रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:57 IST)

जेव्हा प्रत्यक्ष श्री खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते

एकदा श्रीसमर्थ रामदास स्वामी पुरंदर किल्ल्यावरून चाफळला जाताना जेजुरी वरून चालले होते. तेवढ्यात एक धनगर, घोड्यावरुन समर्थांसमोर आला. त्याने समर्थांचे दर्शन घेतले व म्हणाले, "महाराज खंडोबाच दर्शन घेवून जाना." तेव्हा समर्थ हसून म्हणाले, "अरे बाबा, मी रामाचा सेवक आहे. मी रामा व्यतिरिक्त इतरांना राम स्वरूपातच पाहतो. तुझ्या खंडोबाला इथूनच नमस्कार करतो. आता गड चढायला मला जमणार नाही." 
 
त्यावर तो धनगर म्हणाला, "अहो महाराज, तुमच्या रामाने प्रत्येक वेळी शिवलिंग स्थापून शिवाची मनोभावे पूजा केली त्या रामाच्या दैवताला तुम्ही दर्शन घेणार नाही म्हणता, हे जरा अचंबित करणारे आहे". हे त्या धनगराच्या मुखातील शब्द ऐकून समर्थ चमकले. मनात विचार केला, ही माझ्या रामाची आज्ञा दिसत आहे. हे पाहून नाईलाजाने धनगराच्या घोड्यावर बसून वर जेजुरी गडावर आले. त्यावर धनगर म्हणाला, "महाराज, तुम्ही दर्शन घ्या. मी घोड बांधून येतो." 
 
समर्थ मंदिरात गेले तिथे खंडोबाचे लिंग पाहून महाराजांचे मन प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. अंगाला कंप सुटला. वाणी सद्गदित झाली आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले, 
 
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
 
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥
 
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥
 
सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
 
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥
 
रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
 
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ 
 
म्हणजे, श्री रामाचा भक्त असून रामाचे नाव घेत असताना माझ्या हृदयात प्रत्यक्ष शंकर अवतरले. ही अनुभूती समर्थांना आली. दर्शन घेऊन बाहेर येतात तर, तो घोडा ही नाही आणि तो धनगर ही नाही. 
 
समर्थांनी ओळखले की प्रत्यक्ष श्री खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते. मी देवाला कष्ट दिले याचे समर्थांना फार वाईट वाटले.

हीच खंडोबाची आरती सर्व महाराष्ट्रभर प्रचलित आहे. 
।। जय जय रघुवीर समर्थ ।।