रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (14:43 IST)

आजीचा फिल्मी बटवा

आमची एक आजी होती. सिनेमाची भारी शौकीन.
दर शनिवारी रात्री अकोल्याला यायची. रविवारी बाजार,
एक सिनेमा, संध्याकाळी नातवांना सिनेमाची स्टोरी सांगायची,
आणि सोमवारी सकाळी उपवास सोडून गावी रवाना.
आम्ही सारी नातवंडं स्टोरी अगदी तन्मयतेने ऐकत असू. कारण
तो सिनेमा आजीच्या चष्म्यातून पाहिलेला असे अन त्यात तिच्या अफलातून ऍडिशन्स असत. अशीच एक स्टोरी.
"कुछ कुछ होता है.",
आजीच्याच भाषेत आणि तिच्याच नजरेतून.
एक असते राहुल अन् एक असते अंजली. दोघंही एकाच कॉलेजात. दोघंही निरा माजरबोक्यासारखे भांडत रायतात.
अंजली पोरगी असून एखांद्या पोरासारकीच कपडे घालते, भांग पाडते. मायासारकी माय असती तं चांगली कुथाडून काहाडली असती. येताजाता निरा राहुलचा भांगच मोडते, तो लावते तिच्या नाकाले बोट, ते लावते त्याच्या नाकाले बोट अन् दोघई एकमेकाले टाई देतात.
एक दिवस कॉलेजात येते टीना. राहुल असतेच भंटोल.
हातची अर्दी देते सोडून अन लागते पुरीच्या मांगं.
अंजली हे गोष्ट तिच्या मावशीले सांगते. मावशी असते बारा घाटाचं पानी पेलेली. ते अंजलीले सांगते, टाइम करू नको.
बात चक्कीवर दयन टाक, राहुलले आयलोयु म्हन, अन् येतायेता दयन अन गोडनीम्ब घिऊन ये.
अंजली जाते पन राहुल तिले सांगते की त्याचा टिनासंगं साकरपुडा ठरेल हाय.
अंजली धूम रडते अन् तिले पाहून मंदिरातल्या बायाही
कंबर हालऊ हालऊ पावसात गानं म्हनुम्हनु रडतात.
राहुलचं लग्न टिनाशी होते पन एक पोरगी झाल्यावर
टिनाले टीबी होते अन ते मरते. बरं, सुखानं मराव कि नाही,
जाता जाता पोरीजोड चिट्ठी देते त्याच्यात राहुलचं अन अंजलीचं लफडं असते. आता राहुलचीच काट्टी ते. शाळा शिक्याचं देते सोडून अन् अंजलीले धुंडायले निंगते. सोबत राहुलची माय असतेच. तिले अंजली तं सापडते पन आजुन एक वांदा असते. तिचं सलमान संगं लग्न ठरेल असते.
पन पोट्टी असते मोठी लागट. ते अंजलीच्या शाळेत बापाले बलाउन घेते. बाप तं असतेच रिकामचोट.
बातच गानं म्हनत म्हनत शाळेत येते.अंजलीले पायल्यावर
त्याचा भंटोलपना जागी होते. मंग तेच. एकामेकाच्या नाकाले बोटं लावनं,भांग मोडनं, भांग पाडनं, सारे ढंगरे चालू होतात.
पन सारं वाया जाते. सलमान येते अन अंजलीले
खसंखसं वडत घरी घिऊन जाते. राहुल माट्यावनी पायतच रायते.
राहुलची पोरगी भारी चिवट असते. लग्नाच्या दिवशी
वरात येते, पावण्याइले अक्षिता वाटेल असतात.
तरी काट्टी सलमानले एका कोपऱ्यात नेते अन्
त्याले समजावते की अशी लफडेल पोरगी काय करता काका,
तुमाले तं एकशे एक भेटीन. इले राऊ द्या माया
दुसरपन्या बापासाठी. तसंही तिचं माया बापासंगं होतंच.
सलमानले तं वाटते पोट्टी देवासारकी धाऊन आली.
मंग तो काय करते, त्याची टोपी, शेवळ्याचं ताट राहुल ले देते,
अन् मनात म्हनते, तुही बला तूच सांभाय बाबू.
मी आरामानं करीन पन सर्वी चौकशी करून करीन.
राहुल चं अन् अंजली चं लग्न होते अन् टिनाच्या
अत्म्याले शांती भेटते की माया नवऱ्याची अन पोरीची
दोन टाइम खायाची सोय लागली आता तो भंटोलावानी
गावभर रिकामा फिरनार नाही. 
सिनिमा खतम, जन गन मन, निंगा घरी.