मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 3 एप्रिल 2023 (22:32 IST)

पुतिन यांना विरोध करणाऱ्यांची अवस्था काय झाली?

bladimir putin
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सत्तेच्या वर्तुळात कोणतंही आव्हान उरलेलं नाही. त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना एकतर देशाबाहेर हाकलण्यात आलंय किंवा तुरुंगात पाठवण्यात आलंय. आणि काहींना तर मारण्यातही आलंय. त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केलं. याआधी त्यांनी आपल्या विरोधकांना संपवून टाकलं होतं.
 
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जेव्हा सत्ता हाती घेतली, अगदी त्याच दिवसापासून रशियातील राजकीय महत्त्वाकांक्षेने प्रेरित लोकांना संपवायला सुरुवात केली.
 
रशियन तेल कंपनी युकोसचे माजी प्रमुख मिखाईल खोडोरकोव्स्की यांनी 2003 मध्ये विरोधी पक्षांना निधी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर करचुकवेगिरीच्या आरोपाखाली त्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास झाला. सुटकेनंतर त्यांनी रशिया सोडलं.
रशियातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणाऱ्या बोरिस बेरेझोव्स्की यांनी पुतिन यांना सत्तेवर यायला मदत केली होती. पण नंतर या दोघांचेही मार्ग वेगळे झाले. त्यांनी 2013 साली ब्रिटनमध्ये कथितरित्या आत्महत्या केली.
 
पुढे काळ सरला तशी रशियातील सर्व प्रमुख माध्यमं पुतिन सरकारच्या ताब्यात आली.
 
अॅलेक्सी नवेलनी विरुद्ध कारवाई
रशियातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते असलेले अॅलेक्सी नवेलनी आज तुरुंगात आहेत. त्यांनी तुरुंगात असताना म्हटलं होतं की, "पुतिन यांनी गुन्हेगारी आणि आक्रमक युद्ध सुरू केलं असून, त्यांनी लाखो लोकांना विनाकारण युद्धात ढकललं आहे."
 
ऑगस्ट 2020 मध्ये अॅलेक्सी नवेलनी सायबेरियाच्या दौऱ्यावर होते. याच प्रवासात त्यांना नोविचोक नावाचं अत्यंत जहरी असं विष देण्यात आलं होतं. या घटनेत अॅलेक्सी यांचा मृत्यू निश्चितच होता पण ते वाचले आणि त्यांना उपचारासाठी जर्मनीला न्यावं लागलं.
 
जानेवारी 2021 मध्ये ते रशियात परतले. पण कटकारस्थान आणि न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाखाली त्यांना लगेचच अटक करण्यात आली. त्यांना नऊ वर्षांचा तुरुंगवास झाला आहे.
नवेलनी यांनी 2010 नंतर सरकार विरोधात मोर्चा उघडला होता. त्यांनी सरकारविरोधी रॅलींमध्ये सक्रियपणे सहभागी घेतला होता.
 
त्यांचं सर्वात मोठं राजकीय शस्त्र होतं भ्रष्टाचार विरोधी फाउंडेशन एफबीके. या फाउंडेशनने पुतिन सरकारविरोधी जे खुलासे केले होते ते लाखो वेळा ऑनलाइन पाहिले गेले.
 
पुढे रशियन सरकारने 2021 मध्ये या फाउंडेशनला अतिरेकी म्हणून घोषित केलं. नवेलनी यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप कायम फेटाळून लावलेत.
 
त्यावेळी अॅलेक्सी नवेलनी यांच्या अनेक सहकाऱ्यांवर सुरक्षा यंत्रणांचा दबाव होता. यातले काहीजण परदेशात पळून गेले.
 
यामध्ये एफबीकेचे माजी प्रमुख इव्हान झडानोव, वकील कोंगोव सोबोल आणि रशियामधील अॅलेक्सी नवेलनी यांच्या कार्यालयांतील बहुतेकांचा समावेश होता.
 
2019 मध्ये अॅलेक्सी नवेलनी यांचा राईट हँड असणाऱ्या लिओनिड वोल्कोव्ह यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला सुरू झाला. त्यानंतर त्यांनी ही रशिया सोडला.
 
युद्धाला विरोध करणाऱ्यांची अवस्था
इल्या याशिन हे रशियन युद्धाचे टीकाकार होते. पण त्यांना देखील तुरुंगात डांबण्यात आलं. एप्रिल 2022 च्या यू ट्यूबच्या लाइव्ह स्ट्रीममध्ये त्यांनी रशियन सैन्याने केलेल्या संभाव्य युद्ध गुन्ह्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. याच लाईव्ह मध्ये त्यांनी पुतिन यांना युद्धातील सर्वात निर्दयी कसाई असं म्हटलं होतं.
 
या लाइव्ह स्ट्रीममधून रशियन सैन्याबद्दल जाणूनबुजून खोटी माहिती पासरवल्याचा आरोप करत इल्या याशिनला साडेआठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
 
इल्या याशिन यांनी 2000 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्याच वर्षी पुतिन सत्तेवर आले.
 
अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केल्यानंतर ते 2017 मध्ये मॉस्कोमधील क्रॅस्नोसेल्स्की जिल्हा परिषदेचे प्रमुख झाले. तिथेही त्यांनी क्रेमलिनचा विरोध करणं सुरूच ठेवलं.
 
2019 मध्ये रशियन सरकारने मॉस्को सिटी कौन्सिल निवडणुकीसाठी स्वतंत्र आणि विरोधी पक्षातील उमेदवारांची नोंदणी करण्यास नकार दिला होता. इल्या याशिन यांनी या गोष्टीचा निषेध केला. यासाठी त्यांना महिनाभराचा तुरुंगवास पत्करावा लागला.
 
केंब्रिज मधून शिक्षण घेतलेले पत्रकार आणि कार्यकर्ता व्लादिमीर कारा-मुर्झा यांना एक गूढ विष दिलं गेलं. या विषाच्या परिणामामुळे 2015 आणि 2017 मध्ये ते कोमात गेले.
त्यांनी एप्रिल 2022 मध्ये युक्रेनवरील हल्ल्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. व्लादिमीर कारा-मुर्झा यांच्यावर रशियन सैन्याबद्दल खोट्या बातम्या परवल्याचा, देशद्रोहाचा आरोप होता.
 
त्यांचे वकील सांगतात, यात दोषी आढळल्यास त्यांना 25 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
 
त्यांनी पुतिन यांच्यावर टीका करणारे अनेक लेख लिहिलेत. 2011 मध्ये रशियामधील मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली होती. ते विरोधकांचं नेतृत्व करत होते.
 
अनेक पाश्चात्य देशांनी लादलेल्या या निर्बंधांना मॅग्नीत्स्की कायदा म्हणून ओळखलं जातं. वकील सर्गेई मॅग्नीत्स्की यांचा 2009 मध्ये रशियन तुरुंगात मृत्यू झाला.
 
लोकशाहीच्या समर्थनार्थ लढा...
मिखाईल खोडोरकोव्स्की यांनी 'ओपन रशिया' नावाचा लोकशाही समर्थक स्थापन केला होता. व्लादिमीर कारा-मुरझा हे त्याचे उपाध्यक्ष होते.
 
2021 मध्ये या गटावर बंदी घालण्यात आली.
 
ओपन रशियाचे प्रमुख आंद्रेई पिवोवारोव या गटात सामील झाल्याच्या आरोपाखाली चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.
 
कारा-मुरझा यांना मोठा तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. पण त्यांचे जवळचे मित्र आणि रशियन विरोधी पक्षनेते बोरिस नेमत्सोव्ह किमान जिवंत तरी आहेत.
 
पुतिन सत्तेवर येण्यापूर्वी नेमत्सोव्ह हे निझनी नोव्हगोरोड प्रांताचे गव्हर्नर, ऊर्जा मंत्री आणि नंतर उपपंतप्रधान होते. ते रशियाच्या संसदेतही निवडून गेले होते.
 
त्यानंतर ते पुतिन यांच्या विरोधात बोलू लागले. त्यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका करणारा रिपोर्ट प्रकाशित केला. त्यांच्या निषेधार्थ त्यांनी अनेक मोर्चे काढले.
27 फेब्रुवारी 2015 रोजी क्रेमलिनच्या बाहेर एक पूल ओलांडताना त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. कारण त्यांनी 2014 मध्ये रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाविरुद्ध मोर्चाला पाठिंबा दिला होता.
 
नेमत्सोव्ह यांच्या हत्येसाठी चेचन वंशाच्या पाच लोकांना दोषी ठरवण्यात आलं होतं. पण त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
त्यांच्या मृत्यूच्या सात वर्षांनंतर काही गोष्टी समोर आल्या. यात नेमत्सोव्ह यांची हत्या करण्यासाठी एक सरकारी एजंट त्यांचा पाठलाग करत होता.
 
सरकारला विरोध केल्यावर लोकांना अशा पद्धतीने लक्ष्य केलं जातं.
 
पुतिन यांची योजना यशस्वी झाली का?
मागच्या वर्षी रशियाने युक्रेन विरोधात युद्ध छेडलं. त्या दिवसांनंतर रशियातील स्वतंत्र विचारसरणीच्या प्रसारमाध्यमांना अनेक निर्बंध किंवा धमक्या मिळाल्या.
 
न्यूज चॅनल टीव्ही रेन आणि न्यूज साइट मेडुझा एकत्र येऊन परदेशात गेले. मेडुझाने तर आधीच रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
 
नोवाया गॅझेटा वृत्तपत्र अजूनही मॉस्कोमध्येच आहे. पण त्यांनी वृत्तपत्र प्रकाशित करणं थांबवलं आहे. मॉस्कोचे टॉक रेडिओ स्टेशन इको सारखी अनेक स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार अलेक्झांडर नेव्हझोरोव्ह सारख्या असंख्य पत्रकारांना परदेशाची वाट धरावी लागली. रशियामध्ये त्यांना परदेशी एजंट अशी विशेषणे लावली गेली. शिवाय रशियन सैन्याविरूद्ध अफवा पसरवल्याबद्दल आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
 
मार्च 2023 मध्ये दिमित्री इव्हानोव्ह नावाचा एक गणिताचा विद्यार्थी अँटी-वॉर टेलीग्राम चॅनेल चालवत होता. त्याला देखील साडेआठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. कारण काय? तर लष्कराविषयी अफवा पसरवल्याबद्दल त्याला ही शिक्षा झाली.
 
दरम्यान, सिंगल पॅरेंट असलेले अ‍ॅलेक्सी मोस्कालेव्ह यांना सोशल मीडियावर मत व्यक्त केल्याबद्दल दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
 
आपल्या एकाधिकारशाहीला आव्हान मिळू नये यासाठी पुतिन यांनी आपले विरोधक संपविण्यासाठी जवळपास दोन दशकांहून अधिक काळ घेतला.
 
आणि जर हीच त्यांची योजना होती, तर आता ती प्रत्यक्षात आली आहे.

Published By- Priya Dixit