शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2023 (17:33 IST)

आशिया कप फायनल : मोहम्मद सिराजसमोर श्रीलंकेचा धुव्वा, 50 धावांत आटोपला डाव

mohammed siraj
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेनं अक्षरश: शरणागती पत्कारल्याचं चित्र दिसलं.श्रीलंकेच्या टीमने 15.2 ओव्हरमध्ये सर्वबाद केवळ 50 धावा केल्या.
 
भारतासमोर सामना जिंकण्यासाठी आणि परिणामी आशिया चषक आपल्या नावे करण्यासाठी केवळ 51 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे.
 
भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजनं एकट्यानं सहा विकेट घेऊन श्रीलंकेची दाणादण उडवली.
 
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरपासूनच श्रीलंकेचे फलंदज एकामागोमाग एक बाद होत परतू लागले. पहिल्या सहा-सात ओव्हरमध्येच निम्मा संघ माघारी परतला.
 
सिराजसमोर श्रीलंका हतबल
भारतीय गोलंदाजांच्या वतीने मोहम्मद सिराज शानदार गोलंदाजी करताना दिसतोय.
 
सिराजने अवघ्या 16 चेंडूत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना बाद केले. तर सामन्याच्या 12व्या ओव्हरमध्ये सहावी विकेट घेतली.
 
मोहम्मद सिराजने पाथुम निसांका, सदिरा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका आणि कुसल मेंडिस यांची विकेट घेतली.
 
श्रीलंकेचा डाव संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, "हे स्वप्नासारखे आहे. गेल्यावेळी श्रीलंकेविरुद्ध मी चार विकेट घेतल्या होत्या. पण पाचवी विकेट घेऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जे काही तुमच्या नशिबात असतं, तेच तुम्हाला मिळतं. आज ते माझ्या नशिबात होतं, म्हणून मला ते मिळालं."
 
सिराज पुढे म्हणाला, "आजच्या सामन्यांइतका स्विंग मला पूर्वीच्या सामन्यांमध्ये मिळाला नाही. मला फलंदाजांना खेळू द्यायचे होते. मला आऊटस्विंगर्ससह विकेट मिळाल्याचे खूप समाधान आहे. कारण सहसा अशा परिस्थितीत मला विकेट मिळत नाहीत."
 
मोहम्मद सिराजनं 6 विकेट्स, जसप्रीत बुमराहने एक, तर हार्दिक पांड्यानं 3 विकेट्स घेतल्या.
 
हा विजय भारतासाठी का महत्त्वाचा?
 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा नववा आशिया कप अंतिम सामना आहे. ही स्पर्धा जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. कारण तीनच आठवड्यात भारतात ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडेच असल्यांनी सर्वांचं त्याकडे लक्ष आहे.
 
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या किमयेची पुनरावृत्ती करण्याचा दबाव कर्णधार रोहित शर्मावर नक्कीच असेल.
 
यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारताची कामगिरी ही चढ-उतारांनी भरलेली आहे. पण आशिया कप स्पर्धेत विजय मिळवल्यास भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास द्विगुणित होऊ शकतो. तसंच संघाच्या चाहत्यांच्या अपेक्षाही यामुळे उंचावतील.
 
आशिया कपमध्ये भारताची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताची कामगिरी विशेष काही झाली नव्हती. यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला आणि सुपर फोर फेरीत प्रवेश केला.
 
सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. पण राखीव दिवस असल्यामुळे हा सामना पूर्ण झाला. यामध्ये भारताने मोठा विजय मिळवला. नंतर श्रीलंकेविरुद्धही रोमांचक विजय मिळवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
 
मात्र, सुपर फोर फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताचा मुकाबला बांगलादेशविरुद्ध झाला. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे पुन्हा एकदा भारतीय संघावर टीका करण्यात येत आहे.
 






Published By- Priya Dixit