शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. महाराष्ट्र दिन
Written By अभिनय कुलकर्णी|

सुवर्ण महोत्सवी 'सेलिब्रेशन'मध्ये गुजरात पुढे!

ND
ND
महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या विभाजनाचा आणि पर्यायाने स्वतंत्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव येत्या एक मे रोजी धुमधडाक्यात साजरा होत आहे. पण त्याचा उत्साह शेजारच्या गुजरातमध्ये जास्त असल्याचे दिसते आहे. केवळ गुजरातमधीलच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या तमाम गुजराती मंडळींनी हा दिवस दणक्यात साजरा करण्याचे ठरवलेले दिसते. या सुवर्ण महोत्सवाचे 'ऑनलाईन सेलिब्रेशन'ही करण्यात येत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र अगदीच 'दीन' असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रसिद्धीत आघाडीवर असणार्‍या नरेंद्र मोदींच्या गुजरात सरकारने यंदाचा 'गुजरात दिन' आपल्या सरकारच्या 'विधायक' प्रसिद्धीसाठी पुरेपूर वापरण्याचे ठरवले आहे. मध्यंतरी इंदूरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी गुजरात सरकारच्या कामाची माहिती देणारी सीडी, पुस्तके मोफत वाटली होती. शिवाय 'स्वर्णिम गुजरात' लिहिलेल्या हजारो पिशव्या भाजपच्या कार्यकर्त्यांत, पत्रकारांत वाटण्यात आल्या होत्या. मोदींचा संदेश अशा तर्‍हेने तेव्हाच देशभर पोहोचला होता.

त्याही पुढे जाऊन गुजरातचे प्रमुख मंत्री प्रत्येक राज्यांत जाऊन तेथील गुजराती समुदायाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातमध्ये येण्याचे आवाहन करत होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन राज्यात गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज सधनही आहे. त्यामुळे वजनदार मंत्र्यांनी तेथे जाऊन गुजराती मंडळींना सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

एक मे रोजी गुजरातमध्ये जोरदार कार्यक्रम तर होणार आहेत, पण आपल्या या उपक्रमाची दखल आंतरजालावरही घ्यावी यासाठी मोदींच्या सरकारने www.swarnimgujarat.org नावाची वेबसाईटच सुरू केली आहे. इंग्रजी आणि गुजराती या दोन भाषांत असलेल्या या वेबसाईटवर गुजरात स्थापनेचा इतिहास दिला आहे. शिवाय 'गुजरातपेडीया' हा विकिपेडीयाच्या धर्तीवर मुक्त माहिती स्त्रोत तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात गुजरात केंद्रीत विविध विषयांवर, गावांवर लेख लिहून घेतले जात आहेत. वाचकांनी स्वतंत्रपणे या वेबसाईटला मजकूर पाठविण्याची सोयही आहे.

सुवर्ण महोत्सवानिमित्त होणार्‍या उपक्रमांची माहिती, त्या शिवाय गुजरातच्या अभिमानाचे प्रतीक म्हणून झालेल्या कार्यक्रमांचे फोटो, व्हिडीओ हे देखिल या साईटवर उपलब्ध आहेत. गुजरातचा अभिमान जागृत रहावा यासाठी अतिशय सुंदर असे वॉलपेपर तयार करण्यात आले आहेत. ते डाऊनलोड करण्याची सोयही उपलब्ध आहे.

प्रतिज्ञाबद्ध 'गुजरात'
महत्त्वाची बाब म्हणजे सुवर्ण महोत्सवानिमित्त गुजराती मंडळींनी काही उपक्रम हाती घ्यावा यासाठी आवाहन करण्यात आले असून तो उपक्रम नोंदविण्यासाठी प्रतिज्ञा असा वेगळा विभाग आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अनेकविध प्रतिज्ञा नोंदवल्या आहेत. कुणी झोपडपट्टीत जाऊन काम करेन, कुणी माझ्या मुलांत वाचनाची आवड रूजवेन, कुणी इको फ्रेंडली उत्पादने वापरने, कुणी पाणी व वीज जपून वापरेन असे शेकडो उपक्रम केले आहेत.

अमेरिकेतील गुजराती समाजानेही गुजरात दिन साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला असून खास त्यासाठी gujaratday.dcsamaj.com ही वेबसाईट सुरू केली आहे. वॉशिंग्टन, बाल्टिमोर येथील गुजरात समाज संस्था आणि सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक संस्था या एकत्र आल्या आहेत. या संस्थेतर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत. या वेबसाईटवरही गुजरातबद्दल बरीच माहिती आहे.

महाराष्ट्र मात्र 'दीन'
हे सगळं पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र दिनाच्या प्रसिद्धीसाठी कुठलाच पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत नाही. बृहन्महाराष्ट्रातील मराठी समाजाला आवाहन सोडाच, पण आपल्याच राज्यात केल्या जाणार्‍या कार्यक्रमांची दणक्यात प्रसिद्धीही करणे जमलेले नाही. नवी वेबसाईट तर नाहीच, पण सरकारची प्रसिद्धी करण्यात रमलेल्या mahanews.gov.in या सरकारी वेबसाईटवरही महाराष्ट्र दिनाचे नामोनिशाण नाही. मंत्र्यांचे चेहरे आणि त्यांनी काढलेले आदेश नि फतवे या व्यतिरिक्त त्यावर काहीही माहिती नाही. किमान एक मे निमित्त विशेष लेखमालिका, आठवणींना उजाळा वा पन्नाशीतला, आधीचा, नंतरचा महाराष्ट्र अशी कोणतीही माहिती दिसत नाही. सरकारी घोषणांचा जागर करण्यापलीकडे या साईटवर माहिती नाही. दोन राज्यातील प्रशासनातील फरक केवळ या बाबीतूनही स्पष्ट व्हावा.