1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (22:44 IST)

Health Tips : उष्माघाताचा मेंदूवरही परिणाम होऊ शकतो, अशा लक्षणांबाबत काळजी घ्या

देशातील अनेक राज्यांमध्ये मागील काळात तापमान वाढीबरोबरच जोरदार उष्ण वाऱ्यांमुळे उष्णता वाढली आहे. उन्हाळ्यात ही काही नवीन गोष्ट नाही. सध्या देशाच्या अनेक भागात तापमान 40 अंश किंवा त्याहून अधिक आहे.
 
हवामान कोणतेही असो, तापमान कितीही जास्त असो. नियमित ऑफिसला जाणाऱ्या किंवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना घराला कोंडून घेण्याचा पर्याय नसतो आणि बाहेर पडताच रणरणत्या उन्हामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरी जावे लागते. या दिवसांत उष्माघात ही एक सामान्य समस्या आहे, ज्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी न घेतल्यास ही समस्या जीवघेणीही ठरू शकते. 
 
 उष्माघाताचा अर्थ शरीर जास्त तापले आहे. बहुतेकदा हे अशा लोकांना होते जे दीर्घकाळ तीव्र सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानाच्या थेट संपर्कात असतात. यामुळे, शरीराचे तापमान 104 अंश फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते. या स्थितीमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात, ज्याबद्दल लोकांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.
 
उष्माघाताचा मेंदूवरहीपरिणाम होतो, वाढलेल्या तापमानाचा वाईट परिणाम शरीराच्या इतर भागासह मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे, मनाची स्थिती आणि वर्तनात असंतुलन देखील उद्भवू शकते. बोलता बोलता तोतरेपणा, चिडचिड होणं , गोंधळ, अस्वस्थता ही लक्षणे सामान्य आहेत. अशा परिस्थितीत त्वरित प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. 
 
मानसिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासोबतच इतर लक्षणेही लक्षात ठेवा. जसे शरीराचे तापमान वाढणे, शरीरातील कमी आर्द्रता आणि कोरडी त्वचा होणं , घाम येणे कमी होणे, अस्वस्थता आणि उलट्या होणे, त्वचा लाल होणे, जलद श्वास घेणे आणि हृदयाचे ठोके वाढणे आणि डोकेदुखीच्या समस्येवर या दिवसात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
 
उष्माघात झाल्यास काय करावे?
उष्माघाताची लक्षणे दिसू लागताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. उपचार मिळेपर्यंत रुग्णाला घरामध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवा. शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा. रुग्णाला पाण्याने भरलेल्या टबमध्ये किंवा शॉवरखाली उभे करा. रुग्णाच्या कपाळावर, मानेवर, काखेत ओले टॉवेल, बर्फाचे पॅक इत्यादी ठेवा. या उपायांनी शरीराचे तापमान नियंत्रित करता येते.
 
या गोष्टी देखील लक्षात ठेवा:
उष्णतेचे शरीरावर अनेक प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात, त्याचे सतत संरक्षण करणे आवश्यक आहे. 
* उन्हाळ्यात जास्त कपडे घालून घराबाहेर पडू नका. तुम्हाला हवे असल्यास सामान्य सुती कपड्यांवर उन्हाळी कोट किंवा सुती कापडाचा पातळ थर घालू शकता. 
* स्वतःला हायड्रेटेड ठेवा. पाणी, नारळपाणी, ताक इत्यादी प्यायला ठेवा.
* दारू आणि सिगारेटपासून दूर राहा. 
* काही औषधे आपल्या  शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे जर आपण सतत कोणतेही औषध घेत असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.