शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By वेबदुनिया|

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बापूंजीच्या जीवनाचा आरसा असलेला महाराष्‍ट्रातील वर्धा येथील 'सेवाग्राम आश्रम'ही तितकाच महत्त्वाचा आहे. या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणचे गांधीजींनी त्याच्या वृद्धापकाळातील सर्वाधिक काळ म्हणजेच 12 वर्षे सेवाग्राम आश्रमात घालविला आहे. विदर्भातील वर्धा या शहरापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर असलेल्या सेवाग्राम या गावी 300 एकर जमितीत आश्रम वसला आहे. बापुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आश्रमात किती आत्मिक समाधान लाभत असते. ते शब्दात मांडणे कठीण आहे. 

सेवाग्राम आश्रमात गांधीजीनी अनेक देशवासियांच्या जीवनाला योग्य दिशा देण्‍याचे महान कार्य केले आहे. आश्रमातील शांत व सुंदर परिसर पाहिल्यानंतर बापुजींच्या स्वाभाव तसेच व्यक्तिमत्त्वाविषयी कल्पना आल्याशिवाय राहत नाही.

महात्मा गांधी यांना समजुन घ्यायचे असेल तर त्यांनी सेवाग्राम आश्रमात येणे आवश्यक आहे. आश्रमात आजही गांधीजींचा चरखा सुरूच असून त्यावर सूत कताई केली जाते. पारंपरिकता येथे अजून ही जिवंत आहे. येथील बापूजींचे स्मृती चि‍न्हेपाहून ते आपल्यातच असल्याचा भास होत असतो.
 
साबरमती टू सेवाग्राम-
1930 मध्ये 'मीठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या 78 साथीदारासोबत बापुजींनी 'दांडी यात्रा' काढली होती. स्वराज्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांनी संकल्पच केला होता. गुजरातमधील अरबी समुद्र किनार्‍यावर ब्रिटिश सरकार विरुध्द गांधीजी यांनी मीठाचा सत्याग्रह केला. त्यानंतर त्यांना अटक होऊन येरवडा तुरूंगात ठेवण्यात आले.

1933 मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजी यांनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत 'स्वराज्य' न मिळाल्याने ते साबरमती आश्रमात परतले नाही. यात्रेदरम्यान मध्य भारतातील एक गाव निवडून त्या गावी मुख्यालय करण्याचा निश्चय केला. 1934 मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी अर्थात 1936 मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला.

आज प्रसिध्द असलेले 'सेवाग्राम'चे नाव पूर्वी 'सेगाव' असे होते. मात्र याच भागात नागपूर-भुसावळ रेल्वे लाइन दरम्यान शेगाव मोठे रेल्वे स्थानक असल्याने गांधीजींच्या पत्रव्यवहारात मोठी अडचण निर्माण होत होती. त्यानंतर गांधीजींनी 1940 मध्ये आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करून 'सेगाव'चे 'सेवाग्राम' असे नामकरण करून टाकले.

सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आजही आपल्याला पहावयास मिळतात. त्यात स्वत: गांधीजी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. आजही या झोपड्या येथे आहेत. त्यात बापुजींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते.

भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा-
सुरूवातीला आदीनिवासात बापूजींसह सर्व सहकारी रहात होते. आश्रमात तेव्हा ही एकमेव कुटी होती. बा-बापू यांच्याशिवाय प्यारेलालजी, संत तुकडोजी महाराज, खान अब्दुल गफ्फार खाँ तसेच अतिथी रहात होते. 1942 मध्ये 'भारत छोडो आंदोलनाची' पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती. एवढेच नाही तर 1940 मध्ये व्यक्तिगत सत्याग्रहाची प्राथमिक तयारीही याच आश्रमात करण्‍यात आली होती.

गांधी चित्र प्रदर्शन:
सेवाग्राम आश्रमाच्या पश्चिमेला मुख्य रस्त्याच्या पलीकेडे महात्मा गांधी चित्र प्रदर्शन आहे. त्यात बापूजींचा संपूर्ण जीवनपट चित्राच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे.