शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लष्करी छावणीवर हिमस्खलन, मेजरचा मृत्यू

श्रीनगर- जम्मू- काश्मीरमधील सोनमर्गजवळच्या लष्करी छावणीवर बर्फाचा कडा कोसळला असून त्यात एका मेजरचा मृत्यू झाला आहे, तर आठजण बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी लष्कराने मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे.
 
त्याचवेळी, बंदीपुरामधील गुरेज क्षेत्रात हिम वादळाने एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेतला आहे. श्रीनगरपासून 80 किमी अंतरावर हा लष्करी तळ आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मीरमध्ये रोजच हिमवृष्टी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यादृष्टीने योग्य खबरदारीही घेतली गेली होती. पण सोनमर्ग येथील लष्करी तळाजवळील पर्वतांवर जमलेला बर्फ थेट या तळावर कोसळला. त्याखाली अनेक जवान गाडले गेल्याचे समजते. बर्फाखालून एका मेजरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून इतर जवानांचा शोध वेगाने सुरू आहे.
 
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सियाचीनमध्ये हिमकडा कोसळून मद्रास रेजिमेंटच्या दहा जवानांचा मृत्यू झाला होता. लान्स नायक हनुमंतप्पा हे अनेक दिवसांनंतर बर्फाखालून जिवंत सापडले होते.