शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (14:02 IST)

'गर्ल्स' मधून अंकिताचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आता मुलींच्या अनोख्या विश्वाची सफर घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात विशाल देवरूखकरांनी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 'गर्ल्स' या चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्रींनपैकीच एक म्हणजे 'मती' अर्थातच अंकिता लांडे.
 
अभिनय क्षेत्रात काम मिळावे एक नावाजलेली अभिनेत्री व्हावे असे स्वप्न बऱ्याच मुली बघतात आणि मुंबई नावाच्या मायानगरीत येतात. त्या सगळ्यापैकीच एक म्हणजे अंकिता लांडे. काम मिळवत असताना अंकिताने अनेक ऑडिशन्स दिल्या. योगायोग म्हणजे त्या वेळेस अंकिताने 'बॉईज २' साठी ऑडिशन दिली आणि तिची निवड देखील झाली. परंतु नंतर काही गोष्टी आणि अभिनयातले अधिक बारकावे अंकिताला शिकण्याची आवश्यकता आहे असे दिग्दर्शकांना वाटले. त्यांनी अंकिताला 'बॉईज २' चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करण्यास सांगितले. 'बॉईज २' चित्रपटाच्या वेळी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंकिता या संपूर्ण टीमचा भाग होती. यावेळी तिने अभिनयासोबतच चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी आत्मसात केल्या. अभिनयाच्या वर्कशॉप मध्येही ती सहभागी झाली. जेव्हा दिग्दर्शक विशाल देवरूखकरांनी 'गर्ल्स' चित्रपटाच्या कलाकारांची निवड आणि ऑडिशन सुरु केले तेव्हा, अंकिताने 'मती'या  भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. अंकिताच्या या निवड प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतात, " 'बॉईज 2' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मी आणि माझ्या टीमने मुलीच्या भन्नाट जीवनावर चित्रपट करायचे ठरवले. यावेळी अंकिता आमच्या सोबतच होती. चित्रपटाची पटकथा पूर्ण झाल्यानंतर 'गर्ल्स' या सिनेमासाठी कलाकारांचा शोध सुरू झाला. नवीन कलाकारांना संधी द्यायची या विचाराने नवीन मुलींसाठी आम्ही ऑडिशन्स सुरू केल्या. अनेक ऑडिशन्स झाल्या मात्र मला आणि माझ्या टीमला मनासारखी 'मती' मिळत नव्हती. सर्वात शेवटी अंकिताने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची 'मती' मिळाली."
नुकतेच या सिनेमाचे टिझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. 'गर्ल्स' हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच सर्वांना या सिनेमात कोण मुख्य भूमिका साकारणार याबद्दल कुतूहल होते. मात्र आता या कुतूहलाचा शेवट झाला असून 'गर्ल्स' चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी पहिली मुलगी 'मती' अर्थातच अंकिता लांडे हिचे नाव आणि चेहरा उघडकीस आले आहे.
 
या भन्नाट चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.  एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि  कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शनच्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.