सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (16:41 IST)

दर्शना पवार : MPSC आणि UPSC परीक्षेचं वास्तव विद्यार्थी आणि त्यांचे पालक का स्वीकारत नाहीत?

गेल्या काही वर्षांपासून पुणे स्पर्धा परीक्षेचं हब झालं आहे. नुकत्याच झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणाने स्पर्धा परीक्षेच्याबाबत अनेक चर्चा सोशल मीडिया, टीव्ही आणि वर्तमानपत्रातून होऊ लागल्या आहेत.
 
या सगळ्यांत स्पर्धा परीक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पुण्यात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येतात. यात शहराच्या आजूबाजूचे निमशहरी तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं प्रमाणतुलनेने अधिक आहे.
 
या गोष्टी करताना विद्यार्थी स्वतःची बौद्धिक कुवत तपासून बघतात का? की नुसतं 'मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, आताच्या प्रयत्नात केवळ कमी गुणांनी पोस्ट हुकली. माझी पूर्व निघालीय,' असं म्हणत एक, दोन नव्हे तर पाच-सहा वर्षं परीक्षेची तयारीत वेळ घालवणारेही अनेकजण आहेत. यासगळ्यात विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत नेमकं काय वाटतं याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट...
 
ग्रामीण भागातून या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात येणाऱ्या बहुतांश मुलांची घरची आर्थिक स्थिती बेताची असलेली दिसून येते.
 
सरकारी नोकरी, पद, पैसा, मानमरातब यासारख्या कल्पना मनात बाळगलेले अनेकजण केवळ गावातला, आसपासचा कुणीतरी अधिकारी झाला आहे म्हणून एक स्टेट्स सिम्बॉल म्हणून स्पर्धा परीक्षेकडे बघतात.
 
खासगी नोकऱ्यांपेक्षा सरकारी नोकरी गमावण्याची भीती तुलनेने कमी असते, असा विचार करणारे विद्यार्थीही सापडतात.
 
सातारा जिल्ह्यातील माण हा दुष्काळीपट्टा म्हणून ओळखला जातो. येथील शेतीही पावसावर अवलंबून आहे. याच तालुक्यातील जालिंदर (नाव बदलेलं आहे) हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे साधारण 6-7 एकर शेती आहे. पण ही सर्व शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याचे ते सांगतात.
 
पिढीजात शेती व्यवसाय करणाऱ्या जालिंदर यांचा मुलगा संदीप हा पहिला पदवीधर. संदीपने पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला.
 
शालेय, महाविद्यालयीन जीवनात अभ्यासात हुशार असल्याने पदवीपर्यंत त्याला गुणही चांगलेच होते. मग त्यांनीही त्याला स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहित केलं.
 
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तो पुण्यात गेला. तिथं तो गेले पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने केवळ दोन वेळा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली.
 
पण त्यानंतर मात्र त्याला पूर्व परीक्षाही पास होता आले नाही. परंतू अजूनही त्याला पोस्ट निघेल असा विश्वास आहे.
 
स्पर्धा परीक्षा म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक ताणाचा विषय
"सुरुवातीचे काही वर्षं संदीपला तयारी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आम्हाला काहीही अडचण वाटली नाही. परंतु जसजशी वर्ष वाढत गेली तसे आमच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा आर्थिक ताणाचा विषय बनला. कारण आमचं संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे," जालिंदर सांगतात.
 
"कोरोना काळात तसंच मागील वर्षभरामध्ये सर्व पिकं ही अवकाळी पावसाने तर कधी पाऊस नाही म्हणून हातातून गेली. कुठल्याही पिकातून आम्हाला उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे आता आम्हाला त्याला पैसे पुरवणे अवघड ठरतेय. पण आज परिस्थिती अशी आहे की स्पर्धा परीक्षा सोडून दे, असं आम्हाला संदीपला म्हणता येत नाही," ते त्यांची स्थिती सांगतात.
 
आम्हाला वाटतं की, त्याने स्वतःहून ही गोष्ट समजून घ्यावी आणि यातून बाहेर पडावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
 
आज पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचा सुरुवातीपासून विचार करायचा झाल्यास राहण्याची व्यवस्था, खानावळ, अभ्यासिका, पुस्तकं, क्लासेस यासारख्या गोष्टीसाठी खूप पैसे लागतात. यामध्ये क्लासेसच्या फीही भरपूर आहेत.
 
याचबरोबर महिन्याला होणाऱ्या खर्चाचं प्रमाण जास्त आहे. जे सर्वसामान्य माणसाला न परवडणारं आहे.
 
दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घेऊन तरी कुठं नोकऱ्या आहेत?
मात्र सांगलीचे राजेंद्र (नाव बदललेलं आहे ) यांचं स्पर्धा परीक्षेविषयीचं मत काहीसं वेगळं आहे.
 
"सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले राजेंद्र म्हणतात की, दुसऱ्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन तरी कुठे लगेच नोकरी आहे. तुम्ही पीएचडी झाला, इंजिनियर झाला तरी दहा-बारा हजारारुपयावर तुम्हाला काम करावं लागतं. त्याच्यापेक्षा एखादी पोस्ट काढली तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल. नोकरीच्या सुरक्षिततेची, वेळच्यावेळी पगाराची हमी तरी मिळेल."
 
"नुसतं शिकून पदव्या घेऊन काही उपयोग नाही. आयुष्याची 30-35 वर्षं गाठली तरी तुम्ही अजून सेटल नाही. खासगी ठिकाणी कंपनीमध्ये नोकरी करून तुम्हाला असा कितीसा पगार मिळणार आहे. यापेक्षा स्पर्धा परीक्षा केली तर कदाचित चांगली पोस्ट तुम्ही काढू शकता," असे ते म्हणतात.
 
सुरुवातीला राजेंद्र स्पर्धा परीक्षा करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करायचे. मात्र या परीक्षांसाठी नेमका किती वेळ द्यायला हवा? किती प्रयत्नानंतर विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणं थांबवलं पाहिजे यावर मात्र ते शांत बसतात.
 
त्यानंतर एक दीर्घश्वास घेऊन त्यांनी सांगितलं की, "माझ्या मुलगा खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र त्याच्या मित्राने उपजिल्हाधिकारी पदाची पोस्ट काढली.
 
मग मीही मुलाला स्पर्धा परीक्षेची तयारी करावी यासाठी प्रोत्साहित केलं. मित्राचं यश पाहून त्यानेही स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून अभ्यासाला सुरुवात केली.
 
गेल्या चार वर्षांमध्ये त्याला स्पर्धा परीक्षेतील एकही परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही. आज मात्र मला त्याची काळजी वाटते. मी स्वतःहून त्याला या परीक्षेसाठी प्रोत्साहित केलं.पण त्याला जमेल का? याचा विचार केला नाही.
 
त्यासाठी आपली बौद्धिक कुवत तपासणं गरजेचं आहे. परंतु आता थांबून पुन्हा त्याने शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात करिअर करावं, असं वाटतं. कारण त्याचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे.
 
नोकरी नसेल तर याला मुलगी कोण देणार हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे."
 
प्रशासनात दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांचं प्रमाण अत्यंत मोजकं आहे. परंतु या पदांसाठी तयारी करणारे तसंच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
 
यातील निम्मे विद्यार्थी जरी प्रामाणिकपणे अभ्यास करत असले तरी प्रशासनाला त्यांची गरज आहे का? आणि या मुलांना संधी मिळणार का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
 
स्पर्धा परीक्षेतील वास्तवाबाबत माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे अत्यंत परखड भाष्य करतात. ते म्हणतात "स्वतः IAS असताना वाट्याला आलेली नोकरी सोडून इतरांना IAS बनवण्यासाठी धर्माचा अधिकार मिळालेला आणि त्यांच्या सारख्यांनी पुण्यात अनेक संस्था उभ्या केल्या.
 
यश का मिळत नाही? मिळालेच पाहिजे. मी नाही का मिळविलं. फक्त मनात विश्वास हवा! असं सांगणाऱ्या पाटलांच्या ऑडिओ आणि व्हीडिओचं श्रवण तमाम मराठी मुलं रात्रंदिवस हेडफोन कानाला लावून करत असतात. मुलं पेटून उठतात. सरकारी अधिकाऱ्याची स्वप्न पाहायला लागतात. तशी स्वप्न पाहणं हे मुळीच गैर नाही. प्रत्येकाने पाहावीत.
 
पण हे विश्वास देणारे पाटील हे सांगत नाहीत की दरवर्षी सहा ते सात लाख मुलं परीक्षेला बसतात आणि त्यातील अंदाजे 700 मुलांनाच नोकऱ्या मिळतात."
 
"एक मुलगा निवडला गेला, तर 9999 मुलांना अपयशी म्हणून आयुष्यभर जगावे लागतं! अधिकारी बनण्यासाठी सुरू केलेल्या अकॅडमीचे मालक आणि यशाचा विश्वास सांगणारे वक्ते यांचं यात काहीच नुकसान होत नाही."
 
मुलांना मोठी स्वप्न पाहायला आपण शिकवतच नाही
खोपडे पुढे सांगतात,
 
"जन्मलेल्या प्रत्येक बालकांमध्ये कोणत्या ना कोणत्या एका गोष्टीसाठी विशिष्ट अशी बुद्धिमत्ता असते. ती फक्त सरकारी अधिकारी बनण्यासाठीच नसते. पण त्याची जाण त्या मुलाला, त्याच्या पालकांना, शिक्षकांना नसते.
 
सर्वसाधारणपणे डॉक्टर वकील इंजिनियर, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा आणि इतर थोडीशी करिअर बद्दल माहीत असते. मुळात मुलांना मोठी स्वप्न पाहायची असतात. पण कोणती स्वप्न पहावीत हे त्यांना माहीतच नसतं. हा दोष इथल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे.
 
सध्याची शिक्षण पद्धती असं काही शिकवत नाही. ती मार्काची टक्केवारी किंवा ग्रेड याकडे जास्त लक्ष देते. ते ओळखून त्यावर उपाय म्हणून 'कुडाची शाळा' हा उपक्रम 2013 पासून मी मोरगाव येथे उभा केलेला आहे."
 
स्पर्धा परीक्षा करताना 'प्लॅन बी' असायला हवा
सरकारी अधिकारी बनण्याचे ध्येय अवश्य ठेवा पण त्याचबरोबर ते नाही तर दुसरे काय? यासाठी बी प्लॅन तयार ठेवा. एमपीएससी शिवाय 600 वेगवेगळ्या डिग्री आणि डिप्लोमामधून आपल्या आवडीचे करिअर करता येतं. याबद्दलचं मार्गदर्शन उपलब्ध आहे.
 
हे मार्गदर्शन वयाच्या अकराव्या वर्षापासून घेता येऊ शकतं. आज पुणे शहरात एक लाखापेक्षा जास्त दर्शना आणि हंडोरे आपलं नशीब आजमावण्यासाठी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. त्यांना हा पर्याय समजून सांगणं हे माझ्यासारख्याला महत्त्वाचे वाटतं, असं ते सांगतात.
 
यासगळ्यात स्पर्धापरीक्षेतून बाहेर पडून नोकरी करणाऱ्या संतोषला कुटुंबियाकडून आलेले अनुभव आणखी वेगळा आहे.
 
कोल्हापूरचा संतोष चौगुले MCA झाला आहे. त्यानंतर त्याने यूपीएससी करण्याचा निर्णय घेऊन तयारीला सुरुवात केली. हा निर्णय घेत असताना त्याच्या कुटुंबानेही पाठींबा दिला.
 
तीन वर्षं स्पर्धा परीक्षेची तयारी केली पण त्याला त्यात यश मिळालं नाही. त्यानंतर मात्र त्याने थांबायचा निर्णय घेत नोकरी करण्यास सुरुवात केली.
 
तो म्हणतो "नोकरी करत असताना मी स्पर्धा परीक्षेत अयशस्वी झालोय याची खंत होती. माझ्याविषयी कुटुंबातील सदस्य काय विचार करतील? असं मला वाटायचं. वडील काय म्हणतील? त्यांना आवडेल का? असा विचार करायचो. मला मिळणाऱ्या पगारातून घरी पैसे द्यायला सुरुवात केली आणि वडिलांना मी आता स्पर्धा परीक्षा थांबून नोकरी करत असल्याचे सांगितलं. तेव्हा मला प्रचंड भीती वाटली होती. ते काय प्रतिक्रिया देतील. मात्र मी जसा विचार केला होता, त्याच्या उलट सर्व गोष्टी घडल्या."
 
"तुझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तुझं तुलाच कळलं, की आपण आता थांबलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही. म्हणून काय झाले, इतर क्षेत्रात चांगलं काम कर," असं वडील म्हणाल्याचं तो सांगतो.
 
तेव्हा काहीकाळ मला माझ्या स्वतःवर विश्वास बसत नव्हता, संतोष आश्चर्याने म्हणतो.
 
"कारण स्पर्धापरीक्षेत अयशस्वी झाल्यानंतर बहुतांश मुलांची कुटुंबाकडून अहवेलना होते. टोमणे मारताना मी बघितले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे वडील आणि मुलगा यांच्यातील संवाद कमी होत जातो. जेवढ्यास तेवढंच बोललं जातं, वडिलांनी माझ्या निर्णयाचं स्वागत करत मला पाठींबा दिला."
 
दुसरीकडे प्रशासनात दीर्घकाळ आयएएस अधिकारी म्हणून काम केलेले माजी सनदी अधिकारी महेश झगडेही स्पर्धा परीक्षेकडे केवळ आकर्षण, क्रेझ म्हणून पाहणाऱ्याबद्दल आपले मत अगदी स्पष्टपणे मांडतात.
 
ते म्हणतात, "यूपीएससी आणि एमपीएससी ही जीव घेणी स्पर्धा आहे. या यूपीएससीमध्ये दरवर्षी जवळपास 12 ते 13 लाख विद्यार्थ्यांच्या अर्जांमधून 140 ते 150 च्या दरम्यान आयएएस अधिकारी 100 च्या आसपास आयपीएस अधिकारी अशी साधारण अधिकारी पदे भरली जातात.
 
याचं प्रमाणे एमपीएससीमध्येही वर्ग 1 चे वर्ग 2 च्या साधारण 350 पदांची भरती केली जाते. पण त्यासाठी साडेतीन लाखांपेक्षा जास्त अर्ज येतात. पण याचा अर्थ असा आहे की एक टक्के पेक्षा कमी विद्यार्थ्यांची निवड होते. त्यामुळे कितीही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तरी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या नगण्य आहे."
 
"हा विचार केला तर सिलेक्शन न होणाऱ्यांचं प्रमाण 99.99 टक्के पेक्षाही जास्त आहे. त्यांची निवड कधी होऊ शकत नाही. या ठिकाणी यशस्वी होण्याचा मापदंड हा खूप कमी आहे. तुम्ही यशस्वी होण्याचं प्रमाण नगण्य आहे. काही ठराविक लोकच होणार हे तर निश्चित आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांनी करिअरचा 'प्लॅन बी'' बनवला पाहिजे," असे सांगतात.
 
"विद्यार्थ्यांनी इतर खासगी नोकऱ्या असतील, शेती, व्यवसाय असेल हा तुमच्या आयुष्याचा प्लॅन ए बनवा. एकदा स्पर्धा परीक्षा प्लॅन बी बनवल्यानंतर तुम्ही जीव तोडून अभ्यास करा. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांना एक-दोन प्रयत्नातच लक्षात येतं, की आपली ही परीक्षा पास होण्याची कुवत आहे की नाही.
 
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दोन किंवा तीन प्रयत्नांच्या पुढे जाऊ नका. या दोन-तीन प्रयत्नांमध्येच प्रत्येक विद्यार्थ्याला आपण किती पाण्यामध्ये आहोत हे लक्षात येतं. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं योग्य नाही. हे वास्तव स्वीकारून तुम्ही स्पर्धा परीक्षाला योग्य वेळेस सोडलं पाहिजे."
 
अलीकडच्या काळात ग्रामीण भागांमधून स्पर्धा परीक्षांमध्ये कोणी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांच्या मोठे मोठे सत्कार केले जातात. त्यांचे फ्लेक्स लावले जातात. भव्य मिरवणूक काढल्या जातात. यातूनच ग्रामीण भागातील अनेक पालकांना आपल्या पाल्यानेही अशा प्रकारे स्पर्धा परीक्षा करून यश मिळवावं असं वाटतं.
 
रोजगारांची कमतरता त्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे ओढा
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार कमी होत चाललेला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षाकडे रोजगाराच्या संधी म्हणून देखील पाहिल्या जात आहे.
 
आपल्याला काहीतरी सरकारी नोकरी मिळेल या भावनेतून मुलं अनेक वर्षं स्पर्धा परीक्षा करत राहतात. त्यामुळे या मुलांना आणि त्यांच्या पालकांना सांगणं फार गरजेचं आहे.
 
"मी मागे प्रशासनाला सूचना केल्या होत्या, की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याबाबतची प्रबोधन शिबिरं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी घ्यायला पाहिजेत," असं झगडे सागंतात.
 
"जिल्हा प्रशासनाने हे प्रबोधन शिबिर घ्यायला हवं. यातून मग विनाकारण पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन होणारा अनावश्यक खर्च टाळला जाईल.
 
या शिबिरांच्या माध्यमातून मुलांचं नैराश्य देखील कमी करण्यास मदत होईल. नैराशयांमधूनच घडणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांकडून घडत असतात त्या गोष्टी टाळता येतील."
 
एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या वयोमर्यादा शासनाने वाढविलेल्या आहेत, त्या कमी केल्या पाहिजेत, अशीसुद्धा मागणी होतेय.
 
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये ग्रामीण भागातून विशेषतः शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे किंवा ऊस तोडणी काम करणारे यांची मुलं खूप जास्त आहेत. अशा पालकांना आपली मुलं तहसीलदार उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी अशा पदांच्या परीक्षांची तयारी करत आहेत हीच खूप मोठी गोष्ट वाटत राहते. त्यातल्या वास्तव आणि गोष्टी बऱ्याचदा त्यांना माहिती नसतात.
 
या पालकांचं प्रबोधन करणं खूप गरजेचे आहे.
Published By -Smita Joshi