आणि काशिनाथ घाणेकर पुस्तक विक्री जोरात, तर चित्रपटाला जोरदार प्रतिसाद
मराठी चित्रपट रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा डोक्यावर घेतले आहे. चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ज्या प्रेक्षकांनी डॉ. घाणेकर माहीत नव्हते, असे प्रेक्षकही उत्सुकतेने त्यांना जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांत जात असून, हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे, कांचन घाणेकर लिखित ‘नाथ हा माझा’ या पुस्तकाच्या विक्रीतही तुफान वाढ झाली आहे. पुस्तक प्रती जोरदार खपत आहेत. दादर येथील आयडियल, मॅजेस्टिक या दुकानांमध्येही या पुस्तकांच्या प्रती संपल्या आहेत. पुढील प्रतीं छापून येण्यासाठी अजून एक आठवडा जाणार आहे. पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुकगंगा या वेबसाईटवरही हे पुस्तक ‘आउट ऑफ स्टॉक’ झाले आहे. ”नाथ हा माझा या पुस्तकाने प्रकाशित झाल्यापासूनच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. घाणेकर यांच्यावरचा चित्रपटही उत्तम चालला आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या विक्रीत वाढ झाली आहे. पुढील आवृत्ती येण्यासाठी अजून एक आठवडा जाणार असला, तरी त्याही प्रती विकल्या जाणार आहेत”, असा ठाम विश्वास ‘आयडियल’चे मंदार नेरुरकर यांनी व्यक्त केला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले आहेत.