रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (15:53 IST)

आठवडाभर आधीच अर्थात 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार 'शिमगा'

शिमगा... कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे मनातलं, दारातलं, घरातील सर्व वाईट, अमंगळ, अभद्र जाळून टाकायचा सण. कोणीही कोणाबद्दल आकस धरू नये, वैर धरू नये, सर्व वाईट विचार या होळीच्या अग्नीत राख करून टाकावेत, अशी महती असणाऱ्या या शिमगोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहात असतो. एरव्ही देवाचं दर्शन घ्यायला आपण देवळात जातो, मात्र शिमग्याला देव देवळातून पालखीत विराजमान होतात आणि भक्तांच्या घरोघरी दर्शन देण्यासाठी जातात आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं. अशीच जोशपूर्ण कथा आपल्याला श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित 'शिमगा' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच झालेल्या पोस्टरवरून या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असतानाच आणि कोकणात शिमग्याचा उत्स्फूर्त माहौल असतानाच म्हणजेच १५ मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गणेशवाडी येथील कोकणचे सुपुत्र निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा दिग्दर्शित व लिखित या चित्रपटात राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरवरून तरी या चित्रपटात प्रेक्षकांना 'शिमग्या'चं वेगळं रूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे.