सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शनिवार, 1 जुलै 2023 (10:45 IST)

कृषी दिन: शेण आणि पालापाचोळ्यातून मराठी मुलीने कमावले लाखो रुपये

Renuka Parbhani
- तुषार कुलकर्णी
'शेण आणि पालापाचोळ्यातून वर्षाला लाखो रुपये कमवले जाऊ शकतात,' असं कुणी तुम्हाला सांगितलं तर?
 
तर कदाचित तुमचं उत्तर असेल 'जा ना बाबा, का उगाच बोअर करतोय...' पण एक ट्राय म्हणून तुम्हाला मी अजून एकदा सांगतो. अगदी शेण आणि पालापाचोळ्यातून परभणी जिल्ह्यातल्या 21 वर्षीय रेणुकाने अक्षरशः लाखो रुपये कमावले आहेत.
 
तिचं हे सिक्रेट सांगण्यासाठी ती नेहमी तयार असते. उलट तिचं म्हणणं आहे की जितके जास्त लोक तिचं सिक्रेट वापरतील तितका जास्त तिचाच फायदा आहे. तिने काय केलं हे तुम्हाला जाणून घेऊ.
 
12 वी सायन्स झालेली रेणुका सीताराम देशमुख ही एक लघुउद्योजिका आहे. ती सेंद्रीय खत तयार करते त्याच जोडीला ती सेंद्रीय शेती करते. ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांनी करावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देखील ती देते.
 
त्यासाठी ती विविध कार्यशाळांचं आयोजन करते. "दहा वर्षांपूर्वी वडिलांना केवळ मदत म्हणून सुरू केलेल्या गोष्टीचं पुढे एका व्यवसायात रूपांतर होईल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता," असं रेणुका सांगते.
 
गेल्या काही दिवसांमध्ये आपण 'मंदीत संधी' हा शब्द अनेकदा ऐकला असेल पण हा शब्द रेणुका खरंच जगली आहे.
 
कोरोनाच्या काळातच म्हणजे गेल्या वर्षभरातच तिने अंदाजे तिच्या संपूर्ण व्यवसायाची आठ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं ती सांगते. यापैकी निम्मे पैसे निव्वळ नफा असल्याचं तिचं म्हणणं आहे. अर्थात एवढ्यावरच न थांबता अधिक गुंतवणूक करण्याचा तिचा मानस आहे.
 
सुरुवात कशी झाली?
2011 मध्ये परभणी कृषी विद्यापीठाने शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावातल्या काही शेतकऱ्यांना गांडूळ बीज दिलं आणि गांडूळ खत कसं तयार करायचं याचं प्रशिक्षण दिलं.
 
रेणुकाचे वडील सीताराम देशमुख यांनी हे प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी त्यांच्या शेतातच असलेल्या उंबराच्या झाडाखाला गांडूळ खतासाठी एक हौद तयार केला.
 
त्यावेळी रेणुका अवघ्या 11 वर्षांची होती. घरातलं पूर्ण वातावरणच शेतीचं असल्यामुळे तिने देखील वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. त्यातच तिला गांडूळ खताबद्दलची प्राथमिक माहिती मिळाली. तयार झालेल्या खताचा वापर त्यांनी आपल्या शेतातच केला.
 
सर्वांना वाटू लागलं की आता रासायनिक खतांच्या शेतीच्या तुलनेत पीक कमी येईल पण आमचं उत्पन्न पहिल्या वर्षांत तितकंच आलं. नंतर सातत्याने सेंद्रीय खताचा वापर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारला आणि उत्पन्न वाढल्याचं रेणुका सांगते.
 
खताला मागणी वाढली
या प्रवासाबद्दल रेणुका सांगते, "आमच्या शेतात हा प्रयोग यशस्वी केल्यानंतर अनेक जण आम्हाला येऊन विचारू लागले की तुम्ही हे कसं केलं. त्याचबरोबर ते खतासाठी विचारणाही करू लागले. सुरुवातीला अगदी लोक एक-एक किलो घेऊन जात असत. एका किलोला 8 रुपये मिळायचे."
 
"आमच्या भागातले शिक्षक लोक, नेते मंडळी देखील खत घेऊन जाऊ लागले त्यामुळे आमचा हुरूप वाढला आणि आपण काहीतरी योग्य करत आहोत अशी जाणीव मला झाली."
 
"मग मला 10 किलोच्या ऑर्डर मिळाल्या पुढे 25 किलोच्या ऑर्डर्स मिळाल्या. गांडूळ खताबरोबरच आम्ही गांडूळ बीजाची सुद्धा विक्री करतो. ज्या लोकांना आपल्या शेतातच स्वतःचं सेंद्रीय खत तयार करायचं आहे त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरतं. गेल्या वर्षं दोन वर्षांत आम्ही 3000 किलो गांडूळ बीज विक्री केली, त्याचा नफा देखील वेगळा आहे," असं रेणुका सांगते.
 
'उत्पादनाची जबाबदारी रेणुकाची'
कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याचं व्यवस्थापन योग्यरीत्या व्हायला हवं हे सूत्र आपल्याला माहीत आहे. रेणुका यांच्या सिद्धीविनायक फार्मची आखणी देखील एखाद्या उद्योगासारखीच असल्याचं रेणुका सांगते. अशा प्रकारच्या व्यवसायाच्या दोन बाजू असतात एक म्हणजे उत्पादन आणि दुसरी म्हणजे वितरण.
 
रेणुकाचे वडील सीताराम सांगतात की "उत्पादनाची पूर्ण जबाबदारी रेणुकाची असते आणि माझी जबाबदारी वितरणाची आहे. रेणुका तिची जबाबदारी चोखपणे बजावते त्यामुळे मी माझ्या वितरणाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो."
 
व्यावसायिक स्तरावर कशी झाली सुरुवात?
स्वतःच्या शेतापुरतं खत निर्मिती करताना व्यावसायिक स्तरावर खत निर्मितीला कशी सुरुवात झाली याबद्दल रेणुका सांगते, "सुरुवातीला फक्त उंबराच्या झाडाखालीच आम्ही गांडूळ खताची निर्मिती केली होती. पण जशी मागणी वाढली तशी ती जागा अपुरी पडायला लागली.
 
"2018 मध्ये माझं बारावी पूर्ण झालं. एक दोन वर्षं पूर्णपणे सेंद्रीय शेती करून कृषी विद्यापीठात पुढचं शिक्षण घेण्याचा माझा विचार होता. त्या दृष्टीने मी शेतीमध्ये प्रयोग करून पाहिले. गांडुळ खताच्या निर्मितीबरोबरच पालेभाज्या आणि फळभाज्यांचं उत्पादन मी घेतलं.
 
"2020 ला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा विचार करत होते तेव्हाच कोरोनाची साथ आली. मग मी पूर्णपणे गांडूळ खत निर्मितीच्याच मागे लागले. ज्यावेळी कोरोनाची परिस्थिती सुधारेल तेव्हा आपण अॅडमिशन घेऊ पण तोपर्यंत आपण नुसतं बसून राहायचं नाही असा मी विचार केला," रेणुका सांगते.
 
"मग 4,500 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटमध्ये मी गांडूळ खतासाठी बेड तयार केला. यासाठी अंदाजे तीन ट्रॉली शेण लागतं, शेतात असलेला पालापाचोळा, चिपाडं इत्यादी गोष्टी त्यात टाकल्या. गांडूळ बीज टाकलं आणि व्यावसायिक स्तरावरील गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प उभा राहिला," असं रेणुका सांगते.
 
व्यावसायिक स्तरावरील गांडूळ खत निर्मितीचं गणित
खताच्या निर्मिती व्यावसायिक स्तरावर कशी केली जाते याचं गणित रेणुकाचे वडील सीताराम देशमुख यांनी उलगडून सांगितलं. ते सांगतात, "360 टन शेणापासून आम्ही 120 टन गांडूळ खत तयार केलं. ट्रॅक्टरच्या एका ट्रॉलीत 3 टन शेण बसतं. म्हणजेच 120 ट्रॉली आम्ही शेण आणलं."
 
"इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुमचा खताचा बेड असेल तर त्यासाठी तुम्हाला 500 किलो गांडूळ बीज लागतं. 360 टन शेण विकत घेण्यासाठी अंदाजे 3.60 लाख रुपये लागतात आणि जेव्हा तीन महिन्यानंतर जेव्हा 120 खत तयार झालं त्याचे 9.60 लाख रुपये आले. मजुरी आणि इतर खर्च वगळला तर हातात चार ते साडे चार लाख रुपये उरतात," सीताराम देशमुख सांगतात.
 
जर चार ते पाच लाख रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी साडे तीन चार लाख रुपये गुंतवणुकीसाठी कुठून आणायचे हा प्रश्न आपल्याला पडू शकतो.
 
त्यावर सीताराम देशमुख सांगतात, "एक किलो गांडुळ बीज हे 400 रुपयांना असतं. एका वर्षांत एका गांडुळाचे 76 गांडुळ तयार होतात म्हणजेच वर्षभरात एका किलो गांडुळ बीजाचे 76 किलो गांडुळ बीज तयार होतं. वर्षभर त्यांचं संगोपन केलं त्यांना ऊन लागू दिलं नाही तर त्यांचं प्रजनन व्यवस्थितरीत्या होतं. त्यांची जी विष्ठा असते त्यातूनही पुन्हा खताचीच निर्मिती होते."
 
"अत्यंत कमी गुंतवणुकीतून देखील तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता आणि हळुहळू जशी मागणी असेल त्याप्रमाणे ऑर्डर घेऊन खताचा पुरवठा तुम्हाला करता येतो.
 
"खतासाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांश गोष्टी या शेतीतीलच असतात, शेण पालापाचोळा आणि चिपाडं या गोष्टी तर शेतात असतातच त्याचा वापर करून हा व्यवसाय केल्यास शेतीसाठी एक पुरक व्यवसाय तुम्हाला मिळू शकतो," असं देशमुख सांगतात.
 
रासयानिक खत आणि गांडुळ खत काय फरक आहे?
गांडुळ खत हे पर्यावरण पूरक आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि आयुष्य वाढतं हे आपल्याला तर माहीतच आहे पण व्यावसायिकदृष्ट्या देखील गांडूळ खत हे शेतीसाठी फायद्याचं ठरतं असं देशमुख सांगतात.
 
त्यासाठी ते सोयाबीनच्या शेतीचं उदाहरण देतात, "एक एकर सोयाबीन शेतीला अंदाजे 900 ते 1400 रुपयांचे रासयानिक खत लागतं. ब्रॅंडनुसार या किमती बदलतात. त्यात पुन्हा 300 रुपयांचा युरिया लागतो."
 
"फवारण्या आणि इतर पेस्टिसाईड्सचा खर्च येतो तो वेगळा. पण त्याचवेळी एक एकरसाठी 200 किलो गांडुळ खत लागतं. त्याची किंमत आहे 1600 रुपये. रासायनिक खताच्या तुलनेत गांडूळ खत थोडं स्वस्त पडतं पण जमिनीचं आयुष्य वाढल्यामुळे दीर्घकाळात जास्त फायदे होतात. उत्पन्न देखील सारखं असतं."
 
"सेंद्रीय खतातून तयार झालेल्या फळांना आणि भाज्यांना जास्त मागणी आहे. लोकांमध्ये जशी जागृती वाढत आहे त्याप्रमाणे लोकही सेंद्रीय शेतीतून तयार झालेल्या उत्पादनंच विकत घेताना दिसत आहेत," असं देशमुख यांना वाटतं.
 
दरम्यान, सेंद्रीय शेतीचे फायदे असले तरी ती सर्वांनाच परवडेल असं नाही असंही कृषी तज्ज्ञ सांगतात. सेंद्रीय शेती करायची म्हटलं तर त्यासाठी दोन-तीन वर्षांचा वेळ द्यावा लागतो. ते नुकसान सहन करून सर्वांनाच शेती परवडू शकते असं नाही. त्यामुळे योग्य विचार विनिमय आणि आपल्या जवळ असलेल्या संसाधनाचे नियोजन करूनच सेंद्रीय शेतीबाबत निर्णय घ्यावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.
 
यशस्वी उद्योजिका होण्याचं स्वप्न
रेणुका आता पूर्ण वेळ व्यवसाय करत असली तरी तिला विद्यापीठातून पदवी घ्यायची आहे. व्यवसायाचा फायदा शिक्षणात आणि शिक्षणाचा फायदा व्यवसायात होईल असा तिला दृढ विश्वास आहे.
 
ती सांगते, "माझ्या खताला आता इतकी मागणी आहे की तितका पुरवठा मी स्वतः करू शकत नाही म्हणून मी इतर महिलांना देखील हे शिकवत आहे. त्या देखील हा व्यवसाय स्वतंत्ररीत्या करून त्यांच्या पायावर उभ्या राहू शकतात."
 
भविष्याकडे तू कसं पाहतेस असं विचारल्यावर रेणुका सांगते, "मला एक यशस्वी उद्योजिका व्हायचं आहे. जसं बियाणांच्या क्षेत्रात माहिको आहे तसं मला माझं नाव सेंद्रीय खताच्या निर्मितीमध्ये करायचं आहे."