शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (15:59 IST)

पाकिस्तान: टीव्ही शो मध्ये 'या' नेत्याच्या मारली मुस्काटात

पाकिस्तानातल्या एका डिबेट शोमध्ये दोन नेत्यांदरम्यान झटापट झाल्याचं समोर आलंय. त्यात एका नेत्याच्या कानाखाली लगवण्यात आल्यानंतर पाकिस्तानमध्ये या दोन नेत्यांबाबतची चर्चा चांगलीच रंगली आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या फिरदौस आशिक अवान आणि पीपीपी पक्षाचे नेते अब्दुल कादिर खान मंदोखेल यांच्यात वाद झाल्याचं दिसतंय.
 
पाकिस्तानी न्यूज चॅनल एक्सप्रेस न्यूज या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती.
 
अँकर जावेद चौधरी यांच्या 'कल तक' नावाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांना भ्रष्टाचार या विषयावर चर्चा करायला बोलावलं होतं. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण लागलं.
 
मंदोखेल यांनी फिरदौस यांच्यावर सरळ सरळ भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर फिरदौस अवान यांनी त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे मागितले आणि म्हटलं की त्या मंदोखेल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकतील.
 
वाद वाढत गेला आणि अशात तर फिरदौस यांनी मंदोखेल यांची कॉलर पकडली आणि त्यांच्या मुस्काटात मारली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मारामारी सुरू झाली.
 
कोण आहेत फिरदौस आवान आणि मंदोखेल
पीटीआयच्या नेत्या फिरदौस अवान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी माहिती आणि प्रसारण बाबींच्या विशेष सहायक होत्या आणि सध्या पंजाब सुभ्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष सहायक आहेत.
 
तर कादिर खान मंदोखेल बिलावल भुट्टोंच्या पक्षाच्या पीपल्स पार्टीचे खासदार आहेत.
 
त्यांनी नुकताच कराचीत झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये विजय संपादन केला होता.
 
फिरदौस अवान यांचं स्पष्टीकरण
पीटीआय नेत्या अवान यांनी ट्वीट करून या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट केलाय ज्यात त्या म्हणतात की, "मंदोखेल त्यांच्याबाबतीत सतत अपशब्द वापरत आहे."
 
त्यांचं म्हणणं आहे की या व्हीडिओचा एक छोटासा भाग लीक केला गेलाय पण या कार्यक्रमाचा पूर्ण व्हीडिओ सादर केला तर लक्षात येईल की त्यांना हात का उगारावा लागला.
 
पुढे त्यांनी असंही म्हटलंय की त्या आपल्या कायदेशीर सल्लागारांशी बोलत आहेत आणि त्या मंदोखेल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करतीलच पण महिला शोषणाची तक्रार करण्याचाही विचार करत आहेत.