मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 डिसेंबर 2022 (16:02 IST)

लिओ वराडकर : मूळ कोकणचे असलेले आयर्लंडचे पंतप्रधान जेव्हा त्यांच्या गावी आले होते

भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांची पुन्हा एकदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. वराडकर हे 30 महिन्यांनी पुन्हा एकदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. लिओ वराडकर हे मूळचे सिंधुदुर्गातल्या मालवण येथील वराड गावचे आहेत. जून 2017 मध्ये त्यांना पहिल्यांदा आयर्लंडचं पंतप्रधानपद मिळालं होतं.
 
मग 2020 साली झालेल्या निवडणुकीनंतर वराडकर यांच्या फाईन गेल पक्षानं फिएना फेल आणि ग्रीन पार्टी या पक्षांसह आघाडी सरकार स्थापन केलं होतं. आघाडीच्या अटींनुसार दोन पक्षांनी पंतप्रधानपद वाटून घेतलं होतं. त्यानुसार फिएना फेल पक्षाचे मीहॉल मार्टिन यांची 16 डिसेंबर 2022 पर्यंत पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती.
 
त्यावेळी उपपंतप्रधानपद लिओ वराडकरांकडे होतं आणि शनिवारी म्हणजे 17 डिसेंबरला त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक झाली. त्यामुळे आता एकाच वेळी युरोप खंडातल्या तीन देशांत पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे नेते विराजमान झाले आहेत.
वराडकर यांच्याशिवाय सध्या ऋषी सुनक हे युकेच्या पंतप्रधानपदी तर मूळचे गोव्याचे अँटोनियो कोस्टा पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी आहेत.
 
वराडकरांचं महाराष्ट्राशी नातं
लिओ वराडकर यांचे वडील अशोक वराडकर हे पेशानं डॉक्टर होते. ते मूळचे सिंधुदुर्गातल्या वराड गावचे आणि मुंबईतही राहायचे. 1960साली ते भारतातून इंग्लंडला गेले.
इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करताना अशोक यांची आयरिश वंशाच्या आणि पेशानं नर्स असलेल्या मरियम यांच्याशी ओळख झाली. दोघांनी लग्न केलं आणि मग 70च्या दशकात हे जोडपं रिपब्लिक ऑफ आयर्लंडला राहायला गेलं.
18 जानेवारी 1979 रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन शहरात लियो यांचा जन्म झाला. ते अशोक यांचे सर्वात लहान पुत्र आहेत.
त्यांनी सेंट फ्रान्सिस नॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतलं. तर 2003 साली डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी मेडिकलची पदवी घेतली.
विद्यार्थी असल्यापासूनच त्यांनी राजकारणात रस घेतला होता. मग वैद्यकीय व्यवसायाकडून त्यांची वाटचाल राजकारणाकडे झाली. 
 
वयाच्या 20व्या वर्षी लिओ यांनी स्थानिक निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.  2004 साली मात्र त्यांना स्थानिक पातळीवर निवडणूक लढवण्यात यश आलं.
2007 साली ते डब्लिन वेस्टमधून फाईन गेल पक्षाच्या तिकिटावर संसदेत निवडून आले.
 
2011 ते 2013 या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपद भूषवलं.
त्यानंतर 2014 ते 2016 या काळात ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री होते.
2017 साली एंडा केनी यांच्या राजीनाम्यानंतर वराडकर पहिल्यांदाच फाइन गेल पक्षाचे प्रमुख म्हणून निवडले गेले. त्यांना पंतप्रधान म्हणून निवडण्यात आलं.
तेव्हा 39 वर्षांचे वराडकर हे आयर्लंडचे सर्वात तरूण आणि पहिलेच समलिंगी पंतप्रधान बनले.
 
2019 साली त्यांनी सिंधुदुर्गात आपल्या मूळ गावाला भेट दिली होती. त्यावेळी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना वराडकर म्हणाले होते, "हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. मी माझे आईवडील, माझ्या बहिणी आणि त्यांचे नवरे, काही नातवंडं आणि माझ्या पार्टनरबरोबर इथे आलोय. म्हणजे याला एक मोठ्ठा कौटुंबिक दौराच म्हणता येईल. "
 
2020 साली फेब्रुवारीमध्ये त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, पण पुढचे काही महिने ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार पाहात होते.  
 
ब्रेक्झिट आणि आयर्लंडचा व्यापार
आयर्लंड या बेटाच्या दक्षिणेकडील मोठ्या भागावर रिपब्लिक ऑफ आयर्लंड हे राष्ट्र वसलं आहे. तर या बेटाचा उत्तरेकडचा काही प्रदेश म्हणजे नॉर्दन आयर्लंड हा युनायटेड किंग्डम अर्थात युके या देशाचा भाग आहे.
 
युके युरोपियन युनियनचा भाग होता, तेव्हा दोन्ही देशांतील आयरीश लोकांमध्ये सुलभतेनं व्यवहार होत होते. पण युकेनं ब्रेक्झिटचा निर्णय घेतला.
 
ब्रेक्झिट लागू होण्याच्या काळात लियो वराडकर रिपब्लिक ऑफ आयर्लंडचे पंतप्रधान बनले.
 
वराडकर यांच्या नेतृत्त्वात रिपब्लिक ऑफ आय़र्लंडनं युकेसोबत वाटाघाटी केल्या, जेणेकरून सीमेच्या दोन्ही भागांत आयरिश लोकांच्या येण्याजाण्यावर कडक निर्बंध लागणार नाहीत. 
 
कोव्हिड काळातलं काम
2020 साली वराडकर देशाच्या उपपंतप्रधानपदी होते आणि जगाप्रमाणेच आयर्लंडनंही कोव्हिडचा सामना करावा लागला.
 
2013 मध्ये वराडकारांनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडली होती, पण कोव्हिड काळात ते पुन्हा वैद्यकीय पेशात परतले.
 
कोव्हिडचा सामना करण्यासाठी डॉक्टर्सची कमतरता पाहता, त्यांना आठवड्यातून एक दिवस लोकांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. ते या काळात फोनवरून लोकांना गरज पडल्यास वैद्यकीय सल्लाही द्यायचे.
 
साहजिकच वराडकर यांच्या लोकप्रियतेतही तेव्हा वाढ झाली.  
 
18 सप्टेंबर 2020 रोजी कोव्हिड काळातल्या निर्बंधांविषयी डब्लिनमध्ये बोलत असताना कोणीतरी त्यांच्या अंगवार ज्यूस टाकला होता. त्यावर वराडकर म्हणाले होते, की त्यांच्याकडे कपड्यांचा आणखी एक जोड आहे आणि ते आपलं काम सुरू ठेवतील. सुरक्षा वाढवण्यासही त्यांनी तेव्हा नकार दिला होता.
 
आयर्लंडचे पहिले 'गे' पंतप्रधान
युरोपातल्या सर्वात परंपरावादी आणि सनातनी देशांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयर्लंडमध्ये वराडकर हे उदारमतवादाचा चेहरा म्हणून समोर आले आहेत.
आयर्लंडमध्ये 1993 पर्यंत समलैंगिकता हा गुन्हा मानला जाई. 2013 साली झालेल्या एका सार्वमत चाचणीनंतर हे चित्र बदल.
मे 2015 मध्ये समलिंगी विवाहांना मान्यताही मिळाली. सार्वमताचा कौल समलैंगिक विवाहाच्या बाजूने यावा, यासाठी लिओ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
जानेवारी 2015 मध्येच वराडकर यांनी आयर्लंडच्या सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत  आपण समलैंगिक असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री होते.
"मी एक समलिंगी मनुष्य आहे आणि माझ्यासाठी समलैंगिक असणं ही फार मोठी बाब नाही. मला आशा आहे की दुसऱ्या कुणासाठीही ही फार मोठी बाब नसेल. असायला पण नको," असं त्यावेळी लिओ यांनी म्हटलं होतं.
 
त्यानंतर गर्भपातविरोधी कायद्यात बदल व्हावा म्हणून लिओ प्रयत्नशील होते आणि आता यासंदर्भातल्या सार्वमताचा निकालही त्यांच्या बाजूनं लागला होता.
 
गर्भपाताविषयी सार्वमतात महत्त्वाची भूमिका
आयर्लंडच्या घटनेतील आठव्या कलमामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गर्भपात न करण्यासंबंधीचा उल्लेख होता. पण 2018 साली या कायद्यात बदल करण्यात आले, त्यात वराडकर यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली.
 
भारतीय वंशाच्या सविता हलप्पनावार या 31 वर्षीय महिलेला 2012मध्ये गर्भपाताला नकार देण्यात आला. प्रकृती गंभीर झाल्यानं सविता यांचा आयर्लंडमध्ये मृत्यू झाला.
 
यानंतर 2017मध्ये गर्भपाताशी निगडीत कायद्यातील बदलांसंबंधी आयर्लंड सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. 
 
यासंदर्भात 26 मे 2018 रोजी आयर्लंडमध्ये घेतलेल्या सार्वमतात जवळपास 66.4 % आयरिश लोकांनी गर्भपातासंबंधीच्या कायद्यात बदल करावा, या बाजूनं मत दिलं तर 33.6 टक्के लोकांनी कायद्यात बदल होऊ नये, या मताचे होते.
 
"एका आधुनिक देशासाठी एका आधुनिक राज्यघटनेची गरज आहे, असं लोकांनी आज दिलेल्या कौलावरून स्पष्ट होतं," असं मत सार्वमतानंतर वराडकर यांनी व्यक्त केलं होतं.

Published By- Priya Dixit