शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (12:36 IST)

आज वेळा अमावास्या. शेतकर्‍यांचा मोठा सण. त्यानिमित्त ...

काळ्या मातीत रब्बीची केव्हाच पेरणी झालेली असते. वातावरणात गुलाबी गारठा साठलेला असतो. अशा गारठलेपणात ज्वारी, हरभरा, गहू, वाटाणा, मसूर, जवस ही पिके हिरवेपणाने डवरलेली असतात. जणू काळी आई हिरवा शालू नेसून नटलेली असते. तुरीची पिवळी धमक फुले लावलेल्या हळदीप्रमाणे हळूहळू फिकी पडतात. ज्वारी, गहू, तूर ही सारीच पिके पोटरीत डवरलेली असतात. नवविवाहित गर्भार स्त्रीस चोळी करण्याची, डोडाळ जेवण करण्याची रूढी आपल्याकडे  आहे. हिरव्या भरल्या काळ्या आईचा-लक्ष्मीचा डोहाळे जेवणाचा सण म्हणजे शेतकर्‍यांचा वेळा अमावास्या सण होय. शेतकरी हा सण तीन दिवस साजरा करतात.
 
अमावास्येच्या पहिला दिवस हा भाजीपाल्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी शेतकरी आपापल्या शेतात कडब्याच्या पाच पेंढ्यांच्या कोपी उभ्या करतात. त्या कोपीत काळ्या मातीची पाच ढेकळं ठेऊन लक्ष्मीची स्थापना करतात. आगटी मारली जाते. संध्याकाळच्या वेळेस मातीची नवीन घागर पाण्याने भरून ठेवतात. लक्ष्मीच्या   आखाड्यावरील घागरीतील थंडपाणी पिऊन शेतकरी तृप्त असतो. जोंधळा खुरपताना-न्याहारी, दुपारी, तीनपारीचे जेवण करून गार पाणी पितो.
 
काळ्या आईचे डोहाळे जेवण अत्यंत साधे असते. भज्जी, रोडगा, कानोळे, आंबील, खिचडा किंवा आंबट भात (ज्वारीचा कांडून केलेला भात) खीर-दूध, दहीभात इत्यादी. शेतकर्‍यांच्या घरातील धान्यापासून हे पंचपक्वान्न बनवले जाते. भाजीपाल्या दिवशीच रात्रभर बायका चुलीवर स्वयंपाक करतात.
दुसरा दिवस हा मुख्य वेळा अमावास्येचा दिवस होय. भल्ल्यापहाटे उठून शेतकरी सर्वप्रथम अंबिलीची घागर शेताकडे नेतो. गावातील प्रत्येक अंबिलाचा घडा शेतीकडे जाताना हालगीवाला गावलक्ष्मीजवळ उभा राहून हालगी वाजवून त्यांची  पाठवणी करतो. हालगीच्या आवाजाने भल्या पहाटे, चिल्ली-पिल्ली, म्हातारी-कोतारी असा सारा गाव जागा होतो. आंघोळी करून सारे घरदार नटूनथटून तयार होते. कुणी बैलगाड्यातून, कुणी चालत जेवणाच्या लवाजम्यासह काळ्या आईच्या जेवणासाठी संपूर्ण गाव आपापल्या शेतावर जातो.
 
लक्ष्मीचं घरकूल म्हणजे कोपीस शाल किंवा शालू पांघरून नटवले जाते. आत लक्ष्मीसाठी चोळखण टाकून त्यावर चुरमुरे, बत्तासे, पेरू, केळी, नारळ, बोर, खोबर्‍याची वाटी इ. काळ्या आईची डोहाळे पुरवण्यासाठी सज्जता होते. आरसा कंघीपासून तिची सेवा केली जाते. सर्वप्रथम लक्ष्मीस पाच रोडगे, भज्जी आणि इतर प्रक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. पिठाच्या पाच दिव्यातून तुपाच्या वाती पाजळतात. लक्ष्मीला धुपारती होते. मग दोघे जण चर शिंपल्यासाठी निघतात. वेळामावस्याला चर शिंपणे ही एक अत्यंत शास्त्रशुद्ध अशी शेतकर्‍यांची वहिवाट आहे. एकाच हातात खेळणी (मातीचे पात्र) व त्यातील अंबील व पंचपक्वान्नाचे मिश्रण असते. दुसर्‍याच्या हातात मोरंब्यात (मातीचा लोटा) पाणी घेतले जाते. ज्वारीच्या पाल्याने शेतभर हे दोघे शिंपडत निघतात. अंबीलाचा थंडपणा आणि पाण्याचा गारवा पिकांना देण्याचा हा प्रघात आहे. उभ्या पिकाला व आपल्या काळ्या आईला जेऊ घालण्याचा आणि पाणी पाजण्याचा हा प्रकार आहे. जमिनीतील ओलावा कमी होण्याचे हे दिवस असतात. तो आपल्या पिकांना देऊन फलित करण्याचा हा शेतकर्‍यांचा प्रघात आहे. संपूर्ण शेतभर चर शिंपून झाल्यावर या दोघांना लक्ष्मीचा नैवेद्य रोडगा व भज्जी दिली जाते. एव्हाना चिल्यापिल्यांकडून शेतकर्‍याच्या शेतातील दैवतांना-झाडाखालचे पांडव, शेताखालचा म्हसोबा आणि नदीचा उतार यांना पुजून झालेले असते. लगेच लहान थोरांची रानात पंगत बसते. दिवसभर अनेक गोर-गरीब, बारा बलुतेदार रानात जेवणात सहभागी होतात. 
शेतांनी झाडाच्या आश्रयाने उभे केलेले आटोळे आणि झाडांना बांधलेले उंच उंच झोके हे या सणाचे निराळेच आकर्षण असते. लक्ष्मीसाठी उभ्या केलेल्या आटोळवरून हिरवेगार शिवार पाहण्यासाठी निराळीच मौज असते. याच आटोळ्यावरून शेतकरी संपूर्ण शेतीची देखभाल करतो. झाडाझाडावर बांधलेल्या झोक्यावर लहान थोर झोके घेण्यात मग्न असतात. पतंगाच्या लढाया लावण्यात मश्गुल होणारी व ज्वारीच्या रानात पळत सुटणारी अल्लड पोरं निराळीच.
 
रानात हा हा म्हणता सायंकाळ होते. सूर्यास्ताच्या वेळी आगटीत छोट्याशा लोट्यात पाणी ठेवले जाते. लक्ष्मच्या बाजूनं उतू जाते ते शुभ मानले जाते. संध्याकाळच्या वेळेस हेंडगे पेटवणे हा एक या सणाचा विशेष आहे. हेंडगा पेटवून शेताच्या भोवती फिरवले जावे. कडाक्याच्या थंडीने पिकांना थंडीची बाधा होण्याचा संभव असतो. पिकांवर 'थंडी' 'हीव' पडू नये म्हणून उभ्या पिकांना ऊब देणचा हा प्रकार आहे. शेताशेतातून पेटवलेले हेंडगे शेतकरी लोक गाव मारोतीपर्यंत आणतात. वाटेवरील काटे जाळण्याचा व लक्ष्मीची वाट निष्कलंक करण्याची ही वहिवाट आहे. गाव मारोतीसमोर हेंडग्याचा ढीग टाकतात. जळालेल्या हेंडग्याची तप्त राख पसरवली जाते. या विस्तवावरून चालत जाणे आरोग्यदायी आहे. म्हणून आबालवृद्ध महिला यावरून चालत जातात. 
 
वेळा अमावास्येचा तिसरा दिवस हा 'करी'चा असतो. शेतकर्‍याच्या घरी या दिवशी ताजा स्वयंपाक होत नाही. गोरगरीब लोक घराघरांनी फिरून भज्जी व रोडगे यांच्या टोपल भरून नेतात. प्रत्येक शेतकरी शिळी भज्जी व रोडगे खाण्यातच मग्न असतो. आदल्या दिवशी लक्ष्मीचा नैवेद्य कोपींच्या माथ्यावर ठेवला जातो. घरच्या माणसाची न्याहारी यावरच शेतात होते. काळ्या लक्ष्मीबद्दल शेतकर्‍याची भोळी भाबडी श्रद्धा वेळा अमावास्येच्या सणातून प्रगट होते. श्रद्धेत खरा भाव असतो. तीच खरी भक्ती ठरते. काळ्या आईची श्रद्धापूर्वक केली जाणारी भक्ती व खरा सेवाभाव शेतकर्‍यास दिसून येतो. शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. यादिवशी अन्नदान करण्यात शेतकरी धन्यता मानतो.
 
प्रा. मनोहर निटुरे