शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (14:58 IST)

ढेरी आणि बायको Funny Poem

नवऱ्याची ढेरी वाढण्यात
बायकोचाच असतो हात
तीच म्हणते, थोडाच उरलाय
घेऊन टाका भात 
 
पिठलं उरो, पोळी उरो
बायकोच आग्रह करते,
पुरणाच्या पोळीवर
तुपाची धार धरते
 
बोन्ड वाढते, भजे वाढते
मस्त भाज्या करते
दोन्ही वेळेस यांचे पोट
तडसावणी भरते 
 
अन्न पूर्णब्रह्म म्हणून
तो ही खात राहतो
बायकोचं मन मोडत नाही
म्हणून जाड होतो
 
ज्याची बायको सुगरण असते
त्यालाच ढेरी येते
लोकं उगीच नावं ठेवतात,
लक्ष द्यायचे नसते ?
 
साधी फोडणी दिली तरी
खमंग स्वयंपाक होतो
त्याच बाईच्या नशिबात
ढेरीवाला असतो 

जिथं जाईल तिथं लोकं
आग्रह करत राहतात,
स्वभाव, हुशारी सोडून
ढेरी कडेच पाहतात 
 
बरेचजण सल्ला देतात,
थोडा व्यायाम करत जा,
सकाळी उठून थोडं तरी
ग्राऊंडवर पळत जा 
 
योगासनं, प्राणायाम
कां करत नाही ?,
पहाटे उठून डोंगरावर
कां चढत नाही ? 

ते जरी बोलले तरी
कशाला लक्ष द्यायचं,
एक वाटी संपली की
दुसरं आईस्क्रीम घ्यायचं
 
लोकांच्या भरीस पडून
काहीच करायचं नाही
उगीचच डायटिंग करून
मरकुडं व्हायचं नाही
 
व्यायाम करा, व्यायाम करा
ते म्हणतच असतात
कोण म्हणतं जाड माणसं
हँडसम दिसत नसतात 

माकडहाड मोडल्यावर
कोण मदतीस येतो?,
म्हणून मी पळत नाही
घरीच लोळत असतो
 
फुकटचे सल्ले द्यायला
लोकांचं काय जातं,
आमची ढेरी पाहून त्यांच्या
पोटात दुखत राहतं 
 
वा..वा.. छान.. म्हणून
जो जेवत असतो,
खरं सांगतो त्याचाच पोटाचा
घेर वाढत असतो 
 
कोण्याही ऐऱ्यागैऱ्याला
ढेरी सुटत नसते,
ढेरीसाठी भगवंताची
कृपा लागत असते 
 
समाधानी माणसालाच
सुटत असते ढेरी
सुखाचे, आनंदाचे
प्रतीक असते ढेरी