मुलुंड, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्रभर वीज नव्हती
महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. सायंकाळपर्यंत सुमारे ६०-७० टक्के भागांतच वीजपुरवठा सुरू होऊ शकला. यात प्रामुख्याने रेल्वे आणि रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला.
रात्री उशिरापर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी विविध ठिकाणी अनेक भागांत विजेअभावी लाखो लोकांचे हाल झाले. दुपारी १ च्या सुमारास हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली, पंरतु रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत होता. मात्र मुलुंड, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्रभर वीज नव्हती. मुलुंड, ठाण्यामागील अनेक भागांमध्ये १४ तासांपासून अधिक काळ वीज पुरवठा खंडित होता. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधिंनीही नारजी व्यक्त केली.
मुलुंड, ठाण्यातील काही भाग रात्रभर अंधारात राहण्यामागील मुख्य कारणासंदर्भात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच ट्विटरवरुन रात्री पावणे दहा वाजता माहिती दिली. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये, “टाटाचे ५०० मेगावॅटचे सिक्रोनायझेशन होऊ शकलेले नाही. मुलुंड, ठाणे, नवी मुंबईतील काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेले नाही. मात्र रात्री दहापर्यंत तो होईल. सध्या मुंबईतील २१०० मेगावॅट गरज पूर्ण केली जात आहे,” असं म्हटलं होतं. मात्र हा बिघाड रात्री उशीरा ठीक न झाल्याने अनेक भागांमध्ये रात्रभर वीज पुरवठा खंडीतच होता.