शिंदे सराकारचा मोठा निर्णय
मुंबई मेट्रोमधून आता 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महाराष्ट्र दिनापासून सुमारे 25 टक्के सवलत लागू केल्यामुळे अर्ध्या अधिक मुंबईकरांचा प्रवास सुखकर जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे, तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून 50 टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि M MRDA यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई वन पासावर ही सवलत मिळेल.
हे लोग घेऊ शकतात लाभ
65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी ही सवलत आहे. या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मुख्यत: दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.