बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (18:38 IST)

श्रीलंकेच्या खेळाडूंचा पराक्रम; देशात अराजक, कामगिरी दमदार

cricket
देशात वर्षभरापासून उद्भवलेलं आर्थिक संकट, इंधन-औषधं तसंच जीवनोपयोगी वस्तूंची टंचाई, राष्ट्राध्यक्ष तसंच पंतप्रधानाच्या निवासस्थानी आंदोलक प्रवेश करत असतानाच क्रिकेटच्या मैदानात श्रीलंकेच्या खेळाडूंनी अद्भुत कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला चीतपट करण्याचा पराक्रम केला.
 
दिनेश चंडिमलचं द्विशतक तसंच पदार्पणवीर प्रभात जयसूर्याच्या 12 विकेट्सच्या बळावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि 39 धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
 
पहिल्या टेस्टमध्ये पराभूत झालेल्या श्रीलंकेला या टेस्टआधी कोरोना केसेसमुळे धक्का बसला. धनंजय डिसिल्व्हा, असिथा फर्नांडो आणि जेफ्री व्हँडरसे या तिघांना कोरोना संसर्ग झाल्याने ते तिघेही या टेस्टमधून बाहेर पडले. टेस्टच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पाथुम निसांकाची प्रकृती बिघडली. निसांकालाही कोरोना झाल्यामुळे कोरोना बदली खेळाडू म्हणून ओशाडा फर्नांडोला समाविष्ट करण्यात आलं.
 
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मार्नस लबूशेन आणि स्टीव्हन स्मिथच्या शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 364 धावांची मजल मारली. पण या दोघांव्यतिरिक्त बाकी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेतर्फे पदार्पणवीर प्रभात जयसूर्याने 6 विकेट्स पटकावल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने दिनेश चंडिमलच्या संयमी द्विशतकाच्या बळावर 554 धावांचा डोंगर उभारला. चंडिमलने 16 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 206 धावांची खेळी केली. चंडिमलचं हे पहिलंच द्विशतक आहे. कर्णधार दिमुथ करुणारत्ने 86 तर कुशल मेंडिसने 85 धावांची खेळी केली. कामिंदू मेंडिसने 61 धावा करत चंडिमलला चांगली साथ दिली. श्रीलंकेकडे 190 धावांची आघाडी होती.
 
टेस्ट मॅच वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दीड दिवसांहून अधिक काळ खेळणं आवश्यक होतं. मात्र फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या आक्रमक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने शरणागती पत्करली. त्यांचा दुसरा डाव 151 धावांतच आटोपला. मार्नस लबूशेनने सर्वाधिक 32 धावा केल्या. श्रीलंकेतर्फे प्रभातने पुन्हा एकदा 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.
 
या टेस्टदरम्यान श्रीलंकेतली परिस्थिती चिघळली. राष्ट्राध्यक्ष गोटाभये राजपक्षे हे देश सोडून जात असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. आंदोलकांनी पंतप्रधान रनिल विक्रमासिंघे यांच्या खाजगी घरात प्रवेश केला. आंदोलकांनी या घराचा ताबा घेतला. आंदोलक या घरातील स्विमिंग पूलमध्ये पोहत असल्याचं, गार्डनमध्ये पिकनिक करत असल्याचे व्हीडिओ प्रसिद्ध झाले आहेत.
 
देशात अभूतपूर्व परिस्थिती असल्याने ही टेस्ट सुरू राहणार का? याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मॅच सुरू असताना रविवारी आंदोलकांचा जत्था मैदानात आला होता. मात्र त्यांनी खेळात बाधा आणली नाही.
 
योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या बरोबरीने अंपायर मायकेल गॉफ (इंग्लंड) आणि नितीन मेमन (भारत) तसंच मॅचरेफरी जवागल श्रीनाथ या मॅचमध्ये कार्यरत होते.
 
ऑस्ट्रेलियाचा संघ गेले महिनाभर श्रीलंकेतच आहे. श्रीलंकेतील परिस्थिती चिघळल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ दौऱ्यावर येणार का? याविषयी साशंकता होती मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंनी दौरा करण्याचा निर्णय घेतला.
 
ऑस्ट्रलियाच्या संघाला वनडे सीरिजदरम्यान श्रीलंकेच्या चाहत्यांनी भरभरून पाठिंबा दिला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी याचा विशेष उल्लेख केला होता.
 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने श्रीलंकेतल्या परिस्थितीसंदर्भात एक पोस्ट टाकली होती. पॅट कमिन्सने एक फोटो शेअर करताना लिहिलं की, "काही दिवसांपूर्वी रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. शहरातला वीजपुरवठा पूर्ववत व्हावा याची वाट पाहत होतो. जेणेकरून आम्हाला जेवता येईल. श्रीलंका एक देश म्हणून अतिशय कठीण कालखंडातून जात आहे. पण चाहत्यांचं प्रेम विलक्षण असं आहे. त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही ऋणी आहोत".
 
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ट्वेन्टी20 सीरिज 2-1 अशी जिंकली. वनडे मालिकेत श्रीलंकेने जबरदस्त प्रदर्शन करत 3-2 अशी सीरिज जिंकली. पहिल्या टेस्टमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता.