गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २२

मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट; गोरक्षनाथाची संशयनिवृत्ति.
गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा (मैनाकिनी) शोकसागरांत बुडून गेली असतां तेथें उपरिक्षवसु प्राप्त झाला. त्यानें तिला घरीं नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला. त्या समयीं तो म्हणाला, या जगांत जें सर्व दिसतें तें अशाश्वत व नाशिवंत आहे. म्हणून शोक करण्याचे काहीं एक कारण नाहीं. तूं जेथून पदच्युत झाली होतीस, त्या स्वर्गांतील सिंहलद्वीपीं आता चल. बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन. गोरक्षनाथ व मीननाथ हेहि समागमें राहतील.आतां हा योग कोणत्या कारणानें घडून येईल म्हणून तुला संशय असेल, तर सांगतो ऐक. सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्या वेळेस तेथें विष्णु , ब्रह्मदेव, शंकर आदिकरुन श्रेष्ठ देवगण येतील, नवनाथहि येतील. ह्यास्तव आतां शोकाचा त्याग करुन विमानारुढ होऊन सिंहलद्वीपांत चल. तेव्हां ती म्हणाली. इंद्र यज्ञ करो अगर न करो; पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचें आपण मला वचन द्यावे, म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल. तें ऐकून त्यानें मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल वचन दिलें. मग त्याच्या आज्ञेनें मैनाकिनी दैर्भामा नांवाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गी जावयास निघाली. मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झालें. तरी जातांना तिनें सर्वांची समजूत केली व दैर्भामेस, नीतीनें राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठीं चांगला उपदेश केला. नंतर मैनाकिनीस विमानांत बसवून सिंहलद्वीपास पोंचविल्यावर उपरिक्षवसु आपल्या स्थानीं गेला. अशा रीतीनें मैनाकिनी शापापासून मुक्त झाली.
 
इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यांत आले. येतांना वाटेंत कानिफनाथाची गांठ पडली.तेव्हां आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफानें पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळें लागला, असें मनांत आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावरुन खालीं उतरवून कानिफनाथाच्या पायां पडला. भेटतांना डोळ्यांतून अश्रू वाहूं लागले. मग मच्छिंद्रनाथानें त्यास रडतोस कां, म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथानें बदरिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचें समाधान करुन पुढें मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदानें खांचेंत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास कळविला.
 
जालंदरनाथास घोडयाच्या लिदींत पुरल्याची हकीगत ऐकतांच मच्छिंद्रनाथास अनिवार क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथें येऊन पोंचले. तेव्हां कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यांस भेटली. त्यांच्यापाशीं शोध करितांना कानिफानें जालंदरास वर काढिल्याची, गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनीं सांगितली. ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला. मग हल्लीं येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानानें चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर, मैनावतीच्या मार्फत तो चालतो, असें सांगून लोकांनीं तिची स्तुति केली.
 
मग तिची भेट घेण्याचा उद्देशानें गोरक्षनाथ व मीननाथ यांस घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाडयांत गेले. तेथें आपलें नांव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे, ह्यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठीं दारावरील पहारेकर्‍यास पाठविलें. त्या द्वारपाळानें जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असें मैनावतीस सांगितलें. त्याच्या स्वरुपाचें व लक्षणांचे वर्णन करुन हुबेहुब जालंदरनाथाप्रमाणें तो दिसत आहे असेंहि कळविलें. मग प्रधानादिकरुन मंडळी समागमें घेऊन मैनावती त्यांस सन्मानानें मंदिरांत घेऊन गेली व त्यांस सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिनें षोडशोपचारांनीं पूजा केली. नंतर आपलें चरण आज घरीं लागल्यानें मी कृतार्थ झालें, वगैरे बोलून तिनें मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुति केली व आदरपूर्वक विचारपूस करुं लागली. त्या समयीं मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले :---
 
मी उपरिक्षवसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असें म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रेयानें मला अनुग्रह दिला; त्यांनींच जालंदरनाथास उपदेश केला.तो जालंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधु होय. त्याची येथें दुर्व्यव्यवस्था झाली असें ऐकण्यांत आल्यावरुन मी येथें क्रोधानें येत होतों, परंतु येथें झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला. ह्यावरुन तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय. तूं जन्मास आल्याचें सार्थक करुन घेऊन त्रिलोक्यांत सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास. बेचाळीस कुळें उद्धरिलीस. धन्य आहेस तूं ! असें नाथानें बहुत प्रकारें तिचें वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पायां पडली आणि म्हणाली, महाराज ! हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय. बरें किंवा वाईट जसें इच्छावें तसें कल्पतरु फळ देतो; परीस लोखंडाचे सुवर्ण करितो; पण त्या दोहोंपेक्षांहि तुमचें औदार्य अनुपम होय. अशा रीतीनें मैनावतीनें त्याची स्तुति केली आणि पायांवर मस्तक ठेविलें. मग मोठया सन्मानानें त्यांचें भोजन झालें. मच्छिंद्रनाथ तेथें तीन दिवस राहून तेथून निघाले. पुष्कळ मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती.
 
हेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथक्षेत्रास गेले. तेथें तीन रात्रीं राहून तेथून पुढें निघाले. ते फिरत फिरत सौराष्ट्रगांवीं मुक्कामास राहिले. तेथें दुसरे दिवशीं सकाळीं गोरक्षनाथ भिक्षेकरितां गांवांत गेला. त्या वेळी मीननाथें निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास शौचास बसविलें. इतक्यांत गोरक्षनाथ भिक्षा मागून आला. तो येतांच त्यास मीननाथास ’धुऊन’ आणावयास सांगितलें. मीननाथ लहान वयाचा असल्यामुळें त्याचे हातपाय मळानें भरुन गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली. तो मनांत म्हणाला, आपणां संन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता ? अशा प्रकारचे बहुत तरंग मनांत आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यांतल्या कृत्यास त्यानें बराच दोष दिला.
 
त्या रागाच्या आवेशांत गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेला व तेथें एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचें प्रेत पाण्यांत नेऊन हाडें, मांस हीं मगरी, मासे यांना खावयास टाकून दिलीं. कातडें मात्र स्वच्छ धुवून घरीं नेऊन सुकत घातलें. त्या वेळीं मच्छिंद्रनाथ आश्रमांत नव्हता. तो परत आल्यावर मीननाथ कोठें आहे म्हणून त्यानें विचारिलें. तेव्हां त्यास धुवून सुकत घातला आहे, असें गोरक्षनाथानें त्यास सांगितलें; पण ह्यांत त्याची बरोबर समजूत पटेना. तो पुनः पुनः मीननाथ कोठें आहे, मला दिसत नाहीं असें म्हणे. मग बाहेर नेऊन वाळत घातलेलें मीननाथाचें कातडें गोरक्षनाथानें दाखविलें. तेव्हां मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथानें धाडकन्‌ जमिनीवर अंग टाकिलें. तो गडबडां लोळून परोपरीनें विलाप करुं लागला; कपाळ फोडून घेऊं लागला. तसेंच एकीकडे रडत असतां त्याच्या एक एक गुणांचें वर्णन करी.
 
मीननाथासाठीं मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे, असें पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुराज’ तुम्ही असें अज्ञानांत का शिरतां ? तुम्ही कोण, मुलगा कोणाचा आणि असें रडतां हें काय ? विचार करुन पाहतां मेला आहे कोण ? नाशिवंतचा नाश झाला, शाश्वतास मरण नाहीं. तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाहीं. शस्त्रानें, अग्निनें, वार्‍यानें, पाण्यानें किंवा कोणत्याहि प्रकारानें त्याचा नाश व्हावयाचा नाहीं. कारण तो शाश्वत आहे.अशा प्रकारें बोलून गोरक्षनाथ त्याचें सांत्वन करुं लागला. परंतु ममतेमुळें मच्छिंद्रनाथास रडें आवरेना व विवेकहि आवरेना. मग गोरक्षनाथानें संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करुन भस्माची चिमटी मीननाथाच्या कातडयावर टाकताच तो उठून उभा राहिला. त्यानें उठतांच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यांत मिठी मारली. त्यानें त्यास पोटाशीं धरिलें. त्याचे मुके घेतले व त्याच्याशीं लडिवाळपणानें बोलूं लागला. मग आनंदानें ते त्या दिवशीं तेथेंच राहिले.
 
दुसरे दिवशीं ते पुनः मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढिली कीं, तुमची शक्ति अशी आहे कीं, निर्जीवास सजीव करुन सहस्त्रावधि मीननाथ एका क्षणांत तुम्ही निर्माण कराल. असें असतां रुदन करण्याचें कारण कोणतें तें मला कळवावें. तुमचें हें वर्तन पाहून मला आश्चर्य वाटलें. असें गोरक्षनाथाचें भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कीं, त्यास तूं कोणत्या हेतुवस्तव मारिलेंस, तें कारण मला सांग. तेव्हां तो म्हणाला, तुमचा लोभ पाहावयासाठीं ! तुम्ही विरक्त म्हणवितां आणि मीननाथावर इतकी माया, ममता धरिली. म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे. हें पाहावयासाठींच ती मीननाथास मारिलें. पण तुम्ही सुज्ञ असून रडूं लागलेत हें कसें, तें सांगावें. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाला, आशा, तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे, हें पाहण्यासाठींच मीं मुद्दाम हें कौतुक करुन दाखविलें. तसेंच ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत, हें तुला कळलें आहे कीं नाहीं याचा मला संशय होता; तो मी या योगानें फेडून घेतला. ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप, असें गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें.