मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (10:01 IST)

दत्त आरती - जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो

जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो । तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥धृ.॥
 
जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो । कर जोडुनियां  नमितों सहस्र वेळां, या अवतारा हो । जैसा दिनकर उदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो । तैशा आपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो । तं स्मरगामी स्वामी विटलों या मी तापत्रया हो ॥१॥
 
तूं महायोगी अर्धांगस्त्रीधारी हे मदनारी हो । तूं नट नरनारायण नारायणि नर तूंचि नारी हो । तूं रघुवीर, श्रीनरहरी, हिरण्यकश्यपुह्रदयविदारी हो । ब्रह्मचारी तूं ब्रह्मचि, राधाकृष्ण जय कुंजविहारी हो । तूं दाता, तूं त्राता, तूंचि विधाता, मुनि आत्रेया हो ॥२॥
 
तूं भक्तांकित जैसी जैसी भक्तीची भावना हो । तैसी तैसी करणी करणें पडे तुज जगजीवना हो । जिकडे पाडस अळवी तिकडे हरणी धांव घे वना हो । उदंड देसी परंतु प्रसाद पदरीं मज घेवेना हो । विश्वरूपासी पाहाया करि पार्थापरि सुपात्र या हो ॥३॥
 
प्रसन्नवदन सुशोभित कोमल घननीळ तनु साजिरी हो । जटा-मुकुट कुंडलें माळा पीतांबर भरजरी हो केशरी गंध सुचंदन पुष्पें तुलशीदल मंजरी हो । दंड कमंडलुमंडित कृष्णाजिन डमरू खंजिरी हो । आनंदघन स्वरूपाला देवा कधीं पाहतिल नेत्र या हो ॥४॥
 
सद्‌गुरु माउलि कृपेचि साउलि धरि तूं दयाळु गडे हो । ये आई म्हणतां येसी लगबग नेसुनिया लुगडें हो । जरि झांकिसि तूं एवढें मातें बाळ तुझें उघडें हो । विष्णुदास म्हणे तरि झडतिल कीर्तीचे चौघडे हा । उदंड कविच्या वदनीं सतत वाजतील वाजंत्र्या हो ॥५॥