शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ना पाणी, ना सावली; शेकडो हज यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू, सौदी अरेबियात नेमकं काय घडलं?

हज यात्रेला मुस्लिमांमध्ये प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळेच दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो मुस्लीम हज यात्रा पूर्ण करण्यासाठी सौदी अरेबियात येत असतात.
 
यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे शेकडो हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला. हज यात्रेत असणारी परिस्थिती, तिथली व्यवस्था, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांची वागणूक, हज यात्रेकरूंनी व्यक्त केलेली मतं याबद्दलचा बीबीसीने घेतलेला हा आढावा :
 
सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्यासाठी गेलेल्या 'शेकडो' हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.
 
सौदी अरेबियात या यात्रेच्या काळात असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे आणि सुविधांच्या कमतरतेमुळे हे घडलं आहे. यानंतर सौदी अरेबियाच्या प्रशासनाला टीकेला सामोरं जावं लागतं आहे.
 
विविध देशांची परराष्ट्र खाती आणि इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किमान 562 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचा दावा रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं केला आहे, तर एएफपीनुसार जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामधील बहुतांश लोक इजिप्तचे नागरिक आहेत.
पाकिस्तानच्या हज मिशनचे संचालक अब्दुल वहाब सूमरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान 35 पाकिस्तानी हज यात्रेकरूंचा सुद्धा मृत्यू झाला आहे.
 
अब्दुल सूमरो यांनी बीबीसीला सांगितलं की, यामधील 26 जणांचा मृत्यू हजच्या आधी मक्केमध्ये झाला. तर उर्वरित लोकांचा मृत्यू हज यात्रेशी संबंधित प्रथा पार पाडताना झाला. मात्र, त्या लोकांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल त्यांनी फारशी माहिती दिली नाही.
हज यात्रेमधील सुविधांची कमतरता आणि व्यवस्थापनाचा अभाव याची तक्रार पाकिस्तानी हज यात्रेकरूंनी केल्यानंतर बीबीसीनं पाकिस्तान हज मिशनला संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून आतापर्यत कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.
 
नेमका किती जणांना मृत्यू झाला आहे, याबद्दलची आकडेवारी सौदी अरेबियानं अद्याप जाहीर केलेली नाही. मागील 30 वर्षांमध्ये सौदी अरेबियात हज यात्रेच्या काळात चेंगराचेंगरी, तंबूत आग लागणं आणि इतर दुर्घटनांमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
सौदी अरेबिया सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जवळपास 18 लाख लोकांनी हज यात्रा पूर्ण केली. यातील 16 लाख लोक परदेशी नागरिक होते.
अनेक देशांमधील हज यात्रेकरूंचा मृत्यू
एएफपी या वृत्तसंस्थेनं दोन अरब अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दावा केला आहे की, हज यात्रेच्या काळात प्रचंड उष्णतेमुळे शेकडो यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृत पावणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक इजिप्तचे आहेत.
 
एएफपीनं दावा केला आहे की, बहुतांश मृत्यू उष्णतेमुळे झाले. मृत पावलेल्यांमधील 323 इजिप्तचे तर 60 जॉर्डनचे नागरिक होते.
 
इजिप्तच्या वैद्यकीय टीमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉयटर्सनं सांगितलं आहे की, मरणाऱ्यांची बहुधा इजिप्तमध्ये नोंदणी झाली नव्हती, त्यामुळे त्यांना अती उष्णतेतसुद्धा रस्त्यावरच रहावं लागलं.
 
ओमाननं अधिकृतरित्या आतापर्यत आपल्या 41 हज यात्रेकरूंचा, ट्युनीशियानं 35 तर जॉर्डननं 6 हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळं मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
 
बीबीसीनुसार, जॉर्डनचे ज्या 41 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मक्कामध्येच दफन करण्याची परवानगी मागितली होती. जॉर्डनचं परराष्ट्र मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयानं या यात्रेकरूंना मक्केत दफन करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर असंही सांगण्यात आलं की हे हज यात्रेकरू जॉर्डनकडून पाठवण्यात आलेल्या सरकारी टीममधील नव्हते.
जॉर्डनच्या दूतावासानं असंही म्हटलं आहे की, जॉर्डनच्या आणखी 106 हज यात्रेकरूंमधील 84 यात्रेकरू अद्याप बेपत्ता आहेत.
 
इंडोनेशियाचे नागरिक असलेल्या 136 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यातील तिघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला होता, असा दावा फ्रान्सच्या 'ले मोंदे' वृत्तपत्रानं 19 जूनला केला होता.
 
सौदी प्रशासनानं सोमवारी मक्केमध्ये यावर्षीची हज यात्रा पूर्ण होण्याबरोबरच तापमान 50 अंश सेंटीग्रेडपर्यत वाढलं असल्याचा इशारा दिला होता हे लक्षात घेतलं पाहिजे.
 
रविवारी प्रशासनानं अशा 2764 रुग्णांची माहिती दिली, ज्यांची तब्ब्येत उष्णता आणि सूचनांचं पालन न केल्यामुळे बिघडली होती. सौदी अरेबियाच्या सरकारी वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मक्केतील तापमान 51.8 अंश सेल्सिअस पर्यत वाढलं होतं.
 
हज यात्रेकरूंचे कुटुंबिय अजूनही सौदी अरेबियातील हॉस्पिटलमध्ये बेपत्ता यात्रेकरूंचा शोध घेत असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
 
'जनावरांसारखी वागणूक'
बीबीसीनं, पाकिस्तानातील सरकारी आणि खासगी वाहिन्यांद्वारे हज यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंशी बोलून तिथली परिस्थिती आणि व्यवस्था याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
इस्लामाबादमधील 38 वर्षांच्या आमना (खरं नाव नाही) आपल्या पतीबरोबर सरकारी वाहिनीकडून हज यात्रा करण्यास गेल्या होत्या. हज यात्रेच्या ठिकाणी असलेली व्यवस्था पाहून त्यांना दु:ख झालं. त्या म्हणतात, "माझा प्रचंड अपेक्षाभंग झाला."
 
मक्केतून बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "इमारतीमधील राहण्याची व्यवस्था, जेवणखाणं सर्व चांगलं आहे. वाहतुकीची व्यवस्था होते, याबद्दल शंका नाही. मात्र आम्ही इथं हज यात्रेच्या महत्त्वाच्या प्रथांचं पालन करण्यासाठी आलो होतो. मात्र त्या दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला जनावरासारखी वागणूक दिली."
 
मे महिन्यात तिथे घालवलेले दिवस अतिशय वेदनादायी होते असं त्या सांगतात. "त्या काळात एका तंबूमध्ये 800 लोकांना ठेवण्यात आलं होतं. हज अदा करण्यासाठी तिथे उपस्थित लोकांसाठी तंबूमध्ये पुरेशी प्रसाधन व्यवस्था नव्हती."
 
तंबूच्या आतील स्थितीबद्दल त्या सांगतात. आमना म्हणतात, "मक्केत प्रचंड उष्णता असतानासुद्धा तंबूमध्ये वातानुकुलनाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तंबूमध्ये जे कूलर लावण्यात आले होते, अनेकदा त्यामध्ये पाणीच नसायचं."
"त्या तंबूमध्ये प्रचंड गुदमरायला व्हायचं. आमच्या शरीरातून घामाच्या धारा निघायच्या. आमची परिस्थिती अतिशय वाईट असायची."
 
आमना यांनी दिलेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाच्या सरकारकडून पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. इतकंच काय हज यात्रेकरूंनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर देखील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करायचे. आमना म्हणतात, "अधिकाऱ्यांशी बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं होतं."
 
हज यात्रेत सुविधांचा बोजवारा उडाला होता. त्याबद्दल आमना सांगतात की मुद्गलफा (हज यात्रेच्या मार्गातील मक्केजवळ असणारा एक मोकळा परिसर) तर एका अंधार कोठडीप्रमाणेच होती. तिथे वीज, पाणी या सुविधाच नव्हत्या.
 
"तिथे नियोजनाचा अभाव होता. अरबांना वाटलं तेव्हा ते दरवाजे बंद करायचे. त्यांना वाटलं तेव्हा दरवाजे खुले करायचे."
 
त्या सांगतात, तिथे भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या हज यात्रेकरूंना डोंगरांमधील खोलगट भागात जागा देण्यात आली होती. त्यामुळे लोकांचा जीव गुदमरत होता.
 
तिथल्या परिस्थितीबद्दल बोलताना आमना पुढे सांगतात की तिथं प्रचंड उष्णता होती. काही लोकांवर प्रसाधनगृहांच्या बाहेर झोपण्याची सुद्धा वेळ आली.
 
मुद्गलफामध्ये स्वत: आमना यांचा जीव गुदमरला होता. त्यांची परिस्थिती बिकट झाली होती.
 
त्या म्हणतात, ती संपूर्ण रात्र मी कशी काढली, हे मला आणि माझ्या परमेश्वरालाच माहित. रात्रभर माझे पती मला पंख्यानं हवा घालत होते. मी त्यावेळेस फक्त एवढीच प्रार्थना करत होती की, "अल्लाह, फक्त फजरचं (सूर्योद्यापूर्वीचं) नमाज पठन करून मला इथून निघू दे."
 
सौदीच्या अधिकाऱ्यांबद्दलचे मत
आमना सांगतात की, जे लोक मिना इथे परत आले, त्यांना परतताना कित्येक तास लागले. त्या दमलेल्या हज यात्रेकरूंना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाजवळसुद्धा सोडण्यात आलं नाही. "तिथल्या ड्रायव्हरना रस्ते माहित नव्हते. त्यातच त्यांनी गाड्या आणि वातानुकुलन यंत्रणा बंद केली होती."
 
तिथल्या वाहतूक व्यवस्थेबद्दल बोलताना त्या सांगतात की तिथे एक किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीचं भाडं खूपच महागडं आहे. मिना ते मक्के पर्यतच्या अंतरासाठी टॅक्सीवाले तब्बल 2,000 रियाल भाडं मागत होते.
 
प्रथमोपचाराबद्दल त्या सांगतात की, प्रथमोपचारासाठी त्यांच्या गाड्या तर फिरायच्या मात्र त्यांना प्रथमोपचाराच्या छोट्या छोट्या गोष्टी माहित नसायच्या.
 
आमना सांगतात की "त्यांच्या गटामध्ये एक यात्रेकरू कॅलेस्ट्रोफोबिक (गर्दीच्या ठिकाणी ज्यांचा जीव घाबरतो) होता. जमरात मधील गर्दी पाहून त्यांचा श्वास कोंडू लागला. त्यांच्यासाठी आम्ही सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र त्यांचं वर्तन असं होतं जणूकाही त्यांना रुग्ण ही संकल्पनाच कळत नाही."
 
त्या सांगतात की त्या व्यक्तीला ऑक्सिजनची आवश्यकता होती. जमरात मध्ये आपत्कालीन सुविधा होती. मात्र परतीच्या मार्गावर त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती.
 
त्या सांगतात, "रस्त्याच्या कडेला बसून आम्ही सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडे अॅम्ब्युलन्सची मागणी करत होतो. मात्र ते फक्त एवढंच म्हणत होते की मागवतो आहोत, मागवतो आहोत. अखेर एक अॅम्ब्युलन्स आली. त्यातील डॉक्टरनं त्या व्यक्तीला धड दोन सेकंदसुद्धा तपासलं नाही. डॉक्टर एवढंच म्हणाला की त्यांना काहीही झालेलं नाही आणि तिथून निघून गेला."
आमना पुढे सांगतात की, "25 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेल्यावर आम्ही त्यांना दरडावलं की या गोष्टीचा व्हिडिओ बनवून आम्ही तो सोशल मीडियावर शेअर करू. तुम्ही हज यात्रेकरूंशी कसं वागता हे जगाला दाखवू. हे ऐकून त्यांनी आम्हाला व्हिडिओसुद्धा बनवू दिले नाहीत. मग खूप वेळानं एक अॅम्ब्युलन्स मिळाली."
 
त्या म्हणतात, "सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांना तुमच्या अडचणींची जाणीव नसते आणि ते तुम्हाला मदतसुद्धा करत नाहीत."
 
आमनाचं म्हणणं आहे की अराफात मध्ये पाकिस्तानी यात्रेकरूंचा तंबू सर्वात शेवटी होता. तिथं लिहिलं होतं की, "हे अराफातचं शेवटचं टोक आहे." त्यांचं म्हणणं आहे की अराफात मध्ये खूपच चालावं लागतं. मात्र तिथली व्यवस्था चांगली होती.
 
त्या म्हणाल्या, "मी 25 दिवसांसाठी साडे अकरा लाख (पाकिस्तानी रुपये) मोजले. माझ्यासाठी ही काही लहान सहान रक्कम नाही. माझ्यासारखे हज यात्रेकरू स्वयंसेवकांचा खर्चसुद्धा देतात. ते मात्र आमची दखल घेण्याऐवजी इमारतीच्या रिसेप्शनमध्ये बसलेले असतात. हज यात्रेच्या प्रथा सुरू झाल्यानंतरच्या दिवसांमध्ये एकही स्वयंसेवक मदतीसाठी उपलब्ध नव्हता. ते फक्त इतकंच म्हणतात की सर्व जबाबदारी सौदी अरेबियाच्या सरकारची आहे."
 
त्या म्हणतात, "मी तिथे जो सावळागोंधळ पाहिला, सुविधांचा जो अभाव पाहिला आणि ज्या पद्धतीनं तिथे पाकिस्तान्यांना वागणूक मिळते ते पाहिल्यानंतर तर यापुढे मी कोणालाही सरकारी माध्यमातून हज यात्रा करण्याचा सल्ला अजिबात देणार नाही."
 
'सात किलोमीटरच्या रस्त्यावर ना सावली, ना पाणी'
यावर्षी हज यात्रेसाठी सौदी अरेबियात असलेल्या हमीरा कंवल यांनी सांगितलं की, "आम्हाला जेव्हा मिना हून अराफातच्या मैदानात नेण्यात आलं त्या दिवशी आम्हाला हज यात्रेकरूंच्या मृत्यूच्या बातम्या मिळू लागल्या. आम्हाला कळालं की इथं उष्माघातामुळं मृत्यू होत आहेत. तिथे असलेल्या तंबूंमध्ये बसण्यासाठी थोडीशीच जागा होती. यात्रेकरूंनी हज का खुतबा (प्रवचन) ऐकावं यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. अतिशय उष्णतेत लोकांना बाहेर बसावं लागलं. तंबूच्या आत जागा मिळावी यासाठी भांडावं लागलं."
 
मक्केतून बीबीसीशी बोलताना हमीरा म्हणाल्या, मुज्दलफा इथं रात्री मोकळ्या आकाशाखाली मुक्काम करावा लागतो. मात्र तिथे पाकिस्तानी यात्रेकरूंसह इतर अनेक देशांच्या यात्रेकरूंना रेल्वेच्या एका पुलाखाली घाणेरड्या जागेत नेण्यात आलं.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना रेल्वेनं जमरात च्या दिशेनं नेण्यात आलं. मात्र तिथून परतीचा प्रवास फारच त्रासदायक होता.
 
हमीरा सांगतात, "आम्हाला सात किलोमीटर लांब रस्त्यावर चालवलं गेलं. त्या रस्त्यावर ना पाण्याची व्यवस्था होती, ना तिथं कोणत्याही प्रकारची सावली होती. त्यामुळे अनेक हज यात्रेकरूंची तब्ब्येत त्या ठिकाणी बिघडली."
 
तिथल्या व्यवस्थेबद्दल बोलताना हमीराचं म्हणणं होतं की सौदी अरेबिया सरकारच्या गाड्या तर तिथं हजर होत्या. मात्र जे हज यात्रेकरू आजारी पडत होते, जे यात्रेकरू उष्णतेनं बेशुद्ध पडत होते, त्यांच्यासाठी मात्र त्या गाड्यांचा वापर केला जात नव्हता.
"जसं एखाद्या शेतात जनावरांना दाटीवाटीनं एकत्र ठेवलं जातं किंवा पोल्ट्री फार्मध्ये कोंबड्यांना ठेवलं जातं. तसंच तिथे तंबूंमध्ये यात्रेकरूंना ठेवण्यात आलं होतं. यात्रेकरूंनी टाकलेल्या अंधरुणांच्या मधून जाण्याची सुद्धा जागा तिथे नव्हती. तिथे शेकडो लोक असतानासुद्धा मोजकेच प्रसाधनगृह होते."
 
मात्र तुम्ही या सर्व गोष्टींची कोणाकडेही तक्रार करू शकत नव्हता. कोणाचीही मदत घेऊ शकत नव्हता, असं त्या सांगतात.
 
हमीरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे अॅम्ब्युलन्स असून नसल्यासारखीच होती. लांब-लांब अंतरावर कोणतीही मदतीसाठी नसायचं. कोणी भेटलंच तर तो पोलिस कर्मचारी असायचा. त्यांना इंग्रजी भाषा येत नव्हती.
 
त्या म्हणतात, प्रचंड उष्णतेच्या लाटा सुरू असतानादेखील हज यात्रेकरूंना कित्येक तास पायी चालावं लागायचं. कारण जवळच्या मार्गांवर पोलिसांनी रोखून धरलेले होते.
 
हमीरा सांगतात की 19 जूनला मिना इथून जमरात पर्यत जाण्यासाठी आणि तिथून परतण्यासाठी त्यांना 26 किलोमीटरचं अंतर पायी चालावं लागलं. प्रत्यक्षात तो रस्ता फक्त 15 मिनिटांचाच होता. मात्र पोलिसांनी तो मार्ग बंद केला होता. त्यामुळे लांबच्या मार्गानं जाण्याची वेळ यात्रेकरूंवर आली होती.
 
त्या म्हणतात की तिथले पोलिस अधिकारी पुरुष असो की महिला, कोणावरही हात उचलण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
 
जीवरक्षक प्रणालीचा अभाव
हमीरा सांगतात की, "हज यात्रा करत असताना त्यांना अनेक देशांच्या तंबूमधून जाण्याची संधी मिळाली. ते सर्व पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथे सर्वात वाईट परिस्थिती पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेशच्या तंबूंमध्ये दिसते. तिथे असं वाटतं की तुम्ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, दुर्गंधीत बसला आहात."
 
त्या सांगतात की, आज हज यात्रेचा शेवटचा दिवस आहे. ज्या धर्मात स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्वं दिलं जातं त्या धर्मातील सर्वात महत्त्वाच्या प्रथेचं पालन करताना स्वच्छतेकडे इतका कानाडोळा का करण्यात आला असावा? हा प्रश्न मला पडतो.
 
या सर्व प्रकाराबद्दल सौदी अरेबियाचे कॅम्प व्यवस्थापक म्हणतात, "जे आहे ते हेच आहे. यावरच भागवा. आमच्याकडे इतक्याच सुविधा आहे."
 
मोहम्मद आला हे एका खासगी समूहाचे हज यात्रेचे आयोजक आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी माहिती दिली की, ही त्यांची अठरावी हज यात्रा आहे.
 
"सौदी अरेबिया हा हज यात्रेचा नियंत्रक देश आहे, सुविधा देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे नाही," असं मोहम्मद आला म्हणाले.
 
मोहम्मद आला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उष्णतेत एका सर्वसाधारण हज यात्रेकरूला तवाफ-ए-जियारत (परिक्रमा) करण्याव्यतिरिक्त दररोज किमान 15 किलोमीटर चालावं लागू शकतं. इतक्या उष्णतेत चालल्यामुळं थकवा आणि हीट स़्ट्रोकला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. शिवाय जागोजागी पाण्याची व्यवस्थादेखील नसते.
 
ते सांगतात की, आधी हजच्या जागापर्यत पोहोचण्यासाठी जे यू टर्न होते ते खुले होते. मात्र आता ते सर्व मार्ग आणि यू टर्न बंद करण्यात आले आहेत. त्यामुळेच सर्वसाधारण हज यात्रेकरूला आता जास्त पायी चालावं लागतं. इतकंच काय तर त्याचा कॅम्प झोन एक मध्ये ए श्रेणीत असला तरी सुद्धा त्याला आपल्या तंबूपर्यत पोहोचण्यासाठी साध्या रस्त्यानं भर उष्णतेत अडीच किलोमीटर पायी चालावं लागतं.
 
मोहम्मद आला म्हणतात की, जर या मार्गावर एखाद्यावर आणीबाणीची परिस्थिती आली किंवा अचानक त्याची तब्ब्येत बिघडली तर 30 मिनिटांपर्यत त्याच्यापर्यत कोणी पोहचणार नाही. त्याचबरोबर त्याचा जीव वाचवता येईल अशी तिथं अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
 
त्यांनी सांगितलं की त्यांनी असे व्हिडिओ पाहिले आहेत ज्यात इजिप्तच्या अनेक नागरिकांचे मृतदेह दिसत आहेत. ते यामागचं कारण सांगतात. सौदी अरेबियानं या हज यात्रेसाठी त्यांना जो व्हिसा दिला होता त्याचा कालावधी जास्त होता. त्यामुळेच त्यांनी थांबून बेकायदेशीर हज यात्रा पूर्ण केली.
 
मोहम्मद आला यांचं म्हणणं आहे की इजिप्त त्या नागरिकांनी बेकायदेशीर पद्धतीनं हज यात्रा केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कॅम्पसारखी कोणतीही सुविधा नव्हती. परिणामी त्यांना उष्णतेत मोकळ्या आकाशाखाली मुक्काम करावा लागला.
 
हज यात्रेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा दफनविधी
सौदी अरेबियात दरवर्षी हज यात्रेत प्रचंड उष्णता, चेंगराचेंगरी, आजारी पडल्यामुळे किंवा रस्त्यावरील अपघातांसह वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागतो. या पद्धतीनं मरण पावलेल्यांची ओळख पटवणं आणि त्यांचा दफनविधी करणं यासारख्या बाबींची जबाबदारी सौदी अरेबिया सरकार घेते.
 
सौदी अरेबियाच्या हज कायद्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात म्हटलं आहे की, जर एखादा यात्रेकरू हज यात्रा पूर्ण करत असताना मरण पावला तर त्याचा मृतदेह त्याच्या देशात परत पाठवला जाणार नाही. तर सौदी अरेबियामध्येच त्याला दफन केलं जाईल.
 
प्रत्येत हज यात्रेकरू आपल्या हज प्रवेश अर्जामध्ये ही गोष्ट मान्य करतो की, जर तो/ती सौदी अरेबियाच्या जमिनीवर मरण पावला/पावली तर त्याचा/तिचा मृतदेह त्यांच्या देशात परत पाठवला जाणार नाही. तर सौदी अरेबियातच त्याला दफन केलं जाईल. याशिवाय जर एखाद्या मृत यात्रेकरूच्या कुटुंबियांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला तरी ते मान्य केलं जाणार नाही.
सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जाणारे यात्रेकरू आपल्या कॅम्पमध्ये किंवा रस्त्यावर किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा अपघातात मारले गेले तर त्याची बातमी सर्वात आधी सौदी अरेबियात असणाऱ्या संबंधित देशाच्या हज मिशनला दिली जाते.
 
अनेक वेळा हॉस्पिटलमधील अधिकारी किंवा सर्वसाधारण नागरिक थेट हज मिशनला ही माहिती देतात. एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू कुठे आणि कसा झाला यावर सुद्धा ही बाब अवलंबून असते.
 
सर्व हज यात्रेकरूंना मनगट किंवा मानेवर एक ओळख बॅंड घालणं आवश्यक असतं. या बॅंडवर त्या व्यक्तीचं नाव, वय, एजेन्सी, देश, ओळखपत्र क्रमांक इत्यादी माहिती असते. त्यामुळे त्या बॅंडवरून मृतकाची माहिती मिळू शकते.
 
या महत्त्वाच्या माहितीद्वारे मृत व्यक्तीची ओळख पटवली जाते. जर मरणाऱ्या हज यात्रेकरूसोबत एखादा नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असेल तर तोसुद्धा ओळख पटवू शकतो.
हज यात्रेत मरण पावलेल्या यात्रेकरूच्या कुटुंबियांना जर सौदी अरेबियात जाऊन त्याच्या मृतदेहाचं अंतिम दर्शन घ्यायचं असल्यास ते शक्य होत नाही. मात्र मरणाऱ्याचे कुटुंबिय जर मक्केतच हजर असतील तर त्यांना मृतदेहाचं अंतिम दर्शन घेता येतं. अत्यंयात्रेत सहभागी होता येतं.
 
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर एखाद्या नोंदणीकृत डॉक्टरकडून सर्टिफिकेट किंवा जवळच्या हॉस्पिटलमधून, हज कार्यालयातून किंवा वैद्यकीय केंद्रातून मृत्यूचा दाखला घेता येतो.
 
मृतदेहाची ओळख पटल्यावर आणि मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर त्या मृतदेहाला आंघोळ घालण्याचं आणि दफन करण्याचं काम केलं जातं.
 
जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मिना आणि मुज्दलफा या ठिकाणी मुक्काम करताना झाला तर त्याच्यासाठी नमाज-ए-जनाजा अदा केली जाते. या नमाजचं पठण अल-हराम किंवा काबा शरीफ मशीदीत केलं जातं.
 
तर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मदीना मध्ये झाला तर मस्जिद-ए-नबवी मध्ये नमाज-ए-जनाजाचं पठण केलं जातं. याशिवाय जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू जद्दा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाला तर त्याच्यासाठी नमाज-ए-जनाजाचं पठण स्थानिक मशीदीत केलं जातं.
 
Published By- Priya Dixit