शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 17 मार्च 2024 (10:23 IST)

खडसेंविरुद्ध खडसे लढत होणार का? एकनाथ खडसेंनी केलं स्पष्ट, म्हणाले..

eakath khadse
भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी दिली असून दुसरीकडे शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. यामुळे रावेरमध्ये खडसेंविरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी खुद्द रावेरमध्ये खडसेंविरुद्ध खडसे अशी लढत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
रावेर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पार पडली. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आला असून या मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यासंदर्भात ही महत्वाची बैठक होती.
 
या बैठकीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना रावेरमध्ये खडसेविरुद्ध खडसे लढत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
काय म्हणाले एकनाथ खडसे?
“रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढाई होणार नाही. मी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नाही. तसेच रोहिणी खडसे यांनी विधानसभा लढवली होती, त्यामुळे त्याही उमेदवार नसणार आहेत. आम्ही सात – आठ इच्छुकांची छाननी केली आहे, “त्यातून एक जण उमेदवार राहिलं, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor