1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (11:35 IST)

कोणावरही दडपण आणले नाही: मनमोहनसिंग

नवी दिल्ली- ओडिशातील तालाबिरा कोळसा खाणीचे हिंडाल्कोला वाटप करताना आपण कुणावरही दडपण आणले नाही आणि निर्णय घेताना अनावश्यक घाईदेखील केली नाही, अशी माहिती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सीबीआयला दिली.
 
प्रख्यात उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या मालकीची कंपनी असलेल्या हिंडाल्कोला ही कोळसा खाण देण्याचे वचन किंवा आश्वासनही आपण बिर्ला यांना दिले नव्हते, असेही मनमोहनसिंग यांनी सीबीआयला पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केले.
 
2005 मध्ये हिंडाल्कोला या खाणीचे वाटप करण्यात आले तेव्हा कोळसा मंत्रालयची सूत्रे मनमोहनसिंग यांच्याकडेच होती. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, कुमारमंगलम बिर्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पत्र आपण काळजीपूर्वक विचारासाठी कोळसा मंत्रालयाकडे पाठविले होते.
 
मंत्रालयाने मला याबाबत विचारणा केली असता, माझ्या स्वीय सचिवाने तयार केलेले टिपण वगळता अन्य कोणतेही पत्र पाठविण्याची सूचना मला माझ्या कार्यालयाकडून मिळाली नव्हती, असे मी स्पष्ट केले. एवढे मात्र खरे, की बिर्ला यांच्या कंपनीला तालाबिरा खाण देताना मी कुणावरही दडपण आणले नव्हते आणि खाणीचे वाटप करण्याचा निर्णय घेताना मी अनावश्यक घाईदेखील केली नव्हती. कोळसा मंत्रालयाने जेव्हा हिंडाल्कोला ही खाण देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी त्यावर केवळ अंतिम मोहर उमटवली होती.