शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (21:35 IST)

सनातन धर्म म्हणजे काय? सनातन धर्म ही केवळ आर्यांची जीवनपद्धती आहे?

sanatan dharm
"काही गोष्टींचा नुसता विरोध करून जमणार नाही तर त्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, ताप यांसारख्या गोष्टींना केवळ विरोध करून जमत नाही, त्यांना नष्ट केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सनातन (धर्म) देखील नष्ट केला गेला पाहिजे," हे विधान आहे तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचं.
 
तमिळनाडूतल्या प्रगतिशील लेखक आणि कलाकार संघटनेने आयोजित केलेल्या सनातन निर्मूलन परिषदेत बोलतांना त्यांनी सनातन धर्माबाबत हे वक्तव्य केलं आणि देशभर एकच गदारोळ सुरु झाला.
 
शुक्रवारी (1 सप्टेंबर) चेन्नईतल्या कामराज मैदानात उदयनीधी स्टॅलिन यांनी, 'भारतीय मुक्ती संग्रामातील आरएसएसचे योगदान' या विषयावरील व्यंगचित्रांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात हे वक्तव्य केलं.
 
उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आहेत.
 
स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या या विधानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सडकून टीका केलीय.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यांनी 'एक्स'वर म्हटलंय की, "तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली.
 
असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.
 
हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे."
 
सनातन निर्मूलन परिषदेला दिलेल्या नावाचं कौतुक करतांना उदयनिधी स्टॅलिन असं म्हणाले की, "सनातनचा विरोध करण्यापेक्षा आपण त्याला आधी नष्टच केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही या परिषदेला अगदी योग्य नाव दिलं आहे. तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत."
 
1 सप्टेंबर रोजी उदयनिधी स्टॅलिन यांनी हे भाषण केलं आणि यामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालं.
 
भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीट करून उदयनिधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आणि 'सनातन धर्माचे पालन करणाऱ्या 80% भारतीयांचा नरसंहार करण्याचे आवाहन उदयनिधी यांनी केलं आहे', अशी टीका केली.
 
या टीकेला प्रत्युत्तर देतांना उदयनिधी यांनी नरसंहार करण्याचे आवाहन केले नसल्याचं सांगितलं आणि त्यांनी केलेल्या विधानाची पाठराखण करत, त्यामध्ये काहीच चुकीचं नसल्याचं सांगितलं.
 
त्यामुळे ज्या 'सनातन' धर्मावरून एवढा गदारोळ झालाय तो सनातन धर्म म्हणजे नेमकं काय हा प्रश्न इथे निर्माण होतो.
 
सनातन ही एक जीवनपद्धती आहे का?
अध्यात्मातील सनातन धर्माचा अर्थ जाणून घेण्यासाठी आम्ही कोईमतूर पेरूर येथील आदिनाम संतलिंगा मरुदाचल अदिगलर यांच्याशी संवाद साधला.
 
ते म्हणाले की, "सनातन ही एक प्राचीन जीवनपद्धती असून, जातीय रचनेतून निर्माण झालेल्या समाजाचा या जीवन जगण्याच्या पद्धतीशी काहीएक संबंध नाही.
 
सनातन धर्म ही एक प्राचीन संस्कृती आहे. जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे. आपण देवांचा, आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने, करुणेने वागले पाहिजे हेच यामध्ये सांगितलं आहे."
 
मरुदाचल अदिगलर यांनी सांगितलं की विविध नैतिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सनातन मार्गाचा उल्लेख आहे. हिंदू धर्म याच सनातन मार्गाचे विस्तारित रूप असल्याचेही ते म्हणाले.
 
याबाबत बोलतांना ते म्हणतात की, "त्यातील जात हा विषय नंतर आला. प्रत्येक धर्माच्या व्यक्तींनी देव कसा पाहिला याच्या आधारे सनातनधर्माची तत्वं सांगितली आणि लिहिली गेली आहे."
 
"ज्या तत्वांचे अगदी काटेकोरपणे पालन केले जाते त्याच तत्वांना सनातन धर्म म्हणतात," असं ते म्हणाले.
 
आपल्या संस्कृतीत सनातन धर्म आहे का?
तमिळ शैव परेवयाचे अध्यक्ष कलाईरासी नटराजन यांचं असं म्हणणं आहे की, सनातन धर्म हा तमीळ किंवा भारतीय कोणत्याही संस्कृतीचा भाग राहिलेला नाही.
 
याबाबत बोलतांना ते म्हणतात की, "सनातन ही आर्यांची जीवनपद्धती आहे. सनातन आणि तमीळ लोकांचा काहीही संबंध नाही, एवढंच काय तर सनातन आणि मूळ भारतीयांचा देखील काहीही संबंध नाहीये."
 
सनातन धर्माचा विरोध करण्याची कारण सांगताना ते म्हणतात की, “सनातन केवळ जगण्यातल्या नैतिकतेचे उपदेश करतो.
 
पण वर्णाश्रमाच्या आधारे समाजात फूट पाडायला मात्र सनातन धर्म विसरत नाही. सनातन धर्म, वर्णाश्रमव्यवस्था, मनुधर्म या व्यवस्था मानवतेच्या विरोधात आहेत हे ते मान्यच करत नाहीत."
 
सनातन धर्म नष्ट करायला हवा का? या प्रश्नाचं उत्तर देतांना ते म्हणतात की, "जर एखादी गोष्ट लादली गेली असेल तर तिचा नायनाट केलाच पाहिजे.
 
आर्यांद्वारे पाळला जाणारा सनातन धर्म आता प्रत्येकावर लादला जातोय. त्यामुळं सनातन धर्म नष्ट करणं हाच एकमेव पर्याय आहे."
 
पण इतक्या सहजासहजी ते शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
कलाईरासी नटराजन म्हणतात की, "आणखीन किमान शंभर वर्षं याबाबत रात्रंदिवस एक करून जागरुकता निर्माण केली, तर आणि तरच हा धर्म आणि जातीव्यवस्था निर्मूलन केले जाऊ शकेल."
 
प्रत्येक धर्मात सामाजिक समस्या असतेच
ईस्टर्न एडिशनचे प्रकाशक बद्री शेषाद्री म्हणतात की, "जात आणि धर्म याबाबतच्या अडचणी प्रत्येक धर्मात असतात आणि हिंदू धर्मही त्याला अपवाद नाहीये."
 
बद्री शेषाद्री म्हणतात की, "इतर धर्मांप्रमाणेच हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या समाजातही अनेक समस्या आहेत.
 
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या धार्मिक गुरूंनी अशा समस्यांचा सामना केला आणि त्यावर उपाय शोधून काढले. अनेकांनी हिंदू धर्म नाकारला आणि नवनवीन धर्मांची स्थापना केली. अनेकांनी इतर धर्मांचाही स्वीकार केला."
 
सनातन धर्म ही केवळ आर्यांची जीवनपद्धती असल्याच्या टीकेला उत्तर देतांना ते म्हणाले की, "जिथे जिथे धर्म असेल, तिथे तिथे तो धर्म आवडणारे लोक त्या धर्माचं पालन करतील."
 
त्यांनी विचारलं की, "जर ही आर्यांची जीवनपद्धती असेल तर ही पद्धत स्वदेशी आहे की विदेशी आहे हा प्रश्न निर्माण होईल. बौद्ध आणि जैन धर्मांची स्थापना उत्तर भारतातच झाली होती का?
 
इस्लाम धर्माची स्थापना अरबस्तानात झाली होती का? आणि ख्रिश्चन धर्माची स्थापना पश्चिम आशियामध्येच झाली होती का? याबाबतही अनेक वाद आहेत.
 
तोलकप्पियम सारख्या अनेक प्राचीन तामिळ ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. जो धर्म ज्याला आवडेल तो धर्म त्याला पाळू द्यावा."
 
'नैसर्गिक नियमांच्या आधारे सामाजिक नियम बनवू नयेत'
बीबीसीने हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्रगतिशील लेखक आणि कलाकार संघटनेचे सरचिटणीस आधवन दीत्सन्या यांच्याशी संवाद साधला.
 
याबाबत बोलतांना ते म्हणाले की, "आजही जर आपण प्राचीन पद्धतीने जगत असतो तर सध्याचे राज्यपाल आर. एन. रवी तामिळनाडूचे राज्यपाल नसते, एवढंच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या देशाचे पंतप्रधान नसते.
 
ज्याप्रमाणे पाणी हे खालच्या दिशेने वाहतं किंवा मग आग ही वरच्या दिशेनेच जळत जाते हे ठराविक नैसर्गिक नियम आहेत अगदी त्याचप्रमाणे सनातन धर्मदेखील आयुष्य जगण्याचा एक ठराविक आणि कधीही न बदलू शकणारा मार्ग सांगतो."
 
मात्र नैसर्गिक नियम कधीही बदलू शकत नाहीत आणि त्याच धर्तीवर सामाजिक नियम बनवलेच जाऊ शकत नाहीत, हे सांगताना ते हेदेखील म्हणाले की जर का हे नियम बदलले नाहीत तर राज्यपाल आणि पंतप्रधान कधीच शाळेत जाऊ शकले नसते.
 
या विषयीच्या शोधनिबंधांमध्ये काय सांगितलं आहे?
1916 मध्ये वाराणसीमध्ये असणाऱ्या केंद्रीय हिंदू महाविद्यालयातील बोर्डाने असं म्हटलं आहे की, सनातन हा आर्य धर्म आहे.
 
या पुस्तकात सनातन धर्माची ओळख करून देताना असं लिहिलंय की, “सनातन धर्म हा चिरकाल टिकणारा धर्म आहे, प्राचीन कायद्यांवर या धर्माची रचना केली गेलीय.
 
अनेक वर्षांपूर्वी पुरुषांना केल्या गेलेल्या उपदेशांवर आधारित हा धर्म आहे. याच धर्माला आर्यधर्म असं म्हणतात. आर्यांनी दिलेला हा पहिला धर्म आहे."
सनातनावरील या अभ्यासात असं नमूद केलं गेलंय की सनातनचा आधार श्रुती आहे. देवतांकडून मंत्रोच्चार ऐकलेल्या पूर्वजांनी माणसाला सांगितलेला धर्म म्हणजे श्रुती.
 
"श्रुती मध्ये चार वेदांचा उल्लेख केला गेलाय. वेद म्हणजे ज्ञान. हिंदू धर्मांचा पाया म्हणून वेदांना मान्यता आहे. या धर्माचे पालन करणाऱ्या माणसांना चार वेदांप्रमाणे जगण्याचा सल्ला दिला गेलाय. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद असे हे चार वेद आहेत," हेही त्या पुस्तकात लिहिलं गेलंय.
 




Published By- Priya Dixit