शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (15:52 IST)

कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होऊन राजकारण करणार नाही-पंकजा मुंडे

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही.मला सत्तेची लालसा नाही.मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही,असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे,असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं.

पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

त्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला आले होते. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराच वेळ सामोरे जावे लागले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य कार्यकर्ते इथे आले आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यात आहेत. मार्गदर्शाची वाट पाहत आहेत. मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना न्याय देण्याचे काम केले. तळागाळातील माणूस हा ग्राम पंचायत सदस्य ते आमदार,खासदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. मुंडे साहेबांनी फक्त परळीची आमदारकी मिळवावी म्हणून राजकारणात आणले नाही. त्यांनी लढा दिलेल्या प्रस्थापितांविरोधात उभे करण्यासाठी मला राजकारणात आणले. मुंडे साहेबांनी मुलीला मंत्री करा, संत्री करा, या नातेवाईकाला करा, असे कधी म्हटले नाही. वडील राजकारणात असताना मी राजकारणात आले. त्यांच्या चितेला अग्नी देताना अनेक लोक मला ढकलत होते. अनेकांनी मुंडण केले. घोषणा देऊ नका, मला त्यातून ताकद जरूर मिळते, परंतू आज ते स्थान नाही.

माझे भांडण नियतीशी आहे, मुंडे साहेबांना दिलेली सत्ता या नियतीने खेचून घेतली. ती सत्ता खेचून आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे मी म्हणाले होते. मुंडे साहेबांचे स्वप्न होते, भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, ते स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मी संघर्ष यात्रा काढली होती. राज्यातल्या नेत्यांनी केंद्रात प्रस्ताव पाठवला होता. पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या, मी नाकारले, असे पंकजा म्हणाल्या. मग मी तुम्हाला राजीनामे द्यायला लावेन का, असा सवाल करत मी तुम्ही दिलेले राजीनामे नामंजूर करत आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली.
 
यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नसल्याचं स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा म्हणाल्या. काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवालही त्यांनी केला.