शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2024 (16:45 IST)

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू, हे 154 प्रश्न विचारले जाणार

eknath shinde
आशय येडगे
मंगळवार (23 जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.
 
social media
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
 
महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला गेलाय.
 
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मुंबईकडे येत असताना मागासवर्ग आयोगाने तातडीने हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
 
मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 26 जानेवारीला मुंबईत येऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासोबतच जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली असताना. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सरकारी यंत्रणांनी वेगाने काम करायला सुरुवात केलीय असं दिसतंय.
 
सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले जातील?
तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?
 
लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का?
 
जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का?
 
हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.
 
मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे. त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
 
यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.
 
मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील.
 
मॉड्यूल 'सी' मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
तुमच्या घरात शौचालय आहे का?
 
तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे?
 
तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे?
 
मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का?
 
तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न असतील.
 
या प्रश्नावलीच्या मॉड्यूल 'डी'मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल.
 
तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?
 
विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?
 
तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं?
 
गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?
 
असे एकूण 33 प्रश्न असतील.
 
आणि मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल.
 
हे सर्वेक्षण कसं केलं जाईल?
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अशी माहिती दिलीय की, या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन देखील आयोगाकडून करण्यात आलं आहे.
 
राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्व्हेक्षण केलं जाणार आहे.
 
हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
 
राज्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाची संख्या पाहता हे सर्वेक्षण एवढ्या कमी कालावधीत पूर्ण करणं हे शासकीय यंत्रणेसमोरचं एक मोठं आव्हान असणार आहे.
 
यापूर्वी मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील त्रुटींकडे लक्ष वेधलं होतं.
 
याच त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्ध सैनिक वसाहती यामध्ये हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.
 
हे सर्वेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणकांची नेमणूक केली जाणार आहे. या कामासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधनसुद्धा दिलं जाणार आहे.
 
जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार आणि या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वर्ग 2 किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम मानधन म्हणून दिली जाईल. तर हे सर्वेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षण आणि प्रगणकांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिले जातील.
 
सर्वेक्षणाला सुरुवात ही चांगली बाब, पण आम्ही ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर ठाम - मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्ही मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला नकार दिलेला नाही. पण, यामार्गाने दिलेलं आरक्षण टिकेल का?
 
न्यायालयात त्याची सुनावणी होणार का आणि एनटी, व्हीजेएनटी सारखं हे आरक्षण टिकणार का? असा प्रश्न आहे. कारण इंदिरा साहनीच्या निकालानुसार आरक्षण जर पन्नास टक्क्यांच्या वर गेलं तर ते रद्द होतं त्यामुळे सरकारने हे आरक्षण टिकणार का? यावर स्पष्टीकरण दिलं जाणं गरजेचं आहे.
 
मराठ्यांनी हे सर्वेक्षण कधीच नाकारलेलं नाही पण जर मराठ्यांच्या 54 लाख कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या असतील तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे स्पष्ट होतं.
 
त्यामुळे आमची मागणी आहे की या 54 लाख मराठ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ओबीसी प्रमाणपत्र वितरित करा. यासोबतच 'सगेसोयरे' या शब्दाच्या व्याख्येबाबत अध्यादेश काढा.
 
महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पेटिशनसाठीच हे सर्वेक्षण सुरु करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याचं स्वागतच केलं आहे.
 
पण यामार्गाने मिळालेलं आरक्षण टिकेल की नाही हे सांगता येत नाही. कारण, गायकवाड आयोगातल्या अटीशर्थी तपासून मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे.
 
त्यामुळे हे आरक्षण टिकेल हे सरकारने सांगणं खूप गरजेचं आहे. मात्र सध्या तरी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत."
 
मराठा आरक्षण सर्वेक्षण - 154 प्रश्न
मॉड्युल ए : मुलभूत माहिती
 
1. नाव:
 
2. पत्ता:
 
3. गाव/शहर:
 
4. तालुका:
 
5. जिल्हा:
 
6. गाव दुर्गम भागात आहे का? :
 
7. आधार कार्ड आहे का?
 
8. आधार कार्ड असल्यास त्याचा आधार क्रमांक (ऐच्छिक),
 
9. मोबाइल क्र / लैंडलाइन क्र.:
 
10. वर्गवारी (कॅटेगरी):
 
11. आपण कोणत्या प्रवर्गातील आहात ?
 
12. तुम्ही मराठा आहात का ?
 
13. मराठा नसल्यास जात.
 
14. पोटजात
 
मॉड्यूल बी : कुटुंबाचे प्रश्न
 
15. निवासाचा प्रकार
 
16. सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहात ?:
 
17. तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसा आहे.?
 
18. तुमचे गाव दुसऱ्या गावाशी / शहराशी बारमाही रस्त्याने जोडलेले आहे काय? अथवा
 
पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो काय?
 
19. तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पुल आहे का ?
 
20. कुटूंबाचा प्रकार
 
21. पूर्वजांचे /मूळ निवासस्थानः
 
22. महाराष्ट्रात निवासाचा कालावधी:
 
23. तुमच्या जातीचा पारंपारिक व्यावसाय कोणता ?-
 
24. कुंटुंबाचा सध्याचा व्यावसाय कोणता ?--
 
25. व्यावसाय बदलला असल्यास, बदलाची कारणे काय ?
 
26. सरकारी सेवेतील प्रतिनिधित्वः तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य (पुरुष किंवा स्त्री) सध्या
 
27. जर हो, तर कृपया सेवेचा प्रकार नमूद करा (अचूक हुदा नमूद करा):
 
28. सेवा वर्ग: वर्ग १:
 
29. तुमच्या कुटुंबात कोणताही सदस्य व्यावसायिक आहे का (जसे की डॉक्टर, इंजिनीअर, वकील, इ.)?
 
30. जर हो, तर कृपया व्यवसायाचे नाव नमूद कराः
 
31. ज रहो, तर कोणत्या संस्थेत
 
32. जर हो, तर कोणत्या पदावर
 
33. "तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहे का ?"
 
34. जर हो, तर कोणत्या पदावर कार्यरत आहे ? ते सांगा:
 
मॉड्यूल सी: आर्थिक स्थिती
 
35. उत्पन्नस्रोत: तुमच्या घराचे मुख्य उत्पनाचे स्रोत कोणते आहेत? (लागू असलेले सर्व पर्याय निवडा)
 
36. तुमच्या घराचे अंदाजे क्षेत्रफळ किती आहे?
 
37. तुमच्या घरात किती खोल्या/ रूम्स आहेत ?
 
38. तुमच्या घरातील मुख्य पेय जल स्रोत कोणता आहे
 
40. तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम प्रामुख्याने कोणते कुटुंब सदस्य करतात ?
 
41. स्वच्छता सुविधाः तुमच्या घरामध्ये शौचालयाची सुविधा आहे का?
 
42. तुमच्या घरातील सदस्य शौचास कुठे जातात ?
 
43. तुमच्या घरात स्नानगृह आहे का?
 
44. जर हो (43 मध्ये), तुमच्या घरात कोणत्या प्रकाचे स्नानगृह आहे ?
 
45. जर नाही (43 मध्ये), घरातील सदस्य अंघोळी साठी कोठे जातात?
 
46. तुमच्या घरात स्वतंत्र स्वयंपाकाची खोली आहे का?
 
47. तुम्ही घरी स्वयंपाक कशावर करतात
 
48. कृषी (शेत) जमीन मालकी: तुमच्या मालकीची कृषी (शेत) जमीन आहे का?
 
49. शेतजमीन कुटुंबातील कोणाच्या नावावर आहे ?
 
50. जर हो, तर जमिनीचे क्षेत्रफळ किती?
 
51. जर नाही (48 मध्ये) असल्यास दुसऱ्याची शेत जमीन बटाईने करायला घेतली आहे का ?
 
52. शेती करिता लागणारे पाणी कोठून घेता ?
 
53. अ) शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध होते?
 
54. शेत मशागती करिता तुमच्या मालकीची कोणती आणि किती साधने आहेत ?
 
55. तुमचा शेती पूरक काही व्यवसाय आहे का?
 
56. जर हो, तर कोणता -
 
57. सध्या तुम्ही कोणत्या मुख्य पिकाची लागवड करत आहात?
 
कर्ज आणि आर्थिक बांधिलकी :
 
58. गेल्या १५ वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले होते किंवा आहे का?
 
59. जर हो तर तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती.
 
60. ते सर्व कर्ज फिटले आहे का?
 
61. तुमच्या वर सध्या कोणतेही कर्ज आहे का?
 
62. जर हो, (61 मध्ये) तर सध्याच्या कर्जाचे कारण काय आहे? (लागू असलेले सर्व निवडा)
 
63. तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले आहे? (लागू असलेले सर्व निवडा)
 
64. कर्ज घेताना काही तारण/ गहाण ठेवावे लागले आहे का ?
 
65. जर हो असल्यास, काय तारण/ गहाण ठेवावे लागले?
 
66. कर्जाचा हफ्ता किंवा कर्ज फेडता आले नसल्यामुळे बँकेने / कर्ज देणाऱ्याणे तुमची कोणतीही मालमत्ता ताब्यात घेतली आहे का?
 
67. मालमत्ता ताब्यात घेतली असल्यास कोणती ?
 
68. आपल्याला कधी बँकेचे कर्ज मिळू शकले नसल्यास कारण-
 
69. गेल्या १५ वर्षामध्ये तुम्ही कोणती स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का?
 
70. हो असल्यास कोणती
 
71. गेल्या १५ वर्षांमध्ये आपण आपली कोणती स्थावर मालमत्ता विकली आहे का?
 
72. हो असल्यास विकलेल्या मालमत्तेचे स्वरुप
 
73. कोणत्या कारणासाठी-
 
74. सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न (सर्व ज्ञात स्रोतांकडून): तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे?
 
75. तुम्हाला आयकर भरावा लागतो काय ?
 
76. तुम्ही क्रिमीलेअर कॅटेगरी मध्ये येता का?
 
77. तुम्ही कोणती ही बचत (सेविंग) किंवा गुंतवणूक करता का ??
 
78. जर हो (77 मध्ये), तर कोणत्या प्रकारची बचत किंवा गुंतवणूक तुमच्याकडे आहे? (लागू असलेले सर्व निवडा)
 
79. विमा संरक्षण: तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना विमा संरक्षण आहे का?
 
80. जर हो, तर कोणत्या प्रकारचा विमा ? (लागू असलेले सर्व निवडा)
 
81. तुमचे कुटुंब दारिद्र्य रेषे खाली आहे का
 
82. जर तुम्ही दारिद्र्य रेषे खाली असाल तर तुम्हाला दारिद्र्य रेषे खाली असल्याचा दाखला मिळाला आहे का?
 
83. तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे का?
 
84. तुमची शेतजमीन धरण, महामार्ग, उद्योग, पुनर्वसन प्रकल्प किंवा अन्य सरकारी प्रकल्पा मध्ये गेली आहे का ?
 
85. जर हो (84 मध्ये), असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला आहे का?
 
86. तुमचे घर धरण, महामार्ग, किंवा सरकारी प्रकल्पा मध्ये गेली आहे का?
 
87. जर हो (86 मध्ये), असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला आहे का?
 
88. तुमच्या घरात कोणी शेत मजुरी करते का?
 
89. जर हो (88 मध्ये), करत असल्यास शेतमजूरी करणाऱ्या सदस्यांची संख्या सांगा
 
90. तुमच्या घरात कोणी इतर मजुरी करतात का?
 
91. जर हो (90 मध्ये), असल्यास इतर मजूरी करणाऱ्या सदस्यांची संख्या सांगा
 
92. स्त्रियांना मिळणारी मजुरी कशी असते ?
 
93. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार हमी योजनेवर सध्या कार्यरत आहेत का ?
 
94. जर हो (93 मध्ये), असल्यास किती सदस्यांकडे रोजगार हमीचे जॉबकार्ड आहे ?
 
95. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य डबेवाल्याचे काम करतो का?
 
इ. जर हो (88 मध्ये), असल्यास किती सदस्य डबेवाल्याचे काम करतात ?
 
96. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य माथाडी कामगार आहेत का?
 
97. जर हो (96 मध्ये), असल्यास किती सदस्य माथाडी कामगार आहेत
 
98. तुमच्या कुटुंबात कोणी ऊसतोड कामगार आहे का?
 
99. जर हो (98 मध्ये), असल्यास किती सदस्य ऊसतोड कामगार आहेत?
 
100. तुमच्या कुटुंबात कोणी वीटभट्टी कामगार आहे का?
 
101. जर हो (100 मध्ये), असल्यास किती सदस्य वीटभट्टी कामगार आहेत?
 
102. तुमच्या कुटुंबातील महिला इतरांच्या घरी धुनी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जातात का?
 
103. तुमच्या कुटुंबातील पुरुष सदस्य रखवालीचे/ चौकीदाराचे काम करतात का?
 
104. तुमच्या कुटुंबातील पुरुष इतरांची गुरे ढोरे चरायला नेण्याचे काम करतात का?
 
105. तुमच्या कुटुंबातील जिया इतरांची गुरे ढोरे भरायला नेण्याचे काम करतात का?
 
106. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रिक्षा/आंटी / टक्ती चालक आहे का ?
 
108. झाले असल्यासं खालील पैकी कोणत्या कारणांमुळे तुम्ही स्थलांतरण केले आहे ? (लागू असलेले सर्व पर्याय निवडा)
 
109. मालमत्ता स्वामित्वः
 
घरात खालील पैकी कोणत्या वस्तू आहेत?
 
110. पशुधन मालकी आणि तपशीलः तुमच्याकडे कोणतेही पशुधन आहे का?
 
111. पशुधनाचे प्रकार आणि संख्या: तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे व किती पशुधन आहे? (प्रत्येक प्रकाराची संख्या स्पष्ट करा)
 
मॉड्यूल डी: कुटुंबाची सामाजिक माहितीः
 
112. सरकारी योजनांचा लाभ : तुम्हाला कोणत्याही सरकारी कल्याण योजनांचा लाभ झाला आहे?
 
113. जर हो, तर कृपया लाभ मिळालेल्या प्रमुख तीन योजनांची नावे सांगाः
 
114. तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पध्दत आहे का ?
 
115. तुमच्या समाजात विधवा स्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का?
 
116. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का ?
 
117. तुमच्या समाजात विधवा स्त्रीया औक्षण करू शकतात का?
 
118. तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का ?
 
119.तुमच्या समाजात विधवांचे सहसा पुनर्विवाह होतात का ?
 
120 तुमच्या समाजात विधवा श्रियाना धार्मिक कार्य/ पूजा पात करू दिले जातात का?
 
121. तुमच्या समाजात विधवा खियांना हळदी-कुंकू सारख्या कार्यक्रमात आमंत्रित करतात का ?
 
122 तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात / शुभ कार्यात बोलावले जाते का?
 
123. तुमच्या समाजात विवाहित स्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का?
 
124. तुमच्या समाजात घरातील निर्णय प्रामुख्याने कोण घेतात ?
 
125 तुमच्या समाजात सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबरीने स्रिया सहभागी होऊ शकतात काय ?
 
126 तुमच्या समाजात महिलांना पडदा / बुरखा पध्दत आहे का ?
 
127. तुमच्या समाजात संपत्तीत / मालमत्तेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान वाटा मिळतो का?
 
128. तुमच्या समाजात स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क आहेत का ?
 
129. तुमच्या समाजात मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते?
 
130. तुमच्या समाजात मुलांचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते ?
 
131. मुलांचे लग्न उशीरा होत असल्यास कारणे.
 
132. तुमच्या समाजात कोणत्या मुला सोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेतात ?
 
133. तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरजातीय विवाह झाला आहे का?
 
134. तुमच्या कुटूंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?
 
135. तुमच्या समाजात, पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे काय ?
 
136. तुमच्या समाजात जागरण गोंधळ वा अन्य धार्मिक विधीसाठी किंवा नवसासाठी कोंबडा/बकऱ्याच बळी देण्याची पद्धत आहे काय ?
 
137 कुटुंबातील आजारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास दृष्ट काढणे/ अंगारा लावणे/ गंडा बांधणे आदी प्रकार करता काय ?
 
138. गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबात कोणी आत्महत्या केली आहे का?
 
139. जर हो (138 मध्ये), असल्यास कोणत्या सदस्याने केली होती
 
140 जर हो (138 मध्ये), असल्यास आत्महत्येचे कारण काय होते?
 
141. तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत का?
 
142 . तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने आर्थिक विकासाच्या समानसंधी उपलब्ध आहेत असे वाटते का ?
 
143. तुमची जात/पोटजात दुय्यम वा कनिष्ट समजली जाते का ?
 
मॉड्यूल ई: कुटुंबाचे आरोग्य
 
144 अ) तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेत नसल्यास कारण-
 
145. कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी / उपचारासाठी कुठे जातात -
 
146. माता आरोग्य (बाळंतपणाचे स्थान): कुटुंबातील सर्वात अलीकडील बाळंतपण कुठे झाले?
 
147. तुमच्या कुटुंबातील सदस्याला कुत्रा/माकड चावल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता?
 
148. तुमच्या कुटुंबातील सदस्याला साप किंवा विंचू चावल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता?
 
149.तुमच्या कुटुंबातील सदस्याला कावीळ झाल्यास कुणाकडे उपचाराला घेऊन जाता?
 
150. बालमृत्यु आणि कुपोषणः कुटुंबातील कोणत्याही बालकाचा कुपोषण किंवा संबंधित आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाला आहे का (गेल्या पाच वर्षात)?
 
151. माता मृत्युः कुटुंबातील कोणत्याही गर्भवती श्रीचा गर्भधारणा, बाळंतपण, किंवा बाळंतपणा नंतर लगेचच मृत्यू झाला आहे का (गेल्या पाच वर्षात)?
 
152. गरज पडल्यावर तुम्हाला आरोग्य सेवा सुविधां उपलब्ध होतात का ?
 
153. कुटुंबातील सदस्य नियमितपणे प्रतिबंधक आरोग्य सेवा उपाय (उदा, लसीकरण, तपासणी) घेतात का?
 
154. मानसिक आरोग्य: "कुटूंबातील सदस्याचे मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याला मानसिक आरोग्य सेवा मिळतात का?"