शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (11:31 IST)

मिचाँग चक्रीवादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्रात कुठे पाऊस पडण्याची शक्यता?

cyclone
मिचाँग चक्रीवादळ तीव्र झालं असून ते मंगळवारी (5 डिसेंबर) आंध्र प्रदेशच्या नेल्लोर आणि मछलीपट्टणम भागातून पुढे सरकेल.
 
मिचाँग चक्रीवादळ आता चेन्नईपासून दूर सरकलंय. हे वादळ किनाऱ्यालगत उत्तरेकडे सरकल्याचं हवामान विभागानं सकाळी जाहीर केलं होतं. पण या चक्रीवादळामुळे चेन्नई परिसरात रविवार आणि सोमवारी मिळून 36 तासांत 40 सेंटीमीटर एवढा पाऊस पडलाय.
 
या चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पाच जणांपैकी दोघांचा मृत्यू हा वीजेचा धक्का लागून तर एकाचा मृत्यू हा झाड कोसळल्याने झाला आहे. अन्य दोन जणांच्या मृत्यूचं थेट कारण अद्याप समजलं नाहीये.
 
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तामिळनाडू सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू या चार जिल्ह्यांत सुट्टी जाहीर केली आहे.
 
राज्यातील सर्वं मोठे टनल बंद करण्यात आले आहेत, कारण यांपैकी अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे.
 
हवामान विभागाने आपल्या माहितीत म्हटलं आहे की, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेन्नई आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हा वेग ताशी 80 किलोमीटरपर्यंतही जाऊ शकतो.
 
1 डिसेंबरच्या पहाटे तयार झालेल्या मिचाँग चक्रीवादळानं पुढच्या दोनच दिवसांत सिव्हियर सायक्लोन म्हणजे तीव्र चक्रीवादळाचं रूप धारण केलं. समुद्राचं तापमान वाढलं असल्यानंच चक्रीवादळं अशी वेगानं तीव्र होतात, असं हवामानतज्ज्ञ सांगतात.
 
मिचाँग चक्रीवादळ हे उत्तर हिंदी महासागर प्रदेशातलं यंदाच्या मोसमातलं सहावं चक्रीवादळ असून यंदा सहापैकी पाच चक्रीवादळं ही तीव्र किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या क्षमतेची होती.
 
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार डिसेंबरमध्ये सहसा एवढी ताकदवान वादळं येत नाहीत. त्यामुळे मिचाँग चक्रीवादळ हे थोडं वेगळं ठरतंय.
 
मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम
या चक्रीवादळामुळे तामिळनाडूची राजधानी चेन्नईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून रस्त्यांवर पाणी साचलं आहे, अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत.
 
चेन्नई विमानतळावरही पाणी भरलं असून वादळामुळे विमानतळ बंद आहे.
 
एअरपोर्ट प्रशासनाने सोमवारी (4 डिसेंबर) रात्री उशीरा जवळपास सर्व उड्डाणं रद्द केली होती. 150 च्या आसपास विमान उड्डाणांवर या वादळाचा परिणाम झाला आहे.
 
पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. चेन्नईला येणाऱ्या आणि चेन्नईवरून सुटणाऱ्या काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
 
चेन्नईमधील काही मेट्रो स्टेशन्सलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पण मेट्रो सेवा सुरू आहे.
 
महाराष्ट्रावर काय परिणाम?
महाराष्ट्रावर हे चक्रीवादळ थेट धडकणार नाहीये, पण त्याच्या प्रभावामुळे 6 आणि 7 डिसेंबरला विदर्भातील काही भागांत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच महाराष्ट्र आणि मध्य भारतातील तापमानावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
 
हे चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यांच्यामुळे यंदा डिसेंबरमध्ये राज्यातलं तापमान नेहमीपेक्षा थोडं जास्त राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे मुख्य संचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी काही दिवसांपूर्वी वर्तवला होता.