनिधान ॥ ऐसें सांगूनि मजकारण ॥ आपण गेला सत्वर ॥५१॥
हे सत्य कीं असत्य करणी ॥ यथार्थ सांगा मजलागूनि ॥ तुम्हांवांचूनि झिवलग कोणी ॥ आणिक साजणी दिसेना ॥५२॥
मैत्रिणी म्हणती ऐक बाई ॥ कानफाट्यांचा विश्वास कायी ॥ नाना चेटकें करूनि पाहीं ॥ मनुष्य लवलाहीं भुलविती ॥५३॥
जरी विश्वास धरसील त्यांच्या बोला ॥ तरी मुकशील आपुल्या संसाराला ॥ आयुष्य चिंतीं निजभ्रताराला ॥ प्रपंच भला त्याचेनि ॥५४॥
कानफाटे देवोनि विभूती ॥ श्वान करूनि मागें हिंडविती ॥ रात्रीं कांता करून भोगिती ॥ ऐसी रीति तयांची ॥५५॥
ऐसें बोलोनि नानापरी ॥ विकल्प घातला तिचें अंतरीं ॥ म्हणे विभूति घेऊनि झडकरी ॥ देईं टाकून अग्नींत ॥५६॥
ऐकोनि शेजारणींचें वचन ॥ सासूसुनांत होय भांडण ॥ बंधुबंधूंत वैर पडोन ॥ विभक्त टाकिती मायबापां ॥५७॥
प्रत्यक्ष हानि जनामाजी ॥ गृहकलह हा समूळ करी जी ॥ जेवीं क्षीरामाजी पडतां कांजी ॥ नाश होय तत्काळ ॥५८॥
जैसें डांकाचे संगतीकरून ॥ सुवर्ण होय तत्काळ हीन ॥ तेवीं कुलवंतीसी कुलक्षण ॥ परबुद्धीनें येतसे ॥५९॥
मग मत्स्येंद्रनाथाची विभूत ॥ तत्काळ टाकिली चुलीआंत ॥ जेवीं विष म्हणोनियां अमृत ॥ खडकावरी रिचविलें ॥६०॥
कीं वेदांतपुस्तक सांपडलें ॥ तें कोकशास्त्र म्हणोनि टाकिलें ॥ कीं मुक्ताफळ भिरकाविलें ॥ कांचमणि म्हणोनि ॥६१॥
कीं कल्पतरूचें निज बीज ॥ अग्नीमाजी टाकिलें सहज ॥ नातरी सागराची आत्मजा ॥ इंदिरा बळेंचि भोवंडिली ॥६२॥
कीं यज्ञाचा पुरोडाश लाधला ॥ तो कैकेयीनें विकल्पें दवडिला ॥ तेवीं मत्स्येंद्रनाथें प्रसाद दिधला ॥ तो नाहीं भोगिला प्रारब्धें ॥६३॥
ऐसिया गोष्टीस पुढती ॥ द्वादश वर्षें क्रमिलीं निगुतीं ॥ तों फेरी करून मत्स्येंद्र जती ॥ अकस्मात पातले ॥६४॥
स्वेच्छा हिंडतां नगरांतरीं ॥ आले सावकाराचें घरीं ॥ अलख म्हणोनि द्वारीं ॥ साद घाली तेधवां ॥६५॥
शब्द ऐकतां गृहस्वामिनी ॥ तत्काळ आली भिक्षा घेऊनी ॥ दृष्टादृष्टी होतां ते क्षणीं ॥ मागील आठवणी पडियेली ॥६६॥
मत्स्येंद्र म्हणे तियेप्रती ॥ तुज मंत्रोनि दिधली विभूती ॥ तो पुत्र सत्बरगती ॥ आम्हांप्रती भेटवीं ॥६७॥
ऐकोनि सावकारपत्नीं ॥ भयभीत जाहली मनीं ॥ म्हणे यर्थार्थ सांगतां यालागूनी ॥ करील शापोनि भस्म येथें ॥६८॥
मग मौन धरूनि न बोले कांहीं ॥ मत्स्येंद्र म्हणे सांगें लवलाहीं ॥ विभूति भक्षिली किंवा कोणे ठायीं ॥ टाकोनियां दिधली ॥६९॥
यावरी म्हणे सावकारकांता ॥ यथार्थ वचन ऐका आतां ॥ परबुद्धि कानीं ऐकतां ॥ विकल्प चित्ता पातला ॥७०॥
कांहीं कृत्रिम असेल चित्तीं ॥ म्हणोनि चुलींत टाकिली विभूती ॥ ऐसी प्रारब्धाची गती ॥ प्रजापतीनें लिहिलीसे ॥७१॥
मत्स्येंद्र म्हणे ते समयीं ॥ राख टाकिली कवणे ठायीं ॥ तें सत्वर सांग लवलाहीं ॥ संकोच कांहीं न धरितां ॥७२॥
म्हणे कृषीवलें खाणोनि खात ॥ नेली ते जागा विस्तीर्ण बहुत ॥ द्वादश वर्षेंपर्यंत ॥ गोंवर टाकितों ते ठायीं ॥७३॥
मग तत्काळ बाहेर जाऊनी ॥ तें स्थळ दिधलें दाखवूनी ॥ म्हणती येथेंचि राख बहुत दिनीं ॥ टाकीत असों स्वामिया ॥७४॥
तेव्हां उकरड्यावरी जाऊनि त्वरित ॥ उभें ठाकिले मत्स्येंद्रनाथ ॥ अलख म्हणतांचि त्वरित ॥ नवल अद्भुत वर्तलें ॥७५॥
गुरुजी आदेश म्हणूनी ॥ भूमींतूनि उठला प्रतिध्वनी ॥ ऐसें ऐकतां सकळ जनीं ॥ आश्चर्य मनीं करिताती ॥७६॥
मग मत्स्येंद्रें सांगोनि तियेप्रती ॥ मनुष्यांकरवीं उकरवी माती ॥ तों द्वादश वर्षांची सतेज मूर्ती ॥ दृष्टीं अवचितीं देखिली ॥७७॥
जैसा पौर्णिमेचा निशाकर ॥ तैसी सोज्ज्वळ कांति सुंदर ॥ बत्तीसलक्षणी सुकुमार ॥ जो साक्षात् अवतार विष्णूचा ॥७८॥
साजिरें श्रीमुख आकर्णनयन ॥ कर्णीं मुद्रिका शोभायमान ॥ आधार नसतां घालोनि आसन ॥ स्मरण करीत बैसला ॥७९॥
नाहीं अंगासी लागली माती ॥ देखोनि लोक आश्चर्य करिती ॥ मग मत्स्येंद्र येऊनि सत्वरगती ॥ सावध करीत तयासी ॥८०॥
मस्तकीं ठेवितां अभयकर ॥ घातला साष्टांग नमस्कार ॥ हातीं घेऊनि निजकुमार ॥ मत्स्येंद्र सत्वर चालिले ॥८१॥
शेण भस्म जाहलें मिश्रित ॥ द्वादश वरुषें होता त्यांत ॥ म्हणोनि नाम गोरक्षनाथ ॥ निजप्रीतीं ठेविलें ॥८२॥
सावकार म्हणे कांतेप्रती ॥ निधान लागलें होतें हातीं ॥ परी प्राक्तनाची विचित्र गती ॥ नव्हतें संचितीं आमुच्या ॥८३॥
करुणा ऐकोनि मत्स्येंद्रनाथें ॥ आशीर्वाद दिधला तियेतें ॥ आणिक एक पुत्र तुम्हांतें ॥ होईल निश्चित जाणिजे ॥८४॥
ऐसें बोलोनि तयांप्रती ॥ गोरक्षातें धरिलें हातीं ॥ मत्स्येंद्रनाथ सत्वरगती ॥ तीर्थाटनाप्रती चालिले ॥८५॥
मार्गीं चालती अति त्वरित ॥ मग मत्स्येंद्रासी म्हणे गोरक्षनाथ ॥ माझे मस्तकीं ठेवूनि हात ॥ तारक मंत्र उपदेशीं ॥८६॥
सद्गुरु म्हणती ते समयीं ॥ आमुची सेवाचि केली नाहीं ॥ तों उपदेश करावया अधिकार पाहीं ॥ बोलिला नाहीं सर्वथा ॥८७॥
परीक्षेविण नाणें झडकरी ॥ बांधों नये आपुले पदरीं ॥ तेवीं सच्छिष्यासी उपदेश झडकरी ॥ सज्ञान चतुरीं न द्यावा ॥८८॥
वाफा केलियाविण सहज ॥ तेथें पेरूं नयेचि उत्तम बीज ॥ तेवीं परीक्षा पाहिल्याविण मज ॥ न ये तुज अंगीकारितां ॥८९॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ गोरक्ष करी साष्टांग नमन ॥ बोलतसे कर जोडून ॥ मज आज्ञा प्रमाण स्वामींची ॥९०॥
पुढें चालतां अति त्वरित ॥ तो एक नगर देखिलें अकस्मात ॥ बाहेर बैसोनि मत्स्येंद्रनाथ ॥ गोरक्षा धाडी भिक्षसी ॥९१॥
अलख म्हणोनि बोले वचन ॥ घरोघरीं मागतां भिक्षान्न ॥ तों एकाचें घरीं ब्राह्मणभोजन ॥ होत असे तेधवां ॥९२॥
गृहस्वामीण येऊन पुढां ॥ पदरीं घातला पोळीवडा म्हणे बहुत भला कानफाडा ॥ धरणें नाहीं घेतलें ॥९३॥
अल्पसंतुष्ट जो का नर ॥ तो केवळ ईश्वरी अवतार ॥ ऐसें लोक परस्पर बोलते जाहले तेधवां ॥९४॥
मग बाहेर जाऊन त्वरित ॥ मस्येंद्रासी घातलें दंडवत ॥ उत्तमान्न निवडोनि समस्त ॥ सद्गुरूपुढें ठेविलें ॥९५॥
मग संतुष्ट होऊनियां चित्तीं ॥ काय बोले गोरक्षाप्रती ॥ वडे बहुत मिष्ट लागती ॥ होतसे तृप्ति यांचेनि ॥९६॥
तरी उदयीक जाऊनि नगरातें ॥ ऐसेच आणोनि देईं मातें ॥ अवश्य म्हणोनि नमनातें ॥ गोरक्षनाथ करितसे ॥९७॥
दुसरे दिवसीं प्रातःकाळीं ॥ हातीं तत्काळ घेतली झोळी ॥ ग्रामांत जाऊनि तये वेळीं ॥ विचार करी मनांट ॥९८॥
म्हणे आणिके धरीं जातां त्वरित ॥ सत्वर साधेना कार्यार्थ ॥ परी ब्राह्मण जेवित होते जेथ ॥ जावें निश्चित त्या ठायां ॥९९॥
मग गोरक्षनाथ सत्वरीं ॥ जाऊनि बैसला ब्राह्मणद्वारीं ॥ माते वडा झडकरी ॥ माझे पदरीं घाल आतां ॥१००॥
गृहस्वामीण येऊन त्वरित ॥ गोरक्षासी वचन बोलत ॥ वडे माझिया मंदिरांत ॥ राहिले नाहींत सर्वथा ॥१॥
काल गृहीं जेविले ब्राह्मण ॥ म्हणूनि तुजला दिधलें अन्न ॥ आतांही मागतोसी तेंच अन्न ॥ तरी द्यावें कोठून सांग पां ॥२॥
तिरुका अथवा धान्य झडकरीं ॥ मी घालितें तुझे पदरीं ॥ परी वडे नाहींत माझें घरीं ॥ जाण निर्धारीं जोगिया ॥३॥
गोरक्ष म्हणे तियेसी ॥ आणि इच्छा नाहींच मजसी ॥ उदंड दिधल्या द्रव्यराशी ॥ तरी मृत्तिका ऐशी मज भासे ॥४॥
ऋद्धि सिद्धि राज्यसंपत्ती ॥ इंद्रपदही आलिया हातीं ॥ पाहीं विशेष चारी मुक्ती ॥ त्या मज न लागती सर्वथा ॥५॥
एक सद्गुरुइच्छा करावया पूर्ण ॥ वडा मागतों तुजकारण ॥ घेतल्याविण जरी मी जाईन ॥ तरी त्याचीच आण वाहतसें ॥६॥
येरी म्हणे करितोसी जुलूम ॥ धर्म करितां ओढवलें कर्म ॥ अतीत नव्हे तूं वेषधारी परम ॥ अन्न उत्तम इच्छितोसी ॥७॥
श्वानासी एकदां टाकितां भाकरी ॥ तें तैसेंचि सोकून येतसे द्वारीं ॥ तैसीच या याचकाची परी ॥ मज निर्धारीं कळों आलें ॥८॥
गोरक्ष बोले प्रतिवचन ॥ आम्ही श्वानापरीस आहों हीन ॥ परी वडे घेतल्यावांचून ॥ जाय कदा न सर्वथा ॥९॥
येरी म्हणे हटवादिया ॥ नसताचि घेऊन बैसलासी थाया ॥ तरी तूं आपुला एक डोळा काढोनियां ॥ दे लवलाह्या मजलागीं ॥११०॥
ऐकूनियां गोरक्ष बोले वचन ॥ मी नेत्र देतों तुजकारण ॥ येरी म्हणे करणीवांचून ॥ व्यर्थ बोलणें कास्या ॥११॥
तुम्हां अतीतांची ऐसी रीती ॥ ज्ञान सांगावें दुसर्‍यांप्रती ॥ आपण अविवेकें वर्तती ॥ अज्ञान भ्रांतीकरूनि ॥१२॥
वचन ऐकोनि गोरक्ष सत्वरीं ॥ डोळ्यांत घालून करांगुळी ॥ बुबूळ काढोनि झडकरी ॥ तिचे हातीं देतसे ॥१३॥
ऐसें देखोनि त्वरित ॥ घनधनीण जाहली भयभीत ॥ म्हणे दिवाणासी कळल्या मात ॥ तरी नागवील निश्चित आम्हांसी ॥१४॥
मग भयेंकरूनि आडकिलें द्वार ॥ गोरक्षकासी घाली नमस्कार ॥ म्हणे मी बोलिल्यें बाह्यात्कार ॥ तुझा निश्चय न कळतां ॥१५॥
रुधिर वाहत नेत्रांतूनी ॥ तें पल्लवें पुसी तये क्षणीं ॥ गोरक्ष म्हणे तिजलागूनी ॥ भयभीत मनीं न व्हावें ॥१६॥
गोरक्ष जरी धरितां कोप ॥ तरी ब्रह्मांड जाळिता त्याचा शाप ॥ परी तो शांतिक्षमेचा केवळ रोप ॥ न येचि संताप मानसीं ॥१७॥
चालतां पाऊल पडेल जेथ ॥ सकळ सिद्धि ओळंगती तेथ ॥ परी तो तयांसी नव्हे लिप्त ॥ भिक्षा मागत घरोघरीं ॥१८॥
उदंड तवस्वी असेल आथिला ॥ आणि कामक्रोधां वरपडा जाहला ॥ तरी तो निजसुकृतासी मुकला ॥ यथार्थ बोला मानिजे ॥१९॥
अथवा ऋद्धिसिद्धींची लोलंगता ॥ तयासी लागली जरी अवचिता ॥ तरी अंतरला परमार्थस्वार्था ॥ जाहला गुंता महाविघ्नें ॥१२०॥
म्हणोनि मत्स्येंद्राचा सुत ॥ काम क्रोध जिंकोनि त्वरित ॥ ऋद्धिसिद्धींसी हाणोनि लाथ ॥ औदास्ययुक्त वर्ततसे ॥२१॥
मग घनधनीण जाऊनि मंदिरांत ॥ वड्यांचें साहित्य घेवोनि त्वरित ॥ डाळ दळोनि आपुल्या हातें ॥ लवण जिरें आंत घातलीं ॥२२॥
घृतांत तळोनियां झडकरी ॥ बाहेर घेऊनि आली सत्वरी ॥ गोरक्षाचे चरणांवरी ॥ नमस्कार करी साष्टांग ॥२३॥
वडे घालोनियां झोळींत ॥ कर जोडोनियां विनवीत ॥ म्हणे बाहेर हे मात ॥ कळों न द्यावी सर्वथा ॥२४॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं ॥ म्हणे निर्भय असावें अंतरीं ॥ नेत्र झांकूनियां करकमळीं ॥ मत्स्येंद्राजवळी पातला ॥२५॥  
सद्भावें करूनियां नमन ॥ म्हणे भिक्षा मागूनि आणिलें अन्न ॥ तरी स्वामींनीं कृपा करून ॥ करावें भोजन यथारुचि ॥२६॥
नेत्र फुटला कासयानें ॥ मत्स्येंद्रनाथें केला प्रश्न ॥ येरू उभा कर जोडून ॥ वृत्तांत अवघा सांगतसे ॥२७॥
वडे मागतां भिक्षेतें ॥ तिनें नेत्र मागितला मातें ॥ मग बुबूळ काढोनि निजहस्तें ॥ दिधलें असे स्वामिया ॥२८॥
मत्स्येंद्र म्हणे तयाप्रती ॥ धन्य तुझी धैर्यवृत्ती ॥ तरी दुसरा नेत्र पजप्रती ॥ काढोनि देईं सत्वर ॥२९॥
अवश्य म्हणोनि गोरक्षनाथ ॥ दुसरा नेत्र काढीत त्वरित ॥ देखोनि मत्स्येंद्र झाले विस्मित ॥ म्हणे सद्गुरुभक्त तूं खरा ॥१३०॥
मग हस्त उतरितां नेत्रांवरूनी ॥ तेणें दिव्य चक्षू जाहले तये क्षणीं ॥ तेव्हा गोरक्षासी उपदेश देऊनी ॥ आत्मज्ञान सांगितलें ॥३१॥
मग भोजन करूनि प्रीतीसीं ॥ प्रसाद दिशला गोरक्षासी ॥ म्हणे तुजऐसा शिष्य मजसी ॥ न दिसे दृष्टिसी सर्वथा ॥३२॥
त्या गोरक्षनाथें शांभवाला ॥ अधिकार पाहूनि उपदेश केला ॥ तो निजबोध त्यासी ठसवला ॥ संशय उडाला निजकृपें ॥३३॥
तेव्हां अद्वयानंदा शांभवासी ॥ शरण आला सद्भावेंसीं ॥ तेणें कृपा करूनि त्यासी ॥ हस्त मस्तकीं ठेविला ॥३४॥
मग अद्वयानंदें कृपा करूनि ॥ प्रभवासी लाविलें आत्मज्ञानीं ॥ गैनीनाथासी तयांनी ॥ योगमार्ग सांगितला ॥३५॥
गैनीपासूनि निवृत्तीराव ॥ निवृत्तीचा म्हणवी ज्ञानदेव ॥ ज्ञानदेवासी  अनन्यभाव ॥ विसोबा खेचर विनटला ॥३६॥
नामदेव जो वैष्णवभक्त ॥ तो विसोबासी शरणागत ॥ त्या विष्णुदासाचा वरदहस्त ॥ जनीस लाधला निजकृपें ॥३७॥
ऐसें ऐकूनि निरूपण ॥ श्रोते संतोष पावले जाण ॥ म्हणती आमुचें संशयनिवारण ॥ जाहलें जाण वक्तया ॥३८॥
असो कोणे एके दिवसीं ॥ ज्ञानदेव गेले राउळासी ॥ म्हणती आज्ञा द्यावी आम्हांसी ॥ अलकावतीसी जावया ॥३९॥
नमस्कार करूनि रुक्मिणीपती ॥ तेथूनि निघाले सत्वरगती ॥ येऊनियां अलकावती ॥ सिद्धेश्वराप्रति वंदिलें ॥१४०॥
विष्णूचा अवतार साक्षात ॥ ज्ञानदेव हा मूर्तिमंत ॥ हें चांगदेवासी जाहलें श्रुत ॥ ते आले त्वरित भेटीसी ॥४१॥
म्हणाल चांगदेव कोठील कोण ॥ तरी तेंही ऐका निरूपण ॥ श्रोतयांनीं स्वस्थ करूनि मन ॥ सावधान परिसावें ॥४२॥
विरिंचीचे पहिल्या प्रहरांतूनी ॥ चवदा इंद्र गेले होऊनी ॥ तितुकेही पडिले बंदिखानीं ॥ विचित्र करणी कर्माची ॥४३॥
तंव एके दिवसीं ब्रह्मकुमर ॥ जो भक्तिज्ञानासी आगर ॥ तो नारमुनि वैष्णववीर ॥ अकस्मात पातला ॥४४॥
तयासी देखतांचि जाण ॥ चवदा जणीं केलें नमन ॥ देवऋषि करूनि हास्यवदन ॥ सर्पेम गायन करीतसे ॥४५॥
त्यांतही चांगा पुरंदर भला ॥ बहुत दिवस निर्बुजला ॥ तेणें हात जोडोनि ते वेळां ॥ प्रश्न केला नारदासी ॥४६॥
म्हणे माझी सुटका होईल जेण ॥ तो उपाय सांगा कृपा करून ॥ जन्ममरणांचें होय खंडन ॥ तें मोक्षसाधन सांगावें ॥४७॥
ऐकोनि म्हणे ब्रह्मसुत ॥ तें या लोकीं नव्हेच निश्चित ॥ तरी तूं मृत्युलोकीं जाऊनि त्वरित ॥ अवतार घेईं चांगया ॥४८॥
तेथें महाक्षेत्र पुण्यपंढरी ॥ भूवैकुंठ महीवरी ॥ साक्षात् परब्रह्म विटेवरी ॥ असे निर्धारीं जाण पां ॥४९॥
संतसमागमकीर्तनगजर ॥ जीवन्मुक्त अवघे नारीनर ॥ त्वां कर्मभूमीसी घेऊनि अवतार ॥ करीं उद्धार आपुला ॥१५०॥
अमरपुरीं सत्यलोकीं जाण ॥ वसताती जे प्राणिगण ॥ तयांसी न घडे मोक्षसाधन ॥ मृत्युलोकावांचूनि ॥५१॥
ऐकोनि नारदाचें वचन ॥ साष्टांग नमस्कार घातला त्याण ॥ म्हणे या देहापासोनि सुटेन ॥ ऐसा उपाय करावा ॥५२॥
मग द्वादशाक्षरी मंत्र ॥ नारदें त्यासी सांगितला सत्वर ॥ तेव्हां त्या देहापासून मुक्त लवकर ॥ तत्काळ जाहला ते समयीं ॥५३॥
पुण्यस्तंभीं गंगातीरीं ॥ मरुद्गण ब्राह्मणाचें उदरीं ॥ चांगा इंद्र ते अवसरीं ॥ अवतार धरी तेधवां ॥५४॥
विठोबा रुक्मिणी दोघे जण ॥ अति वृद्ध होतीं ब्राह्मण ॥ तयांसी होतां पुत्रनिधान ॥ परमानंद वाटला ॥५५॥
बाळक तेजस्वी देदीप्यमान ॥ पाहतांचि आनंदलें मन ॥ आठवे वरुषीं व्रतबंध करून ॥ केलें लग्न तयाचें ॥५६॥
मनांत कल्पना येतांचि जाण ॥ इच्छामात्रें करी गमन ॥ मुखीं बोलतां आशीर्वचन ॥ घडोन येत तत्काळ ॥५७॥
चालतां पाऊल पडे जेथें ॥ सर्व सिद्धि ओळंगती तेथें ॥ चतुर्दश विद्या सर्व अवगतें ॥ चौसष्टी कला संपूर्ण ॥५८॥
यम नियम प्राणायाम ॥ अवगत असे तयालागून ॥ शत वर्षे होतां संपूर्ण ॥ तंव मृत्युकाळ समीप पातला ॥५९॥
मग आत्मा ब्रह्मांडीं ठेवूनि जाण ॥ चांगदेवें केली कालवंचना ॥ समय टाळूनियां प्राणा ॥ मागुती देहांत आणीतसे ॥६०॥
ऐसे जाहले दिवस बहुत ॥ वर्षें लोटलीं चौदाशत ॥ परी तयासी काळाचा आघात ॥ सर्वथा निश्चित लागेना ॥६१॥
वार्धक्यदशा न येचि अंगीं ॥ प्रशंसा बहुत वाढली जगीं ॥ नित्य पंढरीसी कीर्तनरंगीं ॥ जाऊनि नृत्य करीतसे ॥६२॥
स्वानंदें शांत तापीतटीं ॥ तेथें राहत आपुले मठीं ॥ मग पुण्यस्तंभीं गोदातटीं ॥ नित्य स्नाना येतसे ॥६३॥
शिष्य संप्रदायी केले बहुत ॥ संख्या करितां चवदा शत ॥ इतुके सवें घेऊनि त्वरित ॥ गमन करीत ऊर्ध्वपंथें ॥६४॥
इतुकें सामर्थ्य असोनि देहीं ॥ परी चांगदेवेंसद्गुरू केला नाहीं ॥ शिष्यांसी ज्ञान सांगोनि कांहीं ॥ सेवा घेत त्यांहातीं ॥६५॥
जैसें वैद्य भलतेंचि खात ॥ दुसर्‍यासी सांगोनि देती पथ्य ॥ नातरी विप्र असे अस्नात ॥ प्रयोग सांगत आणिकांसी ॥६६॥
तेवीं सिद्धीचें दाखवूनि सामर्थ्य ॥ चांगदेवें संप्रदायी केले बहुत ॥ परी आपण सद्गुरूचे अंकित ॥ जाहले नाहींत सर्वथा ॥६७॥
म्हणे मृत्युलोक पाहतां धुंडोनी ॥ मज योग्य सद्गुरु न दिसे कोणी ॥ आमुचें सामर्थ्य कोणालागूनी ॥ न दिसें नयनीं सर्वथा ॥६८॥
मग परस्परें कर्णीं ऐकिली मात ॥ म्हणती विष्णुअवतार साक्षात ॥ ज्ञानदेव अलकापुरींत ॥ मूर्तिमंत वसतसे ॥६९॥
चांगदेवें विचारिलें मनीं ॥ म्हणे शरण जावें तयालागूनी ॥ ज्ञानदेवासी पत्र लिहूनी ॥ आधीं उत्तर आणवावें ॥१७०॥
मग दऊत लेखणी घेऊनि हातीं ॥ विचार करीत आपुलें चित्तीं ॥ म्हणे चिरंजीव लिहूं तयाप्रति ॥ तरी उपदेश घेणें लागतीं ॥७१॥
तीर्थरूप लिहावें विचारीं मनीं ॥ तरी धाकुटा ज्ञानदेव आम्हांहूनी ॥ मग कोराचि कागद घडी करूनी ॥ शिष्यांहातीं पाठविला ॥७२॥
सिद्धेश्वरीं अलकावती ॥ ज्ञानदेव बैसले सहजस्थितीं ॥ ध्यानीं आणोनि रुक्मिणीपती ॥ सप्रेम भजन करीत ॥७३॥
तों आकशपंथें अकस्मात ॥ चांगदेवाचा शिष्य येत ॥ हें ज्ञानदेव जाणूनि त्वरित ॥ तयासी वृत्तांत सांगती ॥७४॥
आधीं न सांगतांचि मात ॥ म्हणती चांगदेवें धाडिलें तूंतें ॥ तेणें नमस्कारूनि त्वरित ॥ पुढें पत्र ठेविलें ॥७५॥
उकलूनि पाहती जंव सत्वरीं ॥ तों अक्षर न दिसेचि त्यावरी ॥ म्हणे चवदाशत गर्षें लोटलीं परी ॥ अजूनि कोराचि राहिला ॥७६॥
जेवीं फळ न येतां साचार ॥ अमृतवृक्ष वाढला थोर ॥ कीं जळ नसतांचि सरोवर ॥ वायांचि९ विस्तीर्ण बांधिलें ॥७७॥
संतान नसतां वाढली कांता ॥ कीं सामर्थ्यावांचूनि पुरुष वृथा ॥ सौभाग्याविण अलंकार भूषणें तत्त्वतां ॥ लेऊनि वनिता व्यर्थचि ॥७८॥
वैराग्याविण संन्यासग्रहण ॥ कीं कृपणाचें उंच सदन ॥ कीं औदार्याविण संचित धन ॥ व्यर्थ काय जाळावें ॥७९॥
कीं करुणा नसतां आपुलें पोटीं ॥ भूतदयेच्या व्यर्थचि गोष्टी ॥ कीं पर्जन्य न पडतां सृष्टीं ॥ अभ्र गगनीं व्यर्थचि ॥१८०॥
तेवीं सद्गुरूसी न जातां शरण ॥ व्यर्थचि आयुष्य गेलें जाण ॥ चवदाशें वर्षें वांचून ॥ काय केलें सार्थक ॥८१॥
ऐसें ज्ञानदेवें बोलूनि त्वरित ॥ आपुलें हातें प्रतिउत्तर लिहीत ॥ म्हणे चैतन्य तो सर्वगत ॥ सर्वांभूतीं एकचि ॥८२॥
तें वडील नव्हे ना धाकुटें ॥ परिवारी नव्हे ना एकटें ॥ दीर्घ नव्हे ना खुजटॆं ॥ दूर ना निकट सर्वथा ॥८३॥
अभ्र दाडोनि भरलें गगन ॥ परी आकाश तितुकेंच असे जाण ॥ तरी स्थूळ वाढलें अथवा लहान ॥ परी सच्चिदानंद तितुकेंचि ॥८४॥
जें जें दिसतसे ब्रह्मांडीं ॥ तितुकेही पदार्थ आपुले पिंडीं ॥ परी माया अविद्या बहु कुडी ॥ ते दृष्टी चोखंडी होऊं नेदी ॥८५॥
अविद्येचे योगें निश्चितीं ॥ आपुली आपणा पडली भ्रांती ॥ विवेक करूनि आपलें चित्तीं ॥ मागील आठव धरावा ॥८६॥
जें सकळ विश्वाचें निजबीज ॥ तें तुमचें तुम्हांपासीं आहे सहज ॥ पत्रीं लिहीत ज्ञानराज ॥ चांगला उमज म्हणोनि ॥८७॥
ऐसें लिहूनि तयाप्रती ॥ पाठविलें सत्वरगती ॥ चांगयानें वाचितां चित्तीं ॥ अनुभव तत्काळ जाहला ॥८८॥
म्हणे ऐसा जो का ज्ञानसागर ॥ त्याचिया भेटीस जाऊं सत्वर ॥ मग आरूढोनि व्याघ्रावर ॥ सामर्थ्य थोर दाखविलें ॥८९॥
चौदाशें शिष्यांचा समुदाव ॥ घेऊनि चालिला चांगदेव ॥ तों इकडे अलकावतीस ज्ञानदेव ॥ बैसले होते भिंतीवरी ॥१९०॥
तयासी सांगती लोक सत्वर ॥ एक अतीत आला असे थोर ॥ आरूढोनि व्याघ्रावर ॥ चाबूक केला सर्पाचा ॥९१॥
ऐसें ऐकोनियां वचन ॥ ज्ञानदेवासी कळली खूण ॥ म्हणती चांगयाचें अगमन ॥ जाहलें असेल वाटतें ॥९२॥
मग बैसले होते भिंतीवरी ॥ तीस आज्ञा केली ते अवसरीं ॥ म्हणती चांगदेव बैसोनि व्याघ्रावरी ॥ येती लवकरी भेटावया ॥९३॥
घरासी येतील साधुसंत ॥ तूंही सामोरें चाल त्वरित ॥ ऐकोनि ज्ञानदेवाची मात ॥ नवल अद्भुत वर्तलें ॥९४॥
बैसले होते जयावरी ॥ ते भिंतचि चालिली अति सत्वरीं ॥ कौतुक देखोनि नरनारी ॥ आश्चर्य करिती मनांत ॥९५॥
ग्रामाबाहेर येतांचि जाण ॥ चांगदेवें ओळखिलें दुरून ॥ म्हणे निर्जीवासी चालविणें जेण ॥ धन्य महिमान गुरूचें ॥९६॥
सजीव व्याघ्राचे बैसोनि पाठीं ॥ मी काय जातों तयाचे भेटी ॥ मग खालीं उतरून उठाउठीं ॥ लोटांगणीं चालिले ॥९७॥
अभिमान होता मनांत ॥ तो तत्काळचि जाहला गलित ॥ जेवीं दृष्टीं देखतां अमृत ॥ औषधी लज्जित होताती ॥९८॥
कीं भरताचा पराक्रम देखोनी ॥ मारुति विस्मित अंतःकरणीं ॥ कीं सीतेचें रूप धरितां रुक्मिणी ॥ सत्यभामा मनीं लज्जित ॥९९॥
कीं जांबवतीच्या स्वयंवरांत श्रीकृष्ण ॥ अस्वलहातें करविलें गायन ॥ तेव्हां नारदाचा अभिमान ॥ गलित जाहला तत्काळीं ॥२००॥
नातरी गायी गोपाळ सत्यलोकासी ॥ विधीनें चोरून नेलीं जैसीं ॥ श्रीकृष्णें आणिक निर्मिलीं तैसीं ॥ विधि मानसीं लज्जित ॥१॥
तेवीं ज्ञानदेवें चालवितां भिंती ॥ चांगदेव आश्चर्य करी चित्तीं ॥ म्हणे हा साक्षात पांडुरंगमूर्ती ॥ सद्भाव चित्तीं धरियेला ॥२॥
मग वटवृक्षाचे तळवटीं ॥ उभयतांच्या जाहल्या भेटी ॥ ज्ञानदेवाच्या ऐकोनि गोष्टी ॥ चांगदेव पोटीं संतोषला ॥३॥
अद्यापि त्या ठायाकारण ॥ विश्रांतिवट म्हणती जाण ॥ तेथें क्षणभरी बैसती जाऊन ॥ ते सायुज्यसदन पावती ॥४॥
मग ज्ञानदेवें चांगयासी धरूनि हातीं ॥ घेऊनि आले आश्रमाप्रती ॥ मुक्ताबाई सहजस्थितीं ॥ मंगलस्नान करीतसे ॥५॥
हें चांगदेवासी कळतां जाण ॥ माघारा गेला परतोन ॥ तयासी मेल्या निगुर्‍या म्हणोन ॥ मुक्ताबाई वचन बोलिली ॥६॥
ऐसें ऐकोनियां ते अवसरीं ॥ चांगया धांवूनि चरण धरी ॥ म्हणे माते तुजअंतरीं ॥ कळलें कैसें मज सांग ॥७॥
ऐसें ऐकोनियां आदिमाया ॥ काय उत्तर देतसें तया ॥ तूं मागें गेलासी परतोनियां ॥ कळलें म्हणोनियां मजलागीं ॥८॥
जरी गुरुकृपा असती तुजवरी ॥ तरी विकार न येता अंतरीं ॥ भिंतीस कोनाडे तैसियापरी ॥ मानूनि पुढें येतासी ॥९॥
जनी वनीं हिंडातां गाय ॥ वस्त्रें नेसत असती काय ॥ त्या पशूऐसीचि मी पाह्य ॥ तुज कां न ये प्रत्यया ॥२१०॥
ऐकोनि मुक्ताबाईचें वचन ॥ चांगदेवें दृढ धरिले चरण ॥ मग ज्ञानदेवासी जाऊनि शरण ॥ त्याचा अनुग्रह घेतला ॥११॥
साक्षात् परब्रह्म मूर्तिमंत ॥ त्याचा मस्तकीं पडतां हस्त ॥ चांगदेव जाहले अति विरक्त ॥ देहममता टाकूनि ॥१२॥
सकळ अभिमान जाऊन ॥ निष्कलंक जाहलें मन ॥ चांगदेवें धरूनि चरण ॥ स्तविलें बहु ज्ञानदेवा ॥१३॥
धन्य अलकावतीस्थान ॥ मृत्युलोकीं वसविलें वैकुंठभुवन ॥ कीं दुसरी पंढरीच निर्माण ॥ जाहली असे भूमंडळीं ॥१४॥
जेथें ज्ञानदेवाची भक्ती ॥ तेथें आले रुक्मिणीपती ॥ त्याचे चरण महीपती ॥ हृदयीं चिंती सर्वदा ॥१५॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥    ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥    ॥
॥ श्रीभक्तविजय द्वाविंशतितमाध्याय समाप्त ॥