सचित पाटील साकारणार 'विठ्ठल'
महाराष्ट्राच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित असलेल्या 'विठ्ठल' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. मूर्तरुपी विठ्ठलाचे मनुष्यस्वरूप दाखवणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सचित पाटील विठ्ठलाची भूमिका करणार आहे. राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आला. सावळ्या विठ्ठलाचे मनोहारी रूप दाखवणाऱ्या या पोस्टरवर सचित पाटील दिसत असून, सचितचा हा विठ्ठल अवतार प्रेक्षकांना देखील भावतो आहे. आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा सिनेमा १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'विठ्ठल' नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाची दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. 'विठ्ठल' या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंतवते यांनी संवादलेखन केले आहे. तसेच, या सिनेमात हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणार असून, अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.