1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2016 (11:46 IST)

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि कवितासागर प्रकाशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन

राष्ट्रीय स्तरावर विविध विक्रमांची नोंद ठेवणारी संस्था ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशन संस्था ‘कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथील प्रसिद्ध विचारवंत व माजी प्राचार्य बी. बी. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी - डॉ. कुमार रामगोंडा पाटील, समीक्षक - मंगेश विठ्ठल कोळी, लेखक - अशोक भिमराव रास्ते, कादंबरीकार - दिनकर विष्णू काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आरोग्य दिन गुरुवार दिनांक 07 एप्रिल 2016 रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
 
या प्रसंगी डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी द्वारा लिखित ‘लास्ट डेज ऑफ डायबेटीज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन व साहित्य आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योगदान देणा-या काही मान्यवरांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. युवा प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. 
 
जगभरात साज-या होणा-या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस (किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. आणि त्यांच्या घटनेची अंमलबजावणी 7 एप्रिलला झाल्यामुळे हा दिवस "जागतिक आरोग्य दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. त्या काळात टीबी, कॉलरा, मलेरिया यासारख्या रोगांनी थैमान घातलं होतं. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची सुरुवातीच्या टप्प्यातील कामं ही वेगाने पसरणा-या रोगांवर नियंत्रण मिळवण्यावर केंद्रित होती.  दर वर्षी एक संकल्पना घेऊन जागतिक आरोग्यदिनानिमित्त जगभर विविध उपक्रम आयोजित केले जातात. आरोग्य विषयक काम करणा-या संघटनांना प्रोत्साहन देण्याचं कामही जागतिक आरोग्य संघटनेतर्फे केलं जातं.   
 
जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. 7 एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९५ देश सहभागी झाले आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीत-जास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरील उपाय यावरच मर्यादित न राहता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगात सहा ठिकाणी या संघटनेची कार्यालये आहेत. दक्षिण अमेरिकेत - ब्राझिल, युरोपमध्ये - कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात - दिल्ली, अमेरिकेत - वॉशिंगटन, आशियात - इजिप्त आणि पश्चिमेला - फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे इत्यादी कामे संघटनेमार्फत केली जातात. 7 एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस असून तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो; प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमाध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण केली जाते.