रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (15:01 IST)

दुनिया पक्ष्यांची : गोल्डन ईगल

उत्तर अमेरिकेतील हा सर्वांत मोठा पक्षी असून तो मॅक्सिकोचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी गडद चॉकलेटी रंगाचा असून त्याच्या मानेवर आणि डोक्यावर गोल्डन ब्राउन रंगाची छटा असते. ते अतिशय वेगाने उडणारे आणि सूर मारणारे असतात. ते 241 किलोमीटर प्रतितास या वेगाने आकाशातून जमिनीकडे सूर मारतात. गोल्डन ईगल अर्थात सोनेरी गरूड हे या वेगाचा आणि पायांना असलेल्या नखांचा उपयोग ते जमिनीवरील ससे, खारी किंवा अन्य शिकार पकडण्यासाठी करतात. ते इतर सरपटणारे प्राणी, पक्षी, मासे, मोठे कीटक इत्यादी प्राणीसुद्धा खातात. अलीकडे त्यांची संख्या कमी झाल्यामुळे कायाने त्यांचे संरक्षण केले जात आहे.
 
सोनेरी गरुडाची जोडी हे त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करतात आणि जवळपास 155 स्क्वेअर किलोमीटरचा त्यांचा प्रांत असतो. हा पक्षी एकाच जोडीदाराबरोबर अनेक वर्ष आणि शक्यतो संपूर्ण आयुष्यभर राहातो. या पक्षाची घरे अतिशय उंचावर असतात आणि लटकलेलीअसतात. उंच झाडांवर आणि टेलिफोनच्या खांबावरसुद्धा ते घरटे बांधतात. ते मोठे घरटे बांधतात, जेणेकरून त्यामध्ये अनेक वेळा अंडी घालता येऊ शकतील. एका वेळी मादी एक ते चार अंडी घालते. नर-मादी दोघे मिळून 40 ते 45 दिवसांपर्यंत ही अंडी उबवतात. एक किंवा दोन पिले यापैकी जगतात आणि तीन महिन्यांनंतर ते स्वतंत्ररीत्या उडू शकतात.
 
मॅक्सिकोबरोबरच पश्चिम-दक्षिण अमेरिकेत आलास्कापर्यंत हे पक्षी आढळतात. आशिया, दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्येसुद्धा ते आढळतात. काही सोनेरी गरूड हे स्थलांतर करतात पण सगळेच नाही. त्यांचे स्थलांतर भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. आलास्कामध्ये आणि कॅनडात राहणारे हे पक्षी साधारणपणे दक्षिणेकडे स्थलांतरित होतात. तर पश्चिम अमेरिकेच्या भागात राहणारे पक्षी त्यांच्याच प्रदेशात राहतात.