शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By विकास शिरपूरकर|

राज ठाकरे यांच्‍या अटकेने फायदा कुणाचा?

WD
मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या चर्चेचे गु-हाळ फिरणार आहे, ते राज यांच्‍या अटकेमुळे नेमका फायदा कुणाचा या मुद्याभोवती.

ठाकरी शैलीतून आणि शिवसेनेच्‍या आक्रमक मुशीतून तयार झालेल्‍या राज यांच्‍यासाठी अशा प्रकारची अटक तशी फारशी नवी नाहीच. यापूर्वीही त्‍यांनी अनेक आंदोलने केले आहेत. आणि त्‍यांनाच काय खुद्द बाळासाहेबांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे. तर महाराष्‍ट्रालाही त्‍यांच्‍या अटकेनंतर होणारी निदर्शने नवीन नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना अटक झाल्‍यानंतर हे सर्व होणार हे राज्य सरकारलाही ठाऊक होतेच.

शिवसेनेतून बाहेर पडल्‍यानंतर आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केल्‍यानंतर अगदी पहिल्‍याच सभेतून राज यांनी 'मराठी बाणा' हेच आपल्‍या पक्षाचे प्रमुख ध्‍येयधोरण राहील हे जाहीर केले होते. त्‍यामुळेच त्‍यांनी 'मी महाराष्‍ट्राचा... महाराष्‍ट्र माझा' ही घोषणाही दिली.
आणि त्‍यानुसार मुंबईत असलेली उत्तर भारतीय आणि बिहारींची मक्‍तेदारी मोडीत काढण्‍यासाठीचे आंदोलन चालविले. त्‍यामुळे त्‍यांना उत्तर भारतीय नेत्‍यांची नाराजीही ओढवून घ्‍यावी लागली. म्‍हणूनच वारंवार त्‍यांच्‍या अटकेची मागणी केली गेली. गेल्‍या 19 ऑक्‍टोबर रोजी रेल्‍वे भरती परीक्षेच्‍या वेळी मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना दिलेला चोप ही काही नवीन घटना नव्‍हती. यापूर्वी गेल्‍या दोन-अडीच वर्षात तशा अनेक घटना घडल्‍या आहेत. मग इतक्या दिवसांनंतर आताच राज यांना अटक का केली गेली? हा देखिल सध्‍या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे.

  राज यांनी 'मराठी बाणा' हेच आपल्‍या पक्षाचे प्रमुख ध्‍येयधोरण राहील हे जाहीर केले होते. त्‍यामुळेच त्‍यांनी 'मी महाराष्‍ट्राचा... महाराष्‍ट्र माझा' ही घोषणाही दिली.      
राज्याच्‍या राजकारणात राज ठाकरे हे नाव गेल्‍या काही दिवसांपासून वेगाने पुढे येत आहे. त्‍यामुळे आगामी निवडणुकांमध्‍ये 'मराठी बाणा' हा निवडणुकीचा मोठा मुद्दा ठरण्‍याची शक्‍यता आहे. हे कॉंग्रेस आघाडी सरकारला निश्चितच परवडणारे नाही. या शिवाय केंद्रातही कॉंग्रेसप्रणित संपुआ आघाडीचेच सरकार आहे. या सरकारमध्‍ये समाविष्‍ट असलेले बरेचशे घटक पक्ष हे उत्तर भारतातील आहेत. त्‍यात लालूंचा राजद आणि अमरसिंग व मुलायम सिंह यांचा समाजवादी पक्षही आहे. या पक्षांच्‍या पाठिंब्यावरच संपुआने आपले सरकार टीकवून ठेवले आहे. त्‍यामुळे राज यांच्‍या अटकेसाठी या पक्षांचा केंद्रावर दबाव वाढू लागल्‍याने त्‍यांची अटक झाली आहे.

या सर्व गोष्‍टींच्‍या मागे आगामी निवडणुकाही आहेत. हे विसरून चालणार नाही. राज यांना अटक करण्‍यामागे विलासराव देशमुख सरकारने 40 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक सरकारने केलेल्‍या राजकीय खेळीची पुनरावृत्ती केली आहे. उत्तर भारतीय राज्‍यांमध्‍ये राज ठाकरे हा एक गुंड असल्‍याची प्रतिमा हिंदी चॅनल्‍सनी आधीच करून ठेवली आहे. त्‍यामुळे राजला अटक करण्‍याची करामत महाराष्‍ट्रातील कॉंग्रेसच्‍या सरकारने करून दाखविली हे दाखवून उत्तर भारतातील राज्‍यांमध्‍ये कॉंग्रेसची प्रतिमा उजळ करण्‍याचाच प्रयत्‍न केला आहे. राज्‍यातील अमराठी भाषिकांमध्‍येही राज्‍य सरकारच्‍या कार्यकुशलतेचा यामुळे ठसा उमटण्‍यास मदत होणार आहे. आगामी निवडणुकांमध्‍ये या राज्‍यांमध्‍ये राजच्‍या अटकेचे श्रेय घेण्‍यासाठी अनेक जण पुढे येतील हे आताच स्‍पष्‍ट दिसू लागले आहे.

WD
या एकाच घटनेमागे कशीकशी राजकीय खेळी केली गेली हे आता आणखी स्‍पष्‍टच सांगायचे झाले, तर राज हे शिवसेनेतून बाहेर आले आहेत. त्‍यामुळे शिवसेनेच्‍या विचारधारेला समांतरच त्‍यांच्‍या पक्षाची विचारधारा असेल हे स्‍पष्‍टच आहे. राज्‍यात शिवसेनेचा दबदबा ही कॉंग्रेससाठी कायमच डोकेदुखी ठरली आहे. राजच्‍या निमित्ताने त्‍यावरचं औषधच सरकारच्‍या हाती आलं आहे. म्‍हणूनच राज ठाकरेंचे जहाल भाषण, प्रक्षोभक वक्‍तव्‍य आणि भय्यांना दिलेला चोपही गेल्‍या अनेक दिवसांपासून आघाडी सरकार त्‍यांच्‍यावर कारवाई न करता एकप्रकारे खपवूनच घेत होते. यानिमित्ताने राजना 'मोठे करा' हीच भूमिका या पक्षाने घेतली होती. राज मोठे झाले तर शिवसेनेच्‍याच मतांवर त्‍याचा परिणाम होईल आणि 'डिव्‍हाईड अ‍ॅण्‍ड रूल' ही खेळी करणे सोपे होईल हा त्‍यामागे उद्देश होता.

  राज यांना अटक केल्‍याने आणि काहीवेळ तुरुंगात ठेवल्‍याने ते मराठी जनतेचे 'हिरो' ठरतील हे देखिल कॉंग्रेस जाणून होती. मात्र राज हिरो ठरावेत हाच त्‍यांचा उद्देश होता.      
राज यांना अटक केल्‍याने आणि काहीवेळ तुरुंगात ठेवल्‍याने ते मराठी जनतेचे 'हिरो' ठरतील हे देखिल कॉंग्रेस जाणून होती. मात्र राज हिरो ठरावेत हाच त्‍यांचा उद्देश होता. कारण त्‍यामुळे दोन्‍ही सेनेतील मते विभागले जाऊन फायदा कॉंग्रेसचाच होईल, असा डाव राजकारणाच्‍या सारिपाटावर खेळला गेला आहे.

चाळीस वर्षापूर्वीच्‍या इतिहासाची पुनरावृत्त

आधीच सांगितल्याप्रमाणे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी तत्‍कालीन वसंतराव नाईक सरकारने जी खेळी केली होती. तिच विलासराव सरकारने खेळली आहे. त्‍यावेळी मुंबईत मिल कामगारांच्‍या चळवळी अतिशय मोठ्या प्रमाणावर चालत असायच्‍या आणि या चळवळींचे नेतृत्‍व डाव्‍यांच्‍या हाती असे. त्‍यामुळे साहजिकच राज्‍याच्‍या राजकारणातही डाव्‍यांचे प्रचंड वर्चस्‍व होते. तत्‍कालीन विधानसभेत 70 ते 72 जागांवर डाव्‍यांचे वर्चस्‍व राहत असे.

WD
कॉंग्रेसचा सर्वाधिक मोठा प्रतिस्‍पर्धी असलेल्‍या या डाव्‍यांच्‍या वर्चस्‍वाला पहिल्यांदा शह दिला तो शिवसेनेने. सेनेने कामगारांचे नेतृत्‍व केल्‍याने बाळासाहेबांच्‍या माध्‍यमातून डाव्‍यांना संपविण्‍याचा खेळ वसंतरावांनी खेळला. आता देशमुख त्‍याच पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेची ताकत कमी करू पाहत आहेत.

राजला नकारात्‍मक प्रसिध्‍दीचाही फायद

हिंदी माध्‍यमांनी आणि चॅनल्‍सने सुरूवातीपासूनच राज ठाकरे हा एक गुंड असल्‍याचेच दाखविले. राजला अटक केल्‍यानंतरही 'राजपर पुलीसकी नकेल', 'राजपर कसा शिकंजा', 'राज के गुंडोंका महाराष्‍ट्र मे हंगामा' अशाच आशयाच्‍या बातम्‍या येत राहिल्‍या. या बातम्‍यांमुळे अनेक वर्षांपासून राजला ओळखणारा मराठी माणूस साहजिकच दुखावला गेला. तर दुस-या बाजूला उत्तर भारतीय नेते पक्षभेद विसरून एकत्र आल्‍यानंतरही महाराष्‍ट्रातील पक्षांनी राजला गुन्‍हेगार ठरविल्‍याने राजबद्दलची सहानुभूती वाढली आहे.

राजच्‍या अटकेनंतर त्‍याचे राज्‍यभर उमटलेले पडसाद पाहता या प्रकरणातून अनेक अर्थी फायदा करू पाहणा-या कॉंग्रेसच्‍या हाती काय येईल हे येणारा काळच सांगणार आहे.