सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (07:59 IST)

आदित्य एल-1 : भारताने अंतराळ क्षेत्रात चीन आणि रशियाला असं मागे टाकलं

chandrayan 3
शकील अख्तर
 
ANI
चंद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर, भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 'आदित्य-एल1' हे सौरयान यशस्वीपणे प्रक्षेपित केलं आहे. त्यामुळे आता अवकाश संशोधनात एक नवं पर्व सुरू झालं आहे.
 
चंद्रयानाप्रमाणेच हे यान प्रथम पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल आणि त्यानंतर ते वेगाने सूर्याकडे झेपावेल. 'आदित्य एल-1' पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर पोहोचेल.
 
जोपर्यंत हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर आपली पकड मजबूत करत नाही, तोपर्यंत ते मधल्या एका बिंदूवर (लॅग्रेंज पॉइंट) थांबेल ज्याला वैज्ञानिक भाषेत एल-1 असं नाव देण्यात आलं आहे.
 
'आदित्य-एल1' हे अंतराळ यान सुमारे चार महिन्यांत त्याला ठरवून दिलेलं अंतर पार करेल. त्यानंतर ते सूर्याच्या विविध क्रिया, अंतर्गत आणि बाह्य वातावरण इत्यादींचा अभ्यास करेल.
 
यापूर्वी अमेरिकेने सूर्याजवळ एल-2 प्रदेशात अशीच एक मोहीम राबविली होती.
 
भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात 'आदित्य एल1' हे मोठं पाऊल असल्याचं मानलं जात आहे. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर सुमारे 150 कोटी किलोमीटर इतकं आहे.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी आपली दारं खुली केली आहे. आणि सध्या या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
 
पुढील दशकात जागतिक प्रक्षेपण बाजारपेठेत भारताचा हिस्सा पाच पटीने वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
 
जागतिक पातळीवर अंतराळ क्षेत्राचा व्यवसाय बदलतोय. या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी भारत इस्रोच्या यशावर अवलंबून आहे.
 
अंतराळ क्षेत्रात भारताचा वाढता दबदबा
23 ऑगस्ट 2023 रोजी भारताने चंद्रावर चंद्रयान-3 उतरवून जागतिक क्रमवारीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा क्रमांक पटकावला आहे.
 
आणि विशेष म्हणजे हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. अद्याप कोणत्याही देशाचे यान या भागात उतरलेले नाही. भारतीय शास्त्रज्ञांचं हे मोठं यश आहे.
 
शिव नाडर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. आकाश सिन्हा म्हणतात, "चंद्रयान 3 च्या रोव्हरची रचना अतिशय स्मार्ट पद्धतीने करण्यात आली आहे. सहा चाकांचं हे मशीन एखाद्या गाडी सारखं दिसतं. हे रोव्हर स्वतःचे निर्णय स्वतः घेतं, स्वतःचा मार्ग निवडतं. चंद्राच्या पृष्ठभागाचे वातावरण आणि तापमान यावर नजर ठेऊन आपलं काम चोखपणे पार पाडतं."
 
भारताने 1950 ते 1960 च्या दशकात अंतराळ संशोधनात काम सुरू केलं. त्यावेळी देशासमोर गरिबी आणि पैशाचं आव्हान होतं.
 
1963 मध्ये जेव्हा इस्रोने आपलं पहिलं वहिलं रॉकेट लॉन्च केलं तेव्हा कोणाच्याही ध्यानीमनी नसेल की भविष्यात हा देश अमेरिका आणि रशियासारख्या विकसित देशांशी स्पर्धा करेल.
 
'इंटरस्टेलर' चित्रपटाच्या बजेटशी तुलना
पण आज भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारत आता अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपियन अवकाश संस्थांसारख्या जगातील आघाडीच्या देशांच्या रांगेत उभा आहे.
 
भारताने चंद्रयान-3 मोहिमेवर सुमारे 70 मिलियन डॉलर खर्च केले आहेत. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ख्रिस्तोफर नोलनच्या 'इंटरस्टेलर' चित्रपटावर जो 131 मिलियन डॉलर खर्च झाला होता, त्याच्या निम्मा खर्च या मोहिमेवर झाल्याचं म्हणता येईल.
 
अंतराळ संशोधन आणि विकास हे सामान्यतः श्रीमंत देशांसाठी एक साहसाचं काम मानलं जातं.
 
पण भारताच्या यशामुळे जगातील उदयोन्मुख देशांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला आहे.
 
चंद्र किंवा सूर्यावरील संशोधन आणि त्यातून मिळणारे ज्ञान यावर कोणत्याही एका देशाची मक्तेदारी नाही. हे जगभरातील मानवी विकास आणि मानवतेसाठी समर्पित आहे.
 
चंद्र आणि सूर्याच्या संशोधनातून भारतीय शास्त्रज्ञांना जी काही माहिती मिळेल, त्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल. जगाने जी काही प्रगती केली आहे ती केवळ वैज्ञानिक संशोधन आणि नवनवीन शोधांमुळेच शक्य झाली आहे.
 
सामान्य लोकांचं काय मत आहे
चंद्रयानाच्या यशामुळे भारतातही एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.
 
विद्यार्थिनी असलेली अदा शाहीन म्हणते, "ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. भारत झपाट्याने विकसित होतोय याचंच हे लक्षण आहे."
 
शाहरुख खान नामक तरुणाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, "भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप घेतली याचा मला आनंद आहे. माझं बालपणीचं स्वप्न साकार झालंय. लहानपणापासून मी चंद्रावर अमेरिकेच्या झेंड्याची चित्रं पाहिली होती. मला नेहमीच असं वाटायचं की, भारताचाही झेंडा तिथे असावा, आणि आता हे स्वप्न साकार झालंय."
 
मात्र यासोबत त्यांनी काही सूचनाही केल्या आहेत. शास्त्रज्ञांनी अवकाश संशोधनापूर्वी पृथ्वीवरील समस्या सोडवण्यावर भर द्यावा, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
त्यांच्या मते, अशा अंतराळ मोहिमांमधून काहीही साध्य होणार नाही. देशातील खर्‍या समस्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.
 
फराज फाखरी हे चित्रपट निर्माते आहेत. ते म्हणतात की चंद्रयान 3 च्या यशामुळे खाजगी अवकाश क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.
 
"अवघ्या काही दिवसांत रोव्हरने चंद्रावर सल्फर आणि इतर खनिजांचे साठे शोधून काढले आहेत. दिवसा आणि रात्री जे काही तापमान असतं त्यातील बदल नोंदवले आहेत. ही अंतराळ मोहीम एक मोठं यश आहे आणि मला वाटतं की भारत आता अंतराळ शर्यतीत सामील झालाय."
 
इस्रोसोबत असलेल्या खाजगी अवकाश कंपन्या
भारतातील अंतराळ संशोधन आणि विकासाचे काम केवळ भारतीय संशोधन संस्था, इस्रोच करत नाही. अलीकडच्या काळात देशात अनेक खाजगी अवकाश तंत्रज्ञान कंपन्या उदयास आल्या आहेत.
 
या स्टार्ट-अप कंपन्या अंतराळ क्षेत्रात खूप वेगाने प्रगती करत आहेत. त्यापैकी अनेकांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय.
 
चंद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर, इस्रोच्या संचालकांनी या यशाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे आभार मानले आणि भारताच्या अनेक खाजगी अवकाश कंपन्यांचे कौतुक केले.
 
या खासगी तंत्रज्ञान कंपन्यांनी या अवकाश मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
काही वर्षांपूर्वीपर्यंत अवकाश संशोधन आणि विकासाचं काम केवळ इस्रो आणि त्याच्याशी संलग्न वैज्ञानिक तंत्रज्ञान संस्थांच करत होत्या. पण 2020 मध्ये मोदी सरकारने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं केलं.
 
वेगाने पुढे येणारे स्टार्टअप
गेल्या चार वर्षांत सुमारे दीडशे खाजगी अवकाश कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत. हे टेक स्टार्टअप खूप वेगाने प्रगती करत आहेत. या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
 
इस्रोच्या अंतराळ मोहिमांमध्ये उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांची भूमिका वाढते आहे.
 
या कंपन्याही स्वबळावर पुढे येत आहेत. 2022 मध्ये 'स्कायरूट' नावाच्या खाजगी कंपनीने भारतात बनवलेल्या रॉकेटसोबत आपला उपग्रह अवकाशात सोडला.
 
एखाद्या भारतीय खाजगी कंपनीने स्वतःच्या अवकाशयानाच्या सहाय्याने उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
हैदराबादस्थित ही कंपनी या वर्षाच्या अखेरीस एक मोठा उपग्रह अवकाशात पाठवण्याच्या तयारीत आहे.
 
रशिया आणि चीन पडले मागे
अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतातून उपग्रह पाठवणं तसं स्वस्त झालंय. त्यामुळे या खाजगी अवकाश कंपन्यांचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.
 
जगातील राजकीय घडामोडींमुळे रशिया आणि चीन आता अवकाश व्यापारात मागे पडले आहेत.
 
अशा परिस्थितीत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबतच या खाजगी भारतीय अवकाश कंपन्याही जगचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाल्या आहेत.
 
तज्ञांच्या मते, अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करण्याची बाजारपेठ सध्या सहा अब्ज डॉलर्सची आहे. येत्या दोन वर्षांत ती तिप्पट होण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्कची 'स्पेसएक्स' कंपनी बाजारात नवीन आव्हान म्हणून पुढे येत आहे.
 
स्पेसएक्स अंतराळात जाण्यासाठी स्पेस शटल रॉकेट म्हणजेच पुन्हा वापरात येईल अशा अवकाशयानाचा उपयोग करत आहे.
 
हे अवकाशयान वजनाने जड आणि मोठ्या आकाराचे उपग्रह अवकाशात वाहून नेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे या अवकाशयानाच्या माध्यमातून उपग्रह प्रक्षेपित करणं भारताच्या तुलनेत स्वस्त आहे.
 
भारतीय खाजगी कंपन्या आता अवकाश तंत्रज्ञानाच्या विशेष क्षेत्रात काम करत आहेत. त्या केवळ इस्रोसोबतच काम करत आहेत असं नाही. तर त्या अमेरिकन आणि युरोपियन अवकाश संस्थांनाही मदत करत आहेत.
 
त्यामुळे इस्रोलाही आता या खाजगी कंपन्यांच्या मदतीने नवीन मोहिमांवर आणखीन वेगाने काम करण्याची संधी मिळाली आहे.