सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (15:03 IST)

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; शिंदे गटाला तीन राज्यमंत्री पदे मिळणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपदांऐवजी तीन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार आहेत. या तीन राज्यमंत्री पदासाठी गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे आणि कृपाल तुमाने, प्रताप जाधव यांची वर्णी लागेल, असे खात्रीलायक गोटातून सांगण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षाचे तेरा खासदार त्यांच्या सोबत आले आहेत. विधानसभेप्रमाणे लोकसभेतही तेरा खासदारांचा शिंदे गट आहे. शिंदे यांच्याकडे ४० आमदार असताना राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांना दिले. तसेच त्यांनी लोकसभेतही शिवसेनेचे तेरा खासदार फोडले आहेत. यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे यांच्यावर खूश आहे.
 
शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मागितले होते. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे गटाला तीन राज्यमंत्रीपदे देणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यात मुंबईतून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदासंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांची वर्णी लागणार आहे. मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे यांच्या खास मर्जीतील आहेत. त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होईल. मावळ या मतदारसंघात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो. त्यामुळे बारणे यांच्या वर्णीने या दोन्ही भागाला प्रतिनिधित्व मिळेल. तिसरे राज्यमंत्रीपद हे विदर्भाच्या वाट्याला जाईल. यासाठी बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रताप जाधव आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यात चुरस आहे.
 
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रिमंडळात साधी मिळणार नाही, असे दिसते. पण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपचे खासदार हे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मुंबईतून किर्तीकर आणि राहुल शेवाळे असे दोन खासदार शिंदे गटात गेले आहेत. किर्तीकर हे वरिष्ठ नेते आहेत. मोदी मंत्रिमंडळात उध्दव ठाकरे यांनी त्यांना डावलून अरविंद सावंत यांना मंत्री बनविले होते. पण आता किर्तीकर हे शिंदे गटात गेले असून त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor