गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (15:32 IST)

राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे नाही

राज्यात शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपाचा प्रश्न अजूनतरी  सुटत नाही, त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत दररोज भाजपावर टीका करत आहेत. यामुळे महायुतीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील दरी वाढली आहे. यातच अर्थमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला आहे, तरीही राऊत यांनी केलेल्या काही आरोपांना मुनगंटीवार यांनी उत्तरं दिली आहेत  मात्र एका क्षणी राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असं मुनगंटीवार पत्रकारांना म्हणाले आहेत.  
 
इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाकडून केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला, त्यावर बोलतांना कुणीही अशा पद्धतीनं आमदारांचा अवमान करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. लाखो मतदारांच्या आशीर्वादानं जो निवडून येतो, त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्द काढणं योग्य नाही, शिवसेनेचे आमदार कधीही फुटणार नाहीत. कारण त्यांची पक्षावर निष्ठा आहे, असंदेखील त्यांनी सांगितले आहे.  
 
राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत नेहमीप्रमाणे भाजपावर जबर टीका केली होती. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्यासाठी शिवसेना कारणीभूत नसेल. कारण सर्वात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेची जबाबदारी भाजपाची आहे. राज्यात निर्माण झालेल्या तिढ्याला आम्ही जबाबदार नाही, असं राऊत म्हणाले. त्याबद्दल मुनगंटीवारांना विचारलं असता, राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांनी प्रश्नपत्रिका काढायची आणि आम्ही उत्तरं लिहित बसायची, असं होणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.