सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (16:32 IST)

सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’मधील अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या सोनाली कुलकर्णी व स्पृहा जोशी यांच्या वेगळ्या लुकला आणि ‘मास्क मॅन’च्या झलकला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘विक्की वेलिंगकर’चा नवीन टीझर निर्मात्यांकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरनेही समाजमाध्यमांवर हलचल निर्माण केली असून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
 
‘विक्की वेलिंगकर’च्या या टीझरमधून ‘मास्क मॅन’चा अधिक रुद्र आणि घाबरवणारा ‘चेहरा’ समोर येतो. चित्रपटाची नायिका सोनाली कुलकर्णीच्या गर्भगळीत अवस्थेमुळे प्रेक्षकांमध्येही एक भीती निर्माण होते. “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटीत तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्रायझेस’, असे वाक्य सोनालीच्या तोंडी आहे. तसेच या चित्रपटामध्येही अनेक सरप्रायजेस दडलेली असतील असा कयास प्रेक्षक बांधून जातो. या टीझरची सध्या जोरदार चर्चा समाजमाध्यमांवर अर्थात सोशल मिडियावर सुरु झाली आहे.
 
“विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
 
‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, ‘या टीझरला समाज माध्यमांवर उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्याने प्रेक्षकांमध्ये एक जिज्ञासा निर्माण केली आहे. मराठीतील हा एक आगळा-वेगळा असा अनुभव असणार आहे. त्याचीच एक झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे.”
 
सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.