शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (20:51 IST)

मोरक्को: ‘आई-वडील किंवा मुलगा यांच्यापैकी एकाचाच जीव मला निवडायचा होता

earthquake
मोरोक्कोत नुकत्याच आलेल्या भूकंपाने मोठं थैमान घातलं आहे. या भूकंपात मोठी जीवितहानी झाली असून पीडितांवर ओढावलेल्या प्रसंगांची भीषणता पाहिल्यास तेथील परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.
या भूकंपाने मोरोक्कोतील नागरिकांची जणू सत्वपरीक्षाच पाहिली. असाच एक हृदयद्रावक प्रसंग येथील अटलास पर्वतरांग परिसरात राहणाऱ्या तय्यब ऐत इगेनबाझ यांच्यावर ओढावला होता.
 
तय्यब यांना भूकंपात अडकलेल्या आपल्या कुटुंबीयांपैकी केवळ एकालाच वाचवण्याची संधी मिळाली. तय्यब यांचे कुटुंबीय भूकंपात अडकले तेव्हा आई-वडील किंवा मुलगा यांच्यापैकी केवळ एकालाच वाचवण्यासाठी वेळ मिळणार होता. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला वाचवलं, पण आई-वडिलांना वाचवू न शकल्याचं दुःख त्यांच्या मनाला सतत बोचत आहे.
 
मोरोक्कोतील अटलास पर्वतरांगा परिसरात तय्यब हे शेळ्या राखण्याचं काम करतात. येथील डोंगराच्या पायथ्याशी एके ठिकाणी आपल्या छोट्याशा दगडी घरात ते राहायचे.
 
या घरात तय्यब, त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील इतके सदस्य अनेक वर्षांपासून राहायचे.
 
शुक्रवारी रात्री मोरोक्कोत 60 वर्षांतील सर्वांत मोठा भूकंप आला. या भूकंपाची झळ तय्यब यांच्या घरालाही बसली. भूकंपात त्यांचं हे घर पूर्णपणे कोसळलं.
 
हे घर दाखवण्यासाठी तय्यब यांनी मला त्यांच्या घरासमोर नेलं. या घराचे केवळ आता अवशेष उरले आहेत.
 
मला घर दाखवताना तय्यब म्हणाले, “तुम्ही अजूनही आत डोकावून पाहू शकता. ते तिथेच होते.”
 
तय्यब यांनी धीर एकवटून आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाची माहिती मला दिली. ते म्हणाले, “ते सगळं अचानकच घडलं. भूकंप आल्यानंतर आम्ही सगळे दरवाजाच्या दिशेने पळालो. माझे आई-वडील एका खोलीत झोपलेले होते. मी आईला आवाज दिला. पण ती माझ्या वडिलांची वाट पाहत तिथेच थांबली.”
 
गडबडीत पत्नी आणि मुलीला घेऊन तय्यब बाहेर पडले. पण बाहेर आल्यानंतर आपला मुलगा आणि आई-वडील हे आतच अडकले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तोपर्यंत त्यांचं घर ढिगाऱ्यात बदललं होतं. या ढिगाऱ्यात एका ठिकाणी आपल्या मुलाचा हात त्यांना दिसला.
 
आता कोणत्याही परिस्थितीत त्याला झटपट बाहेर काढावं लागेल, हे समजण्यास तय्यब यांना वेळ लागला नाही. त्यांनी तत्काळ वर पडलेले दगडधोंडे बाजूला केले. एक हात पकडून मुलाला वर खेचून घेतलं.
 
यानंतर तय्यब आपल्या आई-वडिलांच्या दिशेने गेले. ते घराच्या मोठ्या स्लॅबखाली अडकलेले होते. पण त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तय्यब यांना उशीर झाला.
 
मला आई-वडील आणि मुलगा यांच्यापैकी एकालाच वाचवता आलं, डोळ्यात पाणी घेऊन तय्यब बोलत होते. “
 
“मी माझ्या आई-वडिलांना वाचवू शकलो नाही. त्यांच्या अंगावर एक मोठी भिंत पडली होती. मला त्यांना बाहेर काढता आलं नाही. मी त्यांना मरताना पाहिलं.”
 
आपल्या आकाशी रंगाच्या जीन्स पँटकडे बोट दाखवून तय्यब म्हणाले, “या पँटला लागलेलं रक्त माझ्या आई-वडिलांचंच आहे.”
 
तय्यब दोन दिवसांपासून त्याच कपड्यांवर आहेत. त्यांचे सगळे कपडे पडलेल्या घरात अडकले आहेत.
 
सध्या तय्यब यांचं कुटुंब जवळच तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या तंबूत राहत आहे. तय्यब यांचा सगळा पैसा त्यांच्या घरी होता. भूकंपात त्यांच्या बहुतांश शेळ्याही मारल्या गेल्या आहेत.
 
“आता आम्हाला एक नवं आयुष्य सुरू करत असल्याचं वाटत आहे. आई-वडील नाहीत, घर नाही. जेवण, कपडे नाही. मी 50 व्या वर्षी माझं नवं आयुष्य सुरू करतोय.”
 
आता इथून पुढे काय करावं, याची तय्यब यांना काहीच कल्पना नाही. मात्र आई-वडिलांनी दिलेली एक शिकवण त्यांना चांगलीच लक्षात आहे. ती म्हणजे ‘संयम पाळणे, मेहनत करणे आणि धीर न सोडणे.”
 
आम्ही बोलत असताना तय्यब यांचा मुलगा आदम आमच्याकडे आला. त्याने एक फुटबॉल जर्सी घातलेली होती.
 
वडिलांच्या हातात हात घालत तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला वाचवलं.”
 
तय्यब यांच्या घरापासून जवळच अमिझमिझ गावाच्या रस्त्यावर आणखी एका बाप-लेकाची जोडी आम्हाला पाहायला मिळाली.
 
अब्दुल माजिद एत जाफर आणि मोहम्मद अशी त्यांची नावं.
 
अब्दुल सांगतात, “भूकंप आला त्यावेळी मी, माझी पत्नी आणि तीन मुलं घरात होतो. त्यांचा मुलगा मोहम्मद घराबाहेर पडला. पण इतर सगळे घरातच अडकलो होतो. माझे पाय ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यावेळी एका शेजाऱ्याने त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर पुढचे दोन तास ते आपली पत्नी आणि मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या पत्नीसह दोन्ही मुलींना ते वाचवू शकले नाहीत.”
 
अब्दुल माजिद हे आता त्यांच्या घराच्या शेजारीच एका तंबूत झोपतात. ते उभ्या असलेल्या ठिकाणावरून त्यांच्या घराची पडलेली भिंत, आतमधील फ्रिज, वाळवलेले कपडे दिसत होते.
 
ते म्हणाले, “या घरापासून मी लांब जाऊ शकत नाही. कारण माझ्या घरातील सामानाचं मला संरक्षण करायचं आहे. या सामानाशी माझ्या आठवणी जोडलेल्या आहेत.”
 
आम्ही बोलत असताना वाहनांमधून काही लोक गेले. त्यांनी भूकंपग्रस्तांप्रती आपल्या सहवेदना प्रकट केल्या. दुःखात असलेल्या लोकांना दिलासा देण्याचा इतर जण प्रयत्न करत होते.
 
अखेरीस अब्दुल म्हणाले, “आमच्या घरात आम्ही पाच जण होतो. आता तीनच जण उरलो आहोत. आता मी माझं आयुष्य एकाच व्यक्तीसाठी जगणार आहे. तो म्हणजे माझा मुलगा.”
 






Published By- Priya Dixit